मनमोहक पिवळसर रंग, अद्वितीय गंध, मधूर स्वाद आणि रसरशीत गर यांमुळे फळांचा राजा आंबा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. अवीट गोड चव असणाऱ्या आंब्याचा मोह होणार नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सध्या बाजारपेठांमध्ये विविध जातीचे आंबे यायला सुरुवात झाली असून अनेक जण आमरस-पुरीचा बेतही करत आहेत. मात्र आंबे विकत घेताना सावध भूमिका घेऊन काळजीपूर्वक खरेदी करणे आवश्यक आहे. कारण काही विक्रेते रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांची विक्री करत आहेत. हैदराबादमध्ये नुकतीच पोलिसांनी कॅल्शियम कार्बाइडच्या साहाय्याने आंबे पिकवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याविषयी…
हैदराबादमध्ये कोणती कारवाई?
हैदराबादच्या बाजारपेठांमध्ये आंब्यांचा साठा येऊ लागताच, आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अवैध पद्धतीने रसायनांचा वापर करून आंबे पिकवणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार आंब्यांची तपासणी केली जात आहे. ४ व ५ एप्रिल रोजी पोलिसांनी दोन घाऊक फळ व्यापाऱ्यांना अटक केली. आंबे पिकवण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात रसायनांचा वापर करत असल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आंबे पिकवण्यासाठी त्यामध्ये ‘डायमंड राईप इथिलीन’ वापरत असल्याचे तपासात आढळून आले. हैदराबाद अन्नभेसळ पाळत पथकाने (एच-फास्ट) पिकवण रसायनांची दोन डझनहून अधिक पाकिटे जप्त केली असून शहरातील अनेक गोदामांवर छापे टाकून सात टन आंबेही जप्त करण्यात आले. इथिलीन आणि कॅल्शियम कर्बाइड वापरून हे आंबे पिकवल्याचा संशय आहे. या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
कृत्रिम पद्धतीने आंबा कसा पिकवला गेला?
हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले की, आंबे पिकवण्यासाठी ठेवलेल्या गोदामांवर, वेअरहाऊसवर आणि घाऊक आंबे विकणाऱ्या दुकानांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ‘एच-फास्ट’वर सोपवण्यात आली आहे. ‘एच-फास्ट’च्या पथकांनी शहराच्या विविध भागांत छापे टाकले. या कारवाईदरम्यान कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर करून आंबे पिवकल्याचे समोर आले. रसायनांच्या मदतीने आंबे वेळेआधीच पिवळेधमक आणि आकर्षक दिसतील, असे केले जातात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आंब्याच्या रंगात आणि गंधामध्ये बदल केले जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सामान्यतः, नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग पूर्णपणे एकसारखा नसतो. याउलट, रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे बाहेरून चमकदार पिवळी दिसतात, पण आतून कच्ची आणि विषारी राहतात.
कोणते आजार होऊ शकतात?
रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्याने प्रकृती बिघडू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. अशा प्रकारची फळे खाल्ल्याने घशात खवखव, मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आरोग्य समस्या उद्धभवू शकतात. दीर्घकाळात मज्जासंस्थेचे नुकसान आणि श्वसनाच्या समस्या यांसारख्या गंभीर आजारांनाही सामारे जावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांचे नागरिकांना काय आवाहन?
हैदराबादमधील पोलिसांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांशी आरोग्यांशी खेळणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कठोर भूमिका घेत आहोत. मात्र नागरिकांनीही फळाच्या बाह्य स्वरूपाला फसू नका. खरेदी करण्यापूवी ते नैसर्गिक असल्याची खात्री करा, असे आवाहन पोलिसांनी केले. ज्या आंब्यांचा रंग कृत्रिम आहे, ज्यांना रासायनिक वास येतो किंवा ज्यांची चव विचित्र आहे, अशा आंब्यांपासून सावध रहा. जर सालीवर असामान्य डाग असतील किंवा बेकिंग सोडाच्या पाण्याने धुतल्यावर रंग अनपेक्षितपणे बदलत असेल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे लक्षात घ्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांनी फळे खरेदी करताना अधिक सावधगिरी बाळगावी आणि संशयास्पद वाटल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
