Tech layoffs 2025 जगभरातील टेक क्षेत्रात सध्या उलथापालथ पहायला मिळत आहे. अमेझॉन, गूगल, इंटेल आणि ॲक्सेंचरसारख्या मोठ्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. नोकर कपातीची ही मालिका अजूनही सुरूच आहे. आता तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एका दिग्गज कंपनी ‘आयबीएम’ने (IBM) नोकर कपात करण्याची घोषणा केली आहे. ‘आयबीएम’ने म्हटले आहे की, ते २०२५ च्या अखेरीस आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत. या निर्णयाचे कारण काय? याचा परिणाम कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार? या उलथापालथीचे कारण काय? जाणून घेऊयात…
हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
‘सीएनबीसी’च्या वृत्तानुसार कंपनी उच्च-नफ्याचे सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सेवांकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळेच हा नोकरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरकपातीच्या या निर्णयाचा परिणाम हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ‘आयबीएम’च्या प्रवक्त्याने ‘सीएनबीसी’ला सांगितले, “चौथ्या तिमाहीत आम्ही एक असा निर्णय घेणार आहोत, ज्याचा आमच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येतील एक टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. या निर्णयाचा परिणाम काही अमेरिकेतील नोकऱ्यांवर होऊ शकतो.”
२०२४ च्या अखेरीस, ‘आयबीएम’मध्ये सुमारे २,७०,००० कर्मचारी कार्यरत होते, त्यामुळे कंपनीने केवळ एक टक्का कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला. हा एक टक्का म्हणजे जवळजवळ तीन हजार कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. कंपनीचा हा निर्णय तंत्रज्ञान उद्योगातील वाढत्या ट्रेंडचाच एक भाग आहे. गूगलसारख्या अनेक मोठ्या कंपन्या या अंतर्गत आपल्या सपोर्ट कर्मचाऱ्यांची कपात करून कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘आयबीएम’च्या निर्णयामागील कारण काय?
नोकरकपातीचा आगामी टप्पा हा मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील ‘आयबीएम’च्या व्यापक संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील ही मोठी कंपनी आता एआय-आधारित क्लाउड सेवा आणि सॉफ्टवेअरवर आपले लक्ष केंद्रित करत आहे, कारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दर्शविली गेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या उत्पन्नाच्या अहवालात, सॉफ्टवेअर महसुलात १० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका वृत्तानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला ‘आयबीएम’ने मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमधील नोकरकपाती केल्या होत्या आणि सुमारे २०० ह्युमन रिसोर्सच्या पदांची जागा एआय एजंट्सनी घेतली होती. ‘आयबीएम’चा हा नवीनतम निर्णय सध्याच्या तंत्रज्ञान उद्योगातील ट्रेंडचा एक भाग आहे. बहुतांश कंपन्या कामकाज सुलभ करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. गेल्या महिन्यात ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अमेझॉनने १४,००० कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची घोषणा केली. तसेच फेसबुकची मूळ कंपनी मेटाने त्यांच्या एआय विभागात ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.
नोकरकपात होऊनही, ‘आयबीएम’चा दावा आहे की अमेरिकेत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे स्थिर राहील. याचा अर्थ असा होऊ शकतो की नोकरकपात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये किंवा कंपनीच्या काही व्यवसाय युनिट्समध्ये अधिक केंद्रित असू शकते. नोकरकपातीमुळे प्रभावित होणाऱ्या विभागांची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही नियमितपणे आमच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा आढावा घेतो आणि त्यानुसार वेळोवेळी त्यांची संख्या संतुलित ठेवतो.”
कंपनीने या निर्णयावर काय म्हटले?
‘आयबीएम’ने AskHR ही एआय प्रणाली लागू केल्यामुळे प्रशासकीय आणि बॅक-ऑफिस भूमिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली. या नोकऱ्या स्वयंचलित (automatable) मानल्या गेल्या. तरीही, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांनी सार्वजनिकरित्या कबूल केले की या परिणामामुळे नोकऱ्यांमध्ये निव्वळ तोटा झाला नाही. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या निवेदनात कृष्णा यांनी सांगितले की, “आमच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात वाढली आहे, कारण एआयमुळे तुम्हाला इतर क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळते.” त्या क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, विक्री आणि विपणन यांचा समावेश होतो. त्यात कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने आवश्यकता असते, कारण हे काम एआय अजूनही करू शकत नाही.
२०२३ मध्ये ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
२०२३ मध्येही आयबीएमने सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना, प्रामुख्याने त्यांच्या ह्युमन रिसोर्स विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. हा निर्णय कंपनीच्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म AskHR मुळे घेण्यात आला. वेतन प्रक्रिया, सुट्टीच्या विनंत्या यांसारख्या विविध सपोर्ट कामांसाठी ही कंपनी अंतर्गत विकसित केलेली एआय प्रणाली आहे. या प्रणालीमुळे हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
गेल्या महिन्यात ३० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा ॲमेझॉनने केली. त्या आधी ऑक्टोबरच्या मध्याला नेस्लेने १६,००० कर्मचारी कमी करत असल्याचे जाहीर केले. या अशा बातम्या निरंतर सुरूच आहेत आणि जगभरात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रांतील पगारदारांची चिंता वाढली आहे. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचाही फटका आयटी सेक्टरला बसल्याचे पहायला मिळत आहे. ‘Wired’ च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गूगलनेही AI मॉडेल्स विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी मदत करणाऱ्या २०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. याच एआयमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
