Hungary Election 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक व युरोपियन युनियनमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्हिक्टर ओरबान यांचा संसदीय निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. गेल्या १६ वर्षांत ओरबान यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागल्याने हंगेरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या निवडणुकीत तिस्झा पार्टीचे नेते पीटर मग्यार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने १९९ सदस्यांच्या संसदेत दोन-तृतीयांशपेक्षा अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. हंगेरीच्या निवडणुकीकडे अमेरिकेसह रशियाचे बारकाईने लक्ष होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत व्हिक्टर ओरबान यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स स्वतः हंगेरीत तळ ठोकून होते, तरीदेखील हंगेरीच्या मतदारांनी बदलाचा कौल देत ओरबान यांना सत्तेतून बाहेर केले. या निकालामुळे जागतिक स्तरावरील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
गेल्या १६ वर्षांत व्हिक्टर ओरबान यांनी हंगेरीचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलून टाकला होता. त्यांनी देशाची राज्यघटना नव्याने लिहून न्यायव्यवस्थेत आपल्या मर्जीतील लोकांची भरती केली आणि प्रसारमाध्यमांवर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. हंगेरीमधील निवडणुकांआधी ‘फिडेझ’ या सत्ताधारी पक्षालाच पूरक ठरतील अशी व्यवस्था निर्माण केली होती. विरोधी पक्षांना प्रचाराची मुभा देण्यात आली असली तरीही प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी पक्षालाच पूरक ठरतील अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती, त्यामुळे विरोधकांना केवळ जिंकण्यासाठी या संपूर्ण यंत्रणेबरोबर लढा द्यावा लागला. यादरम्यान अनेकांनी ओरबान यांच्या पराभवामागे आर्थिक मंदी आणि वाढती महागाई कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
सामान्य जनता महागाईने होरपळत असताना पंतप्रधान ओरबान यांच्या निकटवर्तीयांची श्रीमंती वाढतच गेल्याने त्यांच्या विरोधात जनतेचा तीव्र असंतोष होता. त्यातच निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी एक खळबळजनक ध्वनीचित्रफित उघड झाल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या ध्वनीचित्रफितीत ओरबान यांचे परराष्ट्र मंत्री रशियाबरोबर मिळून युरोपियन युनियनमधील युक्रेनचा प्रवेश रोखण्यासाठी काम करत असल्याचे समोर आले, त्यामुळे हंगेरीच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि जागतिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सध्याच्या सर्वेक्षणानुसार, सत्ताधारी फिडेस पक्षाला ३७ टक्के पाठिंबा असून, तिस्झा पार्टीचे नेते पीटर मग्यार यांना सुमारे ५० टक्के पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा : नेतान्याहूंच्या एका फोनमुळे अमेरिका-इराणमधील चर्चा फिसकटली? पाकिस्तानमधील बैठकीत काय घडलं?
एकेकाळी व्हिक्टर ओरबान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पीटर मग्यार यांनी एका बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला माफी दिल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी फिडेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तिस्झा पार्टीची स्थापन करून हंगेरीच्या जनतेची सहानुभूती मिळवली. पंतप्रधान ओरबान यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेसाठी काहीही करू शकते, असे जनतेच्या मनात रुजवण्यात ते यशस्वी झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मग्यार यांनी ५० टक्के मतदारांचा पाठिंबा मिळवून ओरबान यांना पराभवाचा धक्का दिला आहे. युरोपियन युनियनसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. ओरबान यांनी नेहमीच युरोपिय एकात्मतेला आणि युक्रेनला मिळणाऱ्या मदतीला विरोध केला होता. नव्या सरकारकडून युरोपला अधिक सहकार्याची अपेक्षा आहे.
हंगेरीच्या निवडणुकीत ऑर्बन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव झाल्याने रशियासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. ओरबान हे युरोपियन युनियनमध्ये रशियाचे सर्वात विश्वासार्ह मित्र होते. मग्यार यांचे सरकार आल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युरोपातून मिळणारा पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संसदीय निवडणुकीत विजय मिळाला असला तरी मग्यार यांच्यासाठी सत्तेचा मार्ग सोपा नाही. हंगेरीच्या घटनात्मक न्यायालयामध्ये अद्यापही ओरबान समर्थक न्यायाधीशांचा मोठा गट आहे, त्यामुळे नवीन सरकारला कोणताही कायदा संमत करताना किंवा जुन्या व्यवस्थेत बदल करताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि व्हिक्टर ओरबान यांच्यातील मैत्री आधुनिक काळातील सर्वात प्रभावी जागतिक राजकीय युती मानली जाते. ट्रम्प यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना पाठिंबा देणारे ओरबान हे युरोपियन युनियनमधील पहिले राष्ट्रप्रमुख होते. ओरबान यांनी अनेकदा त्यांच्या ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानी आणि व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. दोघांमधील ही मैत्री एका मजबूत राजकीय युतीत बदलली असून, अमेरिकेतील सध्याच्या पुराणमतवादी धोरणांवर तिचा प्रभाव दिसून येत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अनेक धोरणांवर ओरबान यांच्या कारभारशैलीचा ठसा असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. २०१४ पासून हंगेरीने अमेरिकेतील समान विचारसरणीच्या गटांशी संपर्क वाढवला आहे. हंगेरी सरकारच्या पाठिंब्याने चालणाऱ्या थिंक टँकने अमेरिकन उजव्या विचारसरणीच्या नेत्यांसाठी युरोपमध्ये बौद्धिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच, अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह चळवळीचा वार्षिक कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून बुडापेस्टमध्ये आयोजित केला जात आहे.
हेही वाचा : इराणच्या नव्या युद्धतंत्राने अमेरिकेची कशी वाढवली डोकेदुखी? होर्मुझ सामुद्रधुनीवर कसे ठेवले नियंत्रण?
ओरबान यांनी २०२४ मध्ये अभिमानाने सांगितले होते की, आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने राबवलेल्या धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे, त्यामुळे हंगेरीला रशियन तेल आणि गॅसवरील अमेरिकन निर्बंधांतून सवलत मिळत आहे. ट्रम्प यांनी युरोपियन वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्काचा फटका हंगेरीच्या अर्थव्यवस्थेला कमी बसल्याचे त्यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध टिकवण्यासाठी ओरबान यांनी गेल्या एप्रिलमध्ये युरोपियन युनियनच्या विरोधात जाऊन अमेरिकेवर पलटवार करणाऱ्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले होते. यादरम्यान रविवारी जाहीर झालेला निवडणुकीचा निकाल केवळ हंगेरीपुरता मर्यादित नसून, जागतिक उजव्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
एकेकाळी राजकीय विजयाची खात्री मानला जाणारा ‘ट्रम्प इफेक्ट’ आता ओसरताना दिसत आहे. यापूर्वी कॅनडातील पिएर पोइलिव्रे यांनी ट्रम्प यांच्या धर्तीवर आपला प्रचार राबवला होता, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियातील पीटर डटन यांनीही ट्रम्प यांच्या पुराणमतवादी लढ्याची नक्कल केली होती; पण त्यांनाही मतदारांनी नाकारले होते. या पार्श्वभूमीवर हंगेरीतही व्हिक्टर ओरबान यांचा पराभव होऊन सत्तांतर झाल्यामुळे ‘ट्रम्प ब्रँड’च्या आक्रमक राष्ट्रवादाला उतरती कळा लागली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकंदरीत ओरबान यांचा पराभव हा केवळ हंगेरीसाठी नाही, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विचारसरणीसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
