गुन्हेगार कितीही चतुर आणि चलाख असला तरीही कायद्याच्या कचाट्यातून तो सुटत नाही. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करूनही कधी ना कधी त्याचे बिंग फुटतेच. याचाच प्रत्यय बिहारमधील एका घटनेतून आला. जिच्या हत्येच्या आरोपाखाली पतीने आणि त्याच्या कुटुंबाने अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. ज्या मृतदेहाची ओळख पटवून अंत्यसंस्कारही करण्यात आले, तीच महिला तब्बल एका दशकानंतर जिवंत सापडली. त्याचवेळी आपल्या क्राईम डायरीत मृत म्हणून नोंद केलेली महिला जिवंत असल्याचे पाहून पोलिसही चक्रावून गेले. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार रोहतास जिल्ह्यात घडला. सध्या या घटनेची बिहारसह संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच महिलेविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करून तिला अटकही केली, त्याविषयी…

२०१४ मधील कथित हत्या प्रकरण काय?

२०१४ मध्ये बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील एका कालव्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी एका व्यक्तीला बोलावले होते. त्याने हा मृतदेह आपली बहीण शकुंतला देवी हिचा असल्याचे सांगितले. शकुंतला काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचे तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच शकुंतलाच्या भावाच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरकडील मंडळींवर हत्येचा गुन्हा केला. या प्रकरणात शकुंतलाचा पती अरुण मेहता आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक वर्षे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. त्याशिवाय काही काळ त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि कायदेशीर खटला लढण्यासाठी मेहता यांना वडिलोपार्जित जमीनही विकावी लागली.

महिला १२ वर्षानंतर जिवंत कशी सापडली?

शकुंतला देवी हिच्या कथित हत्येला तब्बल एक दशकाहून अधिक कालावधी लोटल्यानंतर या प्रकरणाला अचानक अनपेक्षित वळण लागले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अरुणचे वडील दिलीप मेहता यांना त्यांची सून झारखंडमधील एका गावात दिसून आली. शकुंतला जिवंत असल्याचे पाहून सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यावरच विश्वास बसला नाही. त्यांनी तातडीने या गोष्टीची कल्पना आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सर्वजण त्या गावात पोहोचले असता त्यांना सदरील महिला शकुंतला देवीच असल्याचे समजले; पण त्यावेळी तिला थेट काही बोलण्याची मेहता कुटुंबीयांची हिंमत झाली नाही. त्यांनी संयम बाळगत या घटनेची माहिती आपले वकील शाहनवाज अहमद यांनी दिली.

पोलिसांकडून कारवाई आणि शंकुतलाला अटक

मेहता कुटुंबीयांच्या वकिलांनी तातडीने रोहतासचे पोलीस अधीक्षक राज यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण हकिकत सांगितली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील कांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लभारी गावातून शकुंतला देवीला शोधून काढले. या धक्कादायक प्रकारानंतर फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी शकुंतला देवीवरच गुन्हा दाखल केला आहे. तसेच, २०१४ मध्ये कालव्यात मिळालेला मृतदेह नेमका कोणाचा होता? याचा शोध घेण्याचा आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

नाव बदलून दुसऱ्यासोबत राहत होती महिला

शकुंतला देवी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी धक्कादायक माहिती उघड होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला देवी ही तिची मूळ ओळख लपवून झारखंडमध्ये ‘कांती देवी’ या नावाने राहत होती आणि तिने रट्टू सिंह नावाच्या व्यक्तीसोबत दुसरा संसार थाटला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन रोहतास येथे आणले असून सासाराम येथील न्यायालयात हजर केले. याबाबत मेहता कुटुंबीयांचे वकील शाहनवाज अहमद यांनी सांगितले की, शकुंतलाचे लग्न २००२ मध्ये अरुण मेहता यांच्याशी झाले होते. मात्र, काही दिवसांतच तिचे सासरकडील मंडळींशी वाद सुरू झाले. याच वादातून २०१४ मध्ये शकुंतलाने कोणालाही काहीही न सांगता अचानक घर सोडले. सासरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही सापडली नाही.

कालव्यात मृतदेह सापडला अन् खुनाचा गुन्हा

२० ऑगस्ट २०१४ रोजी शकुंतलाच्या भावाने पोलीस ठाण्यात धाव घेत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सुरुवातीला भावाने अरुण आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंडा छळाचे आरोप करत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४९८ (अ) (पती किंवा नातेवाईकांकडून क्रूर वागणूक) तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांत डेहरी मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडा गावाजवळील एका कालव्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शकुंतलाच्या भावाने आणि एका स्थानिक चौकीदाराने तो मृतदेह शकुंतलाचाच असल्याचे सांगत ओळख पटवली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मृतदेह सापडल्यानंतर आणि भावाच्या जबाबावरून बेपत्ता असलेल्या प्रकरणाला थेट हत्येचे वळण लागले आणि पोलिसांनी गुन्ह्यात खुनाची कलमे वाढवली.

पती आणि सासरकडील मंडळींना तुरुंगवास

हत्येचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत शकुंतलाचा पती अरुण, त्याचे वडील दिलीप मेहता आणि भाऊ गोविंद कुमार यांना अटक केली. याबाबत वकील अहमद यांनी सांगितले की, शकुंतलाच्या हत्येप्रकरणी अरुणसह त्याच्या कुटुंबीयांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले; पण न्यायालयीन खटल्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच होती. हे प्रकरण केवळ अटकेवरच थांबले नव्हते. कारण पुढे या कुटुंबाला खटला लढण्यासाठी अत्यंत मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

८ लाखांत तडजोड, वडिलोपार्जित जमीन विकली

शकुंतला देवी हत्येप्रकरणात तुरुंगवास भोगल्यानंतर मेहता कुटुंबाने हे संपूर्ण प्रकरण एका तडजोडीद्वारे मिटवल्याचा दावा केला. त्यांचे वकील शाहनवाज अहमद यांनी सांगितले की, शकुंतलाच्या माहेरच्या लोकांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम उभी करण्यासाठी अरुणचे वडील दिलीप मेहता यांना त्यांची सुमारे साडेतीन एकर वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. या तडजोडीनंतर न्यायालयातील खटला संपुष्टात आला. त्यानंतर अनेक वर्षे सर्वांचा एकच समज राहिला की- शकुंतलाचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलीप मेहता यांना अचानक आपली सून जिवंत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस दप्तरी वर्षानुवर्षे हत्या’ म्हणून नोंद असलेले हे प्रकरण पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले.

संपूर्ण प्रकरणाचा मुळापासून होणार तपास

याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आता या प्रकरणाचा तपास अगदी सुरुवातीपासून केला जात आहे. २०१४ मध्ये कालव्यात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता आणि त्याची ओळख शकुंतला म्हणून कशी पटवली गेली, याचा शोध आम्ही घेत आहोत. योग्य आणि सखोल तपासानंतर, जे कोणी गैरकृत्यात सहभागी आढळतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरीकडे- मेहता कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी आता शकुंतला देवीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर शकुंतला जिवंत होती, तर तिच्या भावाने कालव्यात सापडलेला अनोळखी मृतदेह स्वतःच्या बहिणीचाच म्हणून का ओळखला? तसेच ज्या अनोळखी मृतदेहावर शकुंतला समजून अंत्यसंस्कार करण्यात आले, ती दुर्दैवी महिला नेमकी कोण होती? याच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.