Who is IAS Saurabh Katiyar : पेपरफुटी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाचा अतिरिक्त कारभार वरिष्ठ सनदी अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आला. एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तातडीने रजेवर जावे लागल्याने त्यांच्याकडील कारभारही अन्य अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणाही केली. या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे आयएएस सौरभ कटियार नेमके आहे तरी कोण? प्रशासकीय सेवेत त्यांचा प्रवास कसा राहिला आहे? याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली, त्याविषयी..

अन्न व औषध प्रशासनाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करत पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. जवळपास ११ दिवस चाललेल्या या आंदोलनाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. अखेर आयोगाचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तुर्तास रजेवर पाठवण्यात आल्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. त्यांच्या रजेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून निर्माण झालेला तिढा सोडवण्यात राज्य सरकारला यश आले. यादरम्यान आपण संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे भीमनवार यांनी सांगितले. या कथित पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्तावही राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

कोण आहेत आएएस सौरभ कटियार?

सौरभ कटियार हे २०१६ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुरुवातीला सौरभ यांनी बंगळुरूतील क्वालकॉम या कंपनीत नोकरी केली होती. मात्र, समाजासाठी काम करण्याची इच्छा आणि विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. सौरभ यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात डहाणूतील आदिवासी विकास प्रकल्पापासून झाली. त्यानंतर त्यांनी अकोला, अमरावती आणि मुंबई उपनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून पाडली छाप

अमरावती जिल्हाधिकारी असताना सौरभ यांनी मेळघाटातील माता आणि बालकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले होते. मेळघाटात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या अनेक वर्षांपासून गंभीर आहे. त्यामुळे या भागातील माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सौरभ यांनी ‘मिशन २८’ हा उपक्रम राबवला. प्रसूतीच्या आसपासचा काळ आई आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याद्वारे उच्च जोखमीच्या गर्भधारणांवर लक्ष ठेवणे, गर्भवती महिलांचा नियमित पाठपुरावा करणे तसेच तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्यसेवा अधिक सुलभ करणे यावर भर देण्यात आला होता. सौरभ यांच्या या उपक्रमाचे अमरावतीसह संपूर्ण विदर्भ कौतुक झाले होते.

मुंबई उपनगरातील जटिल प्रश्नही हाताळले

अमरावतीत काही काळ काम केल्यानंतर प्रशासनाने सौरभ यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या या जिल्ह्यातही सौरभ यांनी जमीन महसूल प्रशासन आणि अतिक्रमणांचे जटिल प्रश्न हाताळले. मात्र, या जबाबदारीदरम्यान त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या तीव्र नाराजीचाही सामना करावा लागला होता. ऑगस्टमध्ये कांदिवली पश्चिमेतील चारकोप परिसरातील एका नैसर्गिक तलावाभोवतीची अतिक्रमणे हटवण्यास होत असलेल्या विलंबावरून उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच, ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. त्यानंतर सौरभ यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून अतिक्रमणे हटवली. पुढे न्यायालयाने संबंधित ठिकाणच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याची नोंदही घेतली. तरीही तिथे अधिक स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.

सौरभ कटियार लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी

दरम्यान प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या सौरभ कटियार यांच्याकडे आता राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणावरून वादात सापडलेले याआधीचे सचिव महेंद्र हरपळकर यांच्या बदलीनंतर सौरभ यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आणि त्यावरील सरकारचा निर्णय होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन आयोगाचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभारही अन्य सदस्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणते धागेदोरे समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.