हैदराबादमधील तीन वेगवेगळ्या हॉटेलमधील खोल्यांमध्ये तीन तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या १० दिवसांत लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व हॉटेल्स आणि लॉज चालकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. विशेषतः एखाद्या जोडप्याने खोली भाड्याने घेतली आणि त्यापैकी एकच व्यक्ती बाहेर गेल्यानंतर परतलीच नाही, तर अशा प्रकरणांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी हॉटेलमधील खोलीचे बुकिंग करताना ग्राहकांकडून सादर केल्या जाणाऱ्या बनावट ओळखपत्रांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. ग्राहकांचे आधार कार्ड अथवा इतर ओळखपत्रे खरी आहेत की बनावट याची काटेकोर पडताळणी न केल्यास संबंधित हॉटेल चालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबादमधील तीन हत्याकांडाच्या घटना कशा उघडकीस आल्या? त्याविषयीचा हा आढावा…
हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह
हैदराबादमधील तरुणीच्या हत्याकांडाची पहिली घटना गेल्या शुक्रवारी (२ ऑक्टोबर) उघडकीस आली. पोलिसांनी मियापूर येथील एका हॉटेलच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची समाजमाध्यमांवरून रवी कुमार नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. रवीने कौटुंबिक अडचणींचे कारण सांगत तरुणीकडून मोठ्या प्रमाणात पैसे तसेच सोन्याचे दागिने उसने घेतले होते. तसेच लवकरच सर्व काही परत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, तरुणीने पैसे आणि दागिने परत करण्यासाठी तगादा लावला असता रवीने तिला हैदराबादला बोलावून घेतले आणि तिथेच दागिने परत करतो असे सांगितले.
त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी दोघेही मियापूर येथे आले आणि त्यांनी एका हॉटेलमध्ये खोली बुक केली. त्यानंतर काही वेळाने रवी त्या तरुणीला खोलीतच सोडून एकटाच बाहेर पडला. यादरम्यान तरुणीच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन बंद येत होता. तसेच शनिवारी ती वसतिगृहात परतली नसल्यामुळे मैत्रिणींनीही तिच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन खोलीची तपासणी केली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तरुणीचा उशीने तोंड दाबून खून करण्यात आला. या प्रकरणातील संशयित रवी कुमार सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हैदराबादमधील हत्याकांडाची दुसरी घटना
हैदराबादमधील दुसरी हत्याकांडाची घटना २९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. शहरातील एसआरनगर परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील खोलीत २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. संबंधित तरुणी बँक कर्मचारी म्हणून काम करत होती आणि तिचा साथीदार ए. श्रीनिवास याच्यासोबत हॉटेलमध्ये थांबली होती. श्रीनिवासने हॉटेलमध्ये प्रवेश करताना बनावट ओळखपत्राचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हे दोघेही विकाराबाद येथील रहिवासी असून सध्या हैदराबादमध्ये नोकरीनिमित्त राहत होते. मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास श्रीनिवास आपली बॅग घेऊन एकटाच हॉटेलबाहेर पडत होता. त्यावेळी हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्याकडे मॅडमही तुमच्याबरोबर जाणार आहेत का? अशी विचारणी केली असता ‘ती सकाळी नाश्ता करून नंतर चेकआउट करेल, असे सांगून तो तिथून निघून गेला.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
अनेक तास उलटूनही तरुणीने खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी संबंधित तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. पोलीस उपायुक्त रमणा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या. त्याशिवाय पलंगावर जेवणाचे अर्धवट उरलेले ताटही पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी श्रीनिवास याचा शोध सुरू केला आहे.
हैदराबादमधील हत्याकांडाची तिसरी घटना
हैदराबादमधील तरुणीच्या हत्याकांडाची तिसरी घटना २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. कोथागुडा भागातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या २९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. या तरुणीबरोबर हॉटेलमध्ये थांबलेल्या एस. रवी तेजा नामक तरुणाने तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याने रवी तेजा फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची झारखंडची असलेली ही तरुणी हैदराबादमधील एका खासगी कंपनीत काम करत होती. त्याच कंपनीत आरोपी रवी हादेखील काम करत होता. कालांतरात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होता. २१ सप्टेंबर रोजी या जोडप्याने कोथागुडा भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती.
लग्नासाठी दबाव टाकत असल्याने प्रेयसीची हत्या
२२ सप्टेंबरच्या सकाळी रवीने हॉटेल कर्मचाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. बाथरूममध्ये पाय घसरल्याने आपल्यासोबत असलेली तरुणी बेशुद्ध होऊन पडली असा बनाव त्याने केला होता. त्यानंतर संबंधित तरुणीला तत्काळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. यादरम्यान डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित करताच आरोपी रवी हा तिथून पसार झाला. याबाबत माधापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आणि चेहऱ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी रवीला अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुणी त्याच्याकडे लग्नासाठी सातत्याने तगादा लावत होती, यावरून झालेल्या वादातून त्याने तिच्यावर धारदार वस्तूने वार केले. हल्ल्याच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. मारहाण केल्यानंतर तो तिथेच झोपी गेला आणि सकाळी उठून पाहतो तर ती मृतावस्थेत आढळली, असा कबुलीजबाब त्याने पोलिसांना दिल्याचे समजते. हैदराबादमध्ये गेल्या १० दिवसांत तरुणींच्या हत्याकांडाच्या तीन घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. त्यातील एका प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
