Hypertensive Emrgency Symptoms : तीव्र डोकेदुखी म्हणजे स्ट्रोकचे लक्षण असे आपण समजतो आणि आपली प्रकृती अधिक चिंताजनक बनत जाते. पण, खरंतर तीव्र डोकेदुखी हे स्ट्रोकचे लक्षण नसून तुमच्या शरीराशी संबंधित चिंताजनक बाब आहे. डॉक्टरांनी सांगितले, ३० वर्षीय महिला ऑफिसमधून बाहेर पडून त्यांच्या ओपीडीमध्ये उपचारासाठी आली. तिला भयंकर डोकेदुखी असल्याचे तिने सांगितले. यामध्ये ती एवढी अस्वस्थ झाली की तिला बोलताही येत नव्हते, यामुळे तिने स्वत:चीच खात्री करून घेतली की तिला स्ट्रोक येत आहेत. पण प्रत्यक्षात तसे नव्हते, तिचा रक्तदाब उच्च पातळीवर वाढला, ज्यामुळे तिला स्ट्रोक आल्याचे वाटत होते. पण, हे ‘हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी’ म्हणजेच ‘उच्च रक्तदाबाच्या इमर्जन्सी’ची लक्षणं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीची लक्षणं काय आणि ती शरीरासाठी किती घातक ठरू शकतात, या याबद्दल डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणजे काय?
उच्च रक्तदाबाला (High Blood Pressure) अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. कारण अनेक लोकांना वर्षानुवर्षे वाढत्या रक्तदाबाचा त्रास असतो, पण त्याची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण तो हळूहळू शरीरातील रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू आणि मूत्रपिंड यांचे नुकसान करत राहतो; त्यामुळे अनेकांना रक्तदाब असूनही ते पूर्णपणे निरोगी असल्यासारखे वाटतात.
अनेक लोकांचा रक्तदाब 140/90 mmHg च्या आसपास असला तरी त्यांना लगेच लक्षणं जाणवत नाहीत. मात्र, या रक्तदाबाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास भविष्यात स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे आजार आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. मात्र, हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी ही यापेक्षा वेगळी आणि अत्यंत गंभीर अवस्था आहे. जेव्हा रक्तदाब अचानक 180/120 mmHg किंवा त्याहून अधिक होतो आणि त्याचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड किंवा डोळे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो, तेव्हा ती अत्यंत चिंताजनक गोष्ट असते. अशा अवस्थेत तीव्र डोकेदुखी, गोंधळल्यासारखे वाटणे, बोलण्यात अडचण येणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धूसर दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.
मात्र, केवळ रक्तदाबाची तीव्रता पाहूनच या इमर्जन्सीचा अंदाज लावता येत नाही. काही लोकांमध्ये रक्तदाब 180/120 mmHg पेक्षा कमी असतो, पण तो वेगाने वाढला असेल आणि त्यांना आधीपासून इतर काही गंभीर आजार असतील तर हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीची लक्षणे दिसू शकतात; म्हणूनच डॉक्टर उपचार करताना केवळ रक्तदाबाचा आकडा पाहत नाहीत तर रुग्णाची लक्षणे, प्रकृती आणि इतर वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन पुढील तपासणी करतात.
जर एखाद्या व्यक्तीमध्ये स्ट्रोकसारखी लक्षणे अचानक दिसू लागली, रक्तदाब किती आहे हे माहीत नसले तरीही त्वरित रुग्णालयात किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवेत उपचार घ्यावेत.
हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीची लक्षणे कोणती?
१. हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीमध्ये मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे रुग्णाला यापूर्वी कधीही न झाल्यासारखी अचानक तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
२. दृष्टी धूसर होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, बोलण्यात अडचण येणे किंवा स्पष्ट बोलता न येणे, अशी लक्षणे दिसू शकतात.
३. काही रुग्णांना गरगरणे, मळमळ, तोल जाणे, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
ही लक्षणे स्ट्रोकची असोत किंवा हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीची, दोन्ही परिस्थितीत वेळ अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीला अचानक बोलण्यात अडचण, चेहरा एका बाजूला वाकणे, हात किंवा पायात कमजोरी, दृष्टीत बदल, गोंधळ किंवा कारण नसताना तीव्र डोकेदुखी सुरू होत असेल तर त्वरित रुग्णालयात जाऊन आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी. कारण ही लक्षणे नेमकी कशामुळे आहेत हे केवळ वैद्यकीय तपासणीनंतरच समजू शकते.
रक्तदाब अचानक का वाढतो? जाणून घ्या प्रमुख कारणे
उच्च रक्तदाब हा एकाच दिवसात गंभीर होत नाही. अनेक वर्षे रक्तदाब वाढलेला राहिल्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात, त्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाचे आजार तसेच दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो.
मात्र, काही कारणांमुळे रक्तदाब अचानक धोकादायक पातळीवर पोहोचू शकतो.
१. रक्तदाबाच्या औषधांचा डोस चुकणे किंवा औषधे अचानक बंद करणे
२. दीर्घकाळ नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब
३. मूत्रपिंडाचे आजार
४. काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम
५. अचानक झालेला गंभीर आजार किंवा संसर्ग
६. तीव्र वेदना (Severe Pain)
७. तीव्र मानसिक किंवा शारीरिक तणाव (Stress)
जेव्हा एखादी व्यक्ती तीव्र मानसिक किंवा शारीरिक तणावात असते, तेव्हा शरीरात ॲड्रेनालिन (Adrenaline) आणि कॉर्टिसोल (Cortisol) हे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्रवत असतात.
या हार्मोन्समुळे,
हृदयाचे ठोके वेगाने पडतात
रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
परिणामी रक्तदाब तात्पुरता वाढतो
तणावाचाही रक्तदाबावर होतो परिणाम
डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाली. ती काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होती.
त्यांच्या मते, दीर्घकाळ तणावात राहणे, अयोग्य आहार, काही विशिष्ट औषधे आणि काही वैद्यकीय आजार यांमुळे शरीरातील महत्त्वाची खनिजे (Minerals) कमी होऊ शकतात. विशेषतः मॅग्नेशियम (Magnesium) आणि काही परिस्थितींमध्ये पोटॅशियमचीदेखील (Potassium) कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधे घेणे पुरेसे नसते. त्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे.
१. नियमितपणे रक्तदाब तपासून घ्या
२. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर आणि नियमित घ्या
३. आहारात मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा
४. फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या
५. नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करत राहा
६. वजन नियंत्रणात ठेवा
७. दररोज पुरेशी आणि चांगली झोप घ्या
८. तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा इतर उपायांचा अवलंब करा
९. डॉक्टरांकडे नियमित आरोग्य तपासणीसाठी भेट द्या.
या दैनंदिन सवयी सामान्य वाटू शकतात, पण याच छोट्या गोष्टी भविष्यात हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी, स्ट्रोक आणि हृदयविकारासारख्या गंभीर आपत्कालीन परिस्थिती टाळण्यास मोठी मदत करू शकतात.
