आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या प्रमुख जागतिक पुरुष स्पर्धांच्या स्वरूपात व्यापक बदलांना मंजुरी दिली आहे. यामध्ये एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकांसाठी स्पर्धेची नवीन रचना तयार करण्यात आली असून, त्यासोबतच ‘असोसिएट’ (सहयोगी) देशांसाठी १६ संघांच्या एका नवीन जागतिक स्पर्धेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये केलेले नवीन बदल कोणते याचा घेतलेला हा आढावा.
एकदिवसीय विश्वचषकासाठी नवीन रचना
पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने स्पर्धेच्या एका सुधारित स्वरूपाला मंजुरी दिली. यात १४ संघांचा सहभाग कायम राहणार असला, तरी खेळाडू आणि चाहते यांच्यासाठी ही स्पर्धा अधिक रोमांचक आणि आकर्षक ठरेल. ‘आयसीसी’ पुरुष क्रिकेट विश्वचषकात १४ पात्र संघांचा सहभाग असेल, परंतु सुधारित स्वरूपानुसार अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी तीन टप्प्यांची स्पर्धा घेतली जाईल. यामुळे पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर चुरशीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही रचना तयार करण्यात आली आहे. यात पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील सामन्यांचे महत्त्व अधिक असेल, तसेच अत्यंत चुरशीच्या ‘सुपर ७’ टप्प्यात पात्र ठरलेले सात संघ उपांत्य फेरीसाठी स्थान मिळवण्यासाठी ‘राउंड-रॉबिन’ पद्धतीने सामने खेळतील. त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरी खेळतील. वाढलेले महत्त्व आणि स्पर्धेतील अधिक तीव्र चुरस यामुळे चाहत्यांचा एकूण अनुभव अधिक चांगला होईल, तसेच उदयोन्मुख संघांना क्रिकेटच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर स्पर्धा करण्याची संधीही मिळत राहील. यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकात ‘सुपर सिक्स’ (अव्वल सहा) गट असायचा.
एकदिवसीय विश्वचषक पात्रता कशी
या स्पर्धेत १० संघांना थेट प्रवेश मिळेल. सह-यजमान देशांपैकी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे ‘आयसीसी’चे पूर्णवेळ सदस्य असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र, तिसरा सह-यजमान देश नामिबिया हा असोसिएट (सहयोगी) सदस्य असल्याने त्याला थेट प्रवेश मिळालेला नाही. ‘आयसीसी’ एकदिवसीय क्रमवारीमधील अव्वल ८ संघ उर्वरित जागा भरतील, तर उर्वरित ४ संघ जागतिक पात्रता फेरीतून ठरवले जातील.
पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कोणती रचना
‘आयसीसी’च्या प्रमुख स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या क्रिकेट राष्ट्रांचा विस्तार करण्यासाठी ‘आयसीसी’ पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उदयोन्मुख संघांच्या कामगिरीने प्रेरित होऊन, ‘आयसीसी’ने स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (सुपर १० टप्पा) खेळणाऱ्या संघांची संख्या ८ वरून १० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी उदयोन्मुख संघांना या टप्प्यासाठी पात्र ठरण्याची संधीही कायम ठेवण्यात आली आहे. गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दुसरे संघ शोधण्यासाठी एलिमिनेटर फेरीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गटातील दुसऱ्या क्रमांकाचे संघ दुसऱ्या गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळतील. यामुळे ‘सुपर १०’ टप्प्यात क्रिकेटमधील उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रतिनिधित्व वाढेल आणि स्पर्धेचा दर्जाही अधिक उंचावेल. ट्वेन्टी-२० विश्वचषकात याआधी ‘अव्वल आठ’ गटाचा समावेश होता.
ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता रचनेत बदल
आयसीसी पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२८ च्या पात्रता प्रक्रियेत, २०२६ च्या स्पर्धेत अगदी शेवटच्या क्षणी बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला सहभागी व्हावे लागले होते, त्या विशेष परिस्थितीची दखल घेत स्कॉटलंडला २०२८ च्या युरोप प्रादेशिक अंतिम फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. ‘आयसीसी’ पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळलेले परंतु थेट पात्रता (ऑटोमॅटिक क्वालिफिकेशन) न मिळवू शकलेल्या उर्वरित संघांना ‘जागतिक पात्रता फेरी’तून जावे लागेल. जागतिक पात्रता फेरीतील उर्वरित ८ जागा प्रादेशिक पात्रतेद्वारे भरल्या जातील. यामध्ये आफ्रिका, आशिया आणि युरोपमधून प्रत्येकी २ संघ आणि अमेरिका व पूर्व आशिया-पॅसिफिक क्षेत्रातून प्रत्येकी १ संघ पात्र ठरेल. जागतिक पात्रता फेरीत प्रत्येक प्रदेशातून सर्वोत्तम स्थान मिळवणारा संघ आणि त्यासोबतच एकूण क्रमवारीत त्यानंतरचे सर्वोत्तम स्थान मिळवणारे तीन संघ, ‘किमान कामगिरीचे निकष’ या अटीवर, ‘आयसीसी’ पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२८ साठी पात्र ठरतील.
बदललेल्या रचनेबाबत मत काय
‘आयसीसी’ पुरुष एकदिवसीय विश्वचषकात नवीन रचनेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी तीन टप्प्यांत स्पर्धा होईल. त्यामुळे स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढेल. त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण होईल. यामुळे चाहत्यांनाही खेळाचा आनंद घेता येइल आणि उदयोन्मुख संघाला क्रिकेटच्या मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असे ‘आयसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मंडळाने एडिनबरो येथे आपल्या वार्षिक बैठकांमध्ये हे निर्णय घेतले. या बदलांना ‘आयसीसी’च्या क्रिकेट विकास आणि मुख्य कार्यकारी समितींच्या शिफारसीनंतर मंडळाने मंजूरी दिलीअसली, तरी, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत ‘आयसीसी’च्या वाणिज्य समितीकडून समीक्षा केल्यानंतरच या बदलाला अंतिम मान्यता मिळेल.
