Arvind Krishna warns AI could replace Jobs सध्या जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये एआयने आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याचे अनेक रिपोर्टसमधून समोर आले आहे. ‘एआय’मुळे अनेक कामे स्वयंचलित होत आहेत, त्यामुळे तरुणांना भविष्याचा प्रश्न सतावत आहे. ‘एआय’च्या मदतीने अत्यंत क्लिष्ट कामही आता शक्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत, ‘आयबीएम’ या प्रसिद्ध आयटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) अरविंद कृष्णा यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) कोणत्या नोकऱ्यांवर सर्वाधिक गदा येऊ शकते याविषयी सांगितले आहे. अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे, याबद्दलही ते बोलले आहेत. AI मुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे? कर्मचाऱ्यांनी काय करावे? एआय नक्की कसे काम करते? समजून घेऊयात.
कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका?
अरविंद कृष्णा यांच्या मते, ‘कॉल सेंटर’मधील नोकऱ्यांवर ऑटोमेशनचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. ते म्हणाले की, जस जसे एआय तंत्रज्ञान ग्राहकांशी संवाद साधण्यात अधिक सक्षम होईल, तसतसे काळानुरूप अशा निम्म्याहून अधिक नोकऱ्या नष्ट होतील. याबरोबरच, आयटी आणि एचआर हेल्पडेस्कमधील अंतर्गत सपोर्ट फंक्शन्सनाही धोका आहे. या अशा नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये पुनरावृत्ती होणारी कामे आणि ठराविक साचा असतो आणि नेमक्या याच कामांमध्ये आधुनिक एआय तरबेज आहे. ते म्हणाले, “कॉल सेंटरमधील ५० टक्के नोकऱ्या येणाऱ्या काळात कमी होताना मला दिसत आहेत.”
अरविंद कृष्णा यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, कागदपत्रांवर आधारित कामे, जसे की ‘अकाउंट्स पेएबल’ आणि ‘रिसीव्हेबल’मधील नोंदी जुळवणे, ही कामे येणाऱ्या काही महिन्यांत किंवा वर्षांत पूर्णपणे स्वयंचलित होऊ शकतात. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, ज्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या ऑटोमेशनमुळे जातील, त्यांना नवीन भूमिकांमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी कंपन्या आणि सरकारकडून उपलब्ध होणारी नवीन कौशल्ये शिकवण्याची गरज असेल.
अरविंद कृष्णा यांनी ‘संशोधन आणि विकास’ क्षेत्राला विकासाचे क्षेत्र म्हटले आहे. ते म्हणाले की, आयबीएमने ठराविक साच्यात असणाऱ्या काही नोकऱ्या कमी केल्या असल्या तरी प्रगत क्षेत्रांमध्ये भरती वाढवली आहे. ते म्हणाले, “संशोधन आणि विकासासारख्या उत्पादक क्षेत्रांमध्ये नोकरभरती मोठ्या प्रमाणात वाढेल.” नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, “नवीन निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण हे कमी होणाऱ्या नोकऱ्यांपेक्षा जास्त असेल.” यातून हे स्पष्ट होते की, एआयमुळे भविष्यात काही विशिष्ट नोकऱ्या कमी झाल्या तरी कल्पकता, गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे आणि धोरणात्मक विचारांची गरज असलेल्या नोकऱ्यांची मागणी वाढेल.
‘एआय’वर आधारित स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा अभ्यास
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, एआय आधीच अमेरिकेतील श्रम बाजारामध्ये मोठे बदल घडवत आहे. मात्र, याचा परिणाम सगळ्यांवर सारखा होत नाहीये. विशिष्ट वयोगटाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. स्टॅनफोर्डच्या संशोधनानुसार, २०२१ च्या उत्तरार्धात जेव्हा चॅटजीपीटी आणि कोपायलटसारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला, तेव्हापासून एआयचा प्रभाव असलेल्या नोकऱ्यांमध्ये २२ ते २५ वयोगटातील म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांच्या रोजगारात १३ टक्के घट झाली आहे.
यात असेही दिसून आले की, गुंतागुंतीच्या समस्या सोडवणे आणि धोरणात्मक विचारांची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारात सहा ते नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असेच काहीसे अकाउंटिंग, ऑडिटिंग, प्रशासकीय काम, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग व विक्री यांसारख्या क्षेत्रांमध्येही दिसून आले. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एरिक ब्रिनजॉल्फसन यांनी स्पष्ट केले, “अनुभवी कामगारांकडे अधिक ज्ञान असते, कारण ते अनुभवामधून अनेक गोष्टी आणि नवनवीन युक्त्या शिकतात. त्यांच्याकडे असे ज्ञान असते, जे एलएलएममध्ये नसते; त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका कमी असतो.”
असेच काहीसे गोल्डमन सॅक्स आणि बँक ऑफ अमेरिकासारख्या गुंतवणूक बँकांच्या अहवालांमध्येही नमूद करण्यात आले आहे. या बँका असे सांगतात की, एआय असलेल्या उद्योगांमध्ये कॉलेजची पदवी असण्याचा आर्थिक फायदा कमी होत आहे, त्यामुळे अनेक नवीन पदवीधरांना नोकरीच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
अनेक तज्ज्ञ असे मानतात की, जे कामगार एआय कौशल्य शिकतील ते झपाट्याने बदलणाऱ्या उद्योगांमध्ये टिकून राहतील. अनेकांना एआयमुळे वेतनात मोठी घट होईल अशी भीती वाटत आहे; मात्र या अभ्यासानुसार सर्व वयोगटांतील व्यक्तींच्या पगारावर अद्याप तरी परिणाम झालेला नाही. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी, वेतनात घट होण्याऐवजी नोकरीच्या संधी कमी होणे हे मोठे आव्हान आहे.
डेटाची कमतरता असलेल्या क्षेत्रांना धोका कमी
आरोग्य सेवासारख्या क्षेत्रात सार्वजनिक डेटाच्या कमतरतेमुळे आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जात आहे. शस्त्रक्रियेशी संबंधित १० टक्केपेक्षा कमी डेटा सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहे. रुग्णांची माहिती, विविध रुग्णालये, विमा कंपन्या आणि दवाखान्यांमध्ये विखुरलेली असते; त्यामुळे एआयला प्रभावीपणे शिकता येत नाही. बांधकाम क्षेत्र एआयपासून सर्वात सुरक्षित असू शकते. घर बांधणे या उद्योगात डिजिटल नोंदी फार कमी ठेवल्या जातात. प्रत्येक प्रकल्प वेगळा असतो आणि कागदपत्रे ठेवण्याची कोणतीही ठरलेली पद्धत नसते. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेच्या कायद्यांमुळे शिक्षणातील एआयच्या वापरावर मर्यादा येतात.

