What is Proof of Citizenship: भारतीय पासपोर्ट हा प्रामुख्याने प्रवासासाठी दिला जातो, पासपोर्टचा वापर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून केला जाऊ नये, असे स्पष्टीकरण बुधवारी (२४ जून) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. ‘पासपोर्ट सेवा दिवसा’निमित्त परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पासपोर्ट हे सरकारकडून दिले जाणारे एक सर्वात अधिकृत कागदपत्र आहे, अशी बहुतांश भारतीयांची धारणा आहे. पासपोर्टवर भारताचे नाव असून त्याला जगभरात स्वीकारले जाते. तसेच सरकारी यंत्रणांकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पासपोर्ट जारी केला जातो.

दीर्घकाळापासून पासपोर्टबाबत कायद्याने घेतलेली भूमिकाच परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एखादी व्यक्ती ही भारतीय नागरिक आहे याबाबत जेव्हा भारत सरकारचे समाधान होते, त्याचवेळी त्या व्यक्तीला पासपोर्ट दिला जातो. पण, पासपोर्टमुळे त्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही. तसेच त्याच्या नागरिकत्वाला जर कायद्याने आव्हान देण्यात आले तर पासपोर्ट हा त्याच्या नागरिकत्वाचा पुरावा ठरत नाही. जर पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर मग नागरिकत्वाचा पुरावा नेमकं काय आहे? याबाबत जाणून घेऊयात.

नागरिकत्व कसे होईल सिद्ध?

या प्रश्नाचे उत्तर भारतीय कायद्याच्या रचनेत दडले आहे. संविधानाच्या कलम ५ ते ११ आणि नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये भारतीय नागरिक कोण आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा दर्शवणाऱ्या एकाही कागदपत्राचा अथवा दस्तऐवजाचा त्यात उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याऐवजी नागरिकत्वाला कायदेशीर दर्जा मानले आहे. हा दर्जा जन्म, वंश, अधिवास किंवा नागरिकीकरण या तथ्यांवर अवलंबून असतो. या तथ्यांचा पुरावा म्हणून कागदपत्रांचा वापर केला जातो. भारतात जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व हे त्याचा जन्म कधी झाला आणि काही विशिष्ट परिस्थितीत, त्याच्या पालकांचे नागरिकत्व काय होते? यावर अवलंबून असते. तर काहींचे नागरिकत्व हे कायदेशीर बाबींच्या पूर्ततेवर अवलंबून असते.

गृह मंत्रालयाने संसदेत नागरिकत्वाच्या पुराव्याबाबत काय म्हटले होते?

गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात नागरिकत्व कसे सिद्ध होते याचे उत्तर संसदेत दिले होते. आधार, पासपोर्ट, व्होटर आयडी, पॅन कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र यांपैकी कोणते दस्तऐवज नागरिकत्व सिद्ध करते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सरकारने उत्तर दिले होते, “भारताचे नागरिकत्व कसे मिळते हे नागरिकत्व कायदा, १९५५ आणि त्यात दिलेल्या नियमांनुसार ठरते. एखाद्या व्यक्तीला भारताचे नागरिकत्व जन्म, वंश, नोंदणी, नागरिकीकरण किंवा एखादा भूप्रदेश भारतात समाविष्ट झाल्यामुळे मिळू शकते. नागरिकत्व मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष आणि नागरिकत्व निश्चित करण्यासाठीच्या तरतुदी नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये देण्यात आल्या आहेत.”

प्रश्नात विचारलेले एकही ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा ठरत नाही, हे या उत्तरातून दिसून आले. दरम्यान, ज्यांना भारताचे नागरिकत्व हवे आहे, त्यांनी त्यांच्या पालकांच्या पासपोर्टची कॉपी सुपूर्त करावी, अशी एक तरतूद नागरिकत्व नियम, २००३ मध्ये देण्यात आली आहे.

पासपोर्टमुळे नागरिकत्व सिद्ध का होत नाही?

पासपोर्ट हे फक्त भारतीय नागरिकांनाच दिले जाते. तसेच पासपोर्टला जगभरात स्वीकारले जाते. एखादी व्यक्ती भारताची नागरिक आहे हे तिच्या पासपोर्टवरून मानले जाते. दरम्यान, पासपोर्ट हे नागरिकत्व दर्शवणारे दस्तऐवज आहे या धारणेला पासपोर्ट कायद्यानेच आव्हान दिले आहे. या कायद्यातील कलम २० नुसार, केंद्र सरकारला पासपोर्ट बहाल करण्याचे अधिकार आहे किंवा हे प्रवासासाठी दिले जाणारे दस्तऐवज (पासपोर्ट) भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तीलाही व्यापक जनहिताच्या दृष्टीने दिले जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विशेष परिस्थितींमध्ये या कलमाचा वापर करून पासपोर्ट बहाल केला जातो. “मुख्यत: भारतीय वंशाचे नागरिक जे आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींमुळे कोणत्याच देशाचे नागरिक सिद्ध होत नाहीत, किंवा भारतातच एखादी व्यक्ती आहे परंतु, तिच्याकडे ती भारताची नागरिक असल्याचा कोणताही पुरावा नाही आणि त्या व्यक्तिला विदेशात प्रवास करायचा आहे, या विशेष परिस्थितींमध्ये पासपोर्ट केंद्र सरकारकडून बहाल केला जातो.”

विदेशी नागरिकांनाही दिला जातो पासपोर्ट?

तिबेटमधून भारतात आलेले स्थलांतरित आणि भारतातील श्रीलंकन तमिळ लोकांना विदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट देण्यात आला होता. २०२३ मध्ये एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने एका तमिळ शरणार्थीला पासपोर्ट कायद्यातील कलम २० नुसार पासपोर्ट देण्यात यावा, असे आदेश केंद्र सरकारला दिले होते. भारताच्या माजी परराष्ट्र सचिव निरूपमा मेनन राव म्हणाल्या, “पासपोर्टमुळे नागरिकत्व सिद्ध होत नाही. तसेच एखाद्या व्यक्तिच्या नागरिकत्वाला न्यायालयात आव्हान देण्यात आले तर तिथेही पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. इतर अनेक लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांप्रमाणेच भारतातही नागरिकत्व कायदा व पासपोर्ट कायदा वेगवेगळा आहे.”

भारतीय व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी भारताकडे एक सविस्तर असा नागरिकत्व कायदा आहे, परंतु, नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही एक विशिष्ट कागदपत्र अथवा दस्तऐवज किंवा ओळखपत्र नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही. हे यावरून दिसून येते.