कॉर्पोरेट विश्व किंवा उत्पादन क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांमधील जाहिरात युद्ध नेहमीच औत्सुक्य आणि करमणुकीचा विषय असते. कोकाकोला वि. पेप्सी, मॅकडोनाल्ड्स वि. बर्गर किंग, एअरबस वि. बोइंग या कंपन्यांच्या एकमेकांच्या उत्पादनांची खिल्ली उडवणाऱ्या किंवा आव्हान देणाऱ्या जाहिराती चर्चेत असतात. त्यात आता तंत्रज्ञानक्षेत्रात तीन दिग्गज कंपन्या ॲपल, सॅमसंग आणि गुगलची भर पडली आहे. ॲपलच्या आयफोन १७चे नुकतेच अनावरण करण्यात आले. हा आयफोन पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार असतानाच आता सॅमसंग आणि गुगलकडून त्याची ‘टिंगल’ उडवणारी मोहीम समाजमाध्यमांवरून सुरू झाली आहे.

सॅमसंगची थेट टिप्पणी

ॲपलने १६ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील आपल्या मुख्यालयातून आयफोन १७, आयफोन १७ प्रो मॅक्स, आयफोन १७ एअर यांसह ॲपल वॉच आणि एअरपॉड्स सादर केले. ‘अतिशय आश्चर्यजनक’ (Awe Dropping!) असे नाव ॲपलने या अनावरण सोहळ्याला दिले होते. आयफोनबाबत दरवर्षी वाटणारी उत्कंठा, तिच्या नवीन वैशिष्ट्यांबद्दलचे कौतुक या भावनांना भर घालण्यासाठी ॲपलने हे नामकरण केले असले तरी, नेमक्या याच मुद्द्यावरून सॅमसंगने आयफोनची टेर उडवली आहे.

‘#iCant’ मोहीम काय?

ॲपलने यंदा आजवरचा सर्वात पातळी आयफोन म्हणून ‘आयफोन १७ एअर’ बाजारात आणला आहे. हा यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असल्याचा दावा ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी केला होता. मात्र, त्यावरच सॅमसंगने टिप्पणी केली आहे. ‘आयफोन १७ एअर’चे थेट नाव न घेता ‘यात काय नवीन’ अशा आशयाची पोस्ट सॅमसंगने केली आहे. सॅमसंग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ‘फोल्डेबल’ अर्थात दुमडून ठेवता येण्यासारखे स्मार्टफोन बाजारात आणत आहे. तोच धागा पकडून सॅमसंगने २०२२मधील ‘let us know when it folds’ या ट्विट (सध्याच्या ‘एक्स’)चा आधार घेत ‘हे ट्विट अजूनही लागू पडते’ अशा आशयाची पोस्ट केली आहे.

तीन कॅमेऱ्यांचीही टिंगल

आयफोनच्या ‘१७ प्रो मॅक्स’मध्ये प्रत्येकी ४८ मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे असल्याच्या मुद्द्यावरही सॅमसंगने ॲपलला टोला लगावला आहे. आपल्या श्रेणीत २०० मेगापिक्सेलचा स्मार्टफोन असल्याचे जाणवून देताना ‘४८ला तीनने गुणले तरी २०० होत नाही’ अशा आशयाची पोस्टही सॅमसंगने केली आहे. आयफोन आणि ॲपलवॉचमध्ये नव्याने ‘स्लीप स्कोअर’ जाणून घेण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यावर ‘काही जणांना ‘स्लीप स्कोअर’साठी पाच वर्षे वाट पाहावी लागली’ असा टोमणा सॅमसंगने लगावला आहे.

गुगलकडूनही टिंगल

एकीकडे सॅमसंगकडून आयफोनच्या ‘त्रुटी’ दाखवण्याची मोहीम सुरू असताना गुगलने ‘ॲपल इंटिलिजन्स’वरून कंपनीला छेडले आहे. आयफोनचे अनावरण होण्याच्या दिवशीच गुगलने आपल्या ‘पिक्सेल १० प्रो’ची नवी जाहिरात जारी केली. त्यात एका शेतात ‘आयफोन’ कोंबडीच्या पिल्लांना गाण्यासाठी सक्ती करत असल्याचे दिसते. त्यावेळी ‘पिक्सेल १० प्रो’ ‘आयफोन’ला ‘हे काय चालले आहे?’ अशी विचारणा करतो. त्यावर ‘पिक्सेलने जे केले ते करण्याचा प्रयत्न करत आहे’ असे उत्तर आयफोन देतो. यावरून ‘आम्ही ‘जिमिनाय’ वरून (Gemini AI) असे व्हिडिओ बनवतो. खऱ्या कोंबड्यांचे नाही’ असा टोला ‘पिक्सेल १० प्रो’ लगावतो. या विनोदी जाहिरातीतून ॲपल इंटिलिजन्स गुगलच्या ‘जिमिनाय’पेक्षा खूपच मागे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न गुगलने केला आहे.

ॲपलचे मौन, चाहत्यांकडून पाठराखण

सॅमसंग आणि गुगलच्या या मोहिमेवर ॲपलने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या आयफोन १७ बाजारात आणण्यासाठी ॲपलची लगबग सुरू आहे.त्यामुळे कंपनी या ‘जाहिरात युद्धात’ तूर्त पडणार नाही, अशी चिन्हे आहेत. मात्र, समाजमाध्यमांवरून सुरू असलेल्या या ‘टोलेबाजी’वर ॲपल आणि आयफोनचे चाहते मात्र, नाराजी व्यक्त करत आहेत. ‘दहा वर्षांनंतरही आयफोन असाच राहील’ असे एका वापरकर्त्याने अभिमानाने म्हटले आहे तर अन्य एकाने ‘दुमडणारे फोन अजूनही काळानुरूप आहेत का?’ असा सवाल केला आहे.