IIT Will Build Medical Schools : पहाटेच्या वेळी भारतीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज आहे. डॉक्टरांना रुग्णाच्या फुप्फुसांची स्थिती आणि त्याला नेमकी कोणती मदत हवी हे माहीत आहे. पण, अचानक व्हेंटिलेटरवर एरर कोड दिसतो. या मशीनचा नेमका बिघाड काय आहे आणि ते पुढे वापरणे सुरक्षित आहे का याचे उत्तर मात्र डॉक्टरांकडे नाही. कारण मशीन परदेशातून आयात केलेले आहे आणि त्याचा सेवा अभियंता दुसऱ्या शहरात आहे. तो येण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत.
याच रुग्णालयात दुसऱ्या बाजूला आयात केलेल्या अल्ट्रासाऊंड मशीनचा प्रोब (ट्रान्सड्यूसर) छातीची अस्पष्ट प्रतिमा दाखवत आहे. ही अस्पष्टता रुग्णाच्या आजारामुळे आहे की मशीनमध्ये बिघाड झाला आहे हे स्पष्ट होत नाही; तर आणखी एक रोग निदान यंत्र रसायनांचा, म्हणजेच रिएंजटचा साठा संपल्यामुळे बंद पडले आहे. हे सर्व पाहता एक मूलभूत अडचण समोर येते. ती म्हणजे डॉक्टरांना मानवी शरीर आणि आजारांची माहिती आहे, तर अभियंत्यांना यंत्रे आणि त्यांचे तंत्रज्ञान माहीत आहे. पण, वैद्यकीय गरज आणि तंत्रज्ञान या दोन्हींचे प्रशिक्षण एकाच व्यक्तीला मिळालेले नसेल तर रुग्णालयातील अशा समस्या सोडवणे कठीण होते. हाच तो प्रश्न आहे, ज्याकडे देशातील तीन आयआयटींमध्ये सुरू होणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या प्रयत्नातून पाहिले जात आहे.
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक समस्या सोडवण्याची क्षमता आहे. मात्र, ही क्षमता प्रत्यक्ष रुग्णापर्यंत पोहोचताना अनेकदा तंत्रज्ञान, वैद्यकीय ज्ञान आणि प्रत्यक्ष उपचार यांच्यात बरेच अंतर राहते. हेच अंतर कमी करण्यासाठी देशातील तीन प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थांनी वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास या तिन्ही संस्था एकाच वेळी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत आहेत. मात्र, तिन्ही संस्थांचा मार्ग वेगळा आहे. केवळ देशात डॉक्टरांची वाढती गरज भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्था उभारण्याचा निर्णय घेतलेला नाही. वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्यावर या तंत्रज्ञान संस्थांचा भर आहे.
प्रत्येक आयआयटीचा नेमका उद्देश काय?
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या या तिन्ही संस्थांच्या योजना वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे तिन्हींमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आयआयटी कानपूरची थेट उच्च वैद्यकीय शिक्षणापासून सुरुवात
संस्थेच्या गँगवाल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे डीन प्रा. अनिल के. लालवानी यांनी सांगितले की, आयआयटी कानपूर सुरुवातीला एमडी, डीएम आणि एम.सीएच यांसारखे उच्च आणि सुपर स्पेशालिटी वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या माध्यमातून सामान्य वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेल्या डॉक्टरांना हृदयरोग, मेंदू आणि मज्जासंस्थेसारख्या विशिष्ट क्षेत्रात पुढील प्रशिक्षण घेता येणार आहे
यासोबतच वेगवेगळ्या शास्त्रांना एकत्र आणणाऱ्या संशोधन कार्यक्रमांवरही संस्थेचा भर असणार आहे. मात्र, एमबीबीएस म्हणजे डॉक्टर होण्यासाठीचा वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम आयआयटी कानपूरमध्ये लगेच सुरू होणार नाही, त्याला आणखी तीन ते चार वर्षे लागू शकतात.
आयआयटी कानपूरची वैद्यकीय पायाभूत सुविधा आता प्रत्यक्ष आकार घेत आहे. ५०० खाटांचे यदुपती सिंघानिया सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल यावर्षीच्या अखेरीस सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे आणि मार्च २०२७ मध्ये पहिल्या रुग्णावर उपचार केले जातील, अशी माहिती डीन प्रा. अनिल के. लालवानी यांनी दिली. यासोबतच रुग्णालयाशेजारी ५० खाटांचे कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरही उभारले जात आहे. यासाठी संस्थेला सुरुवातीच्या टप्प्यात ६० नव्या प्राध्यापकांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे.
आयआयटी खरगपूरची प्रथम पायाभरणी
वैद्यकीय शिक्षणात उतरणाऱ्या या तीन आयआयटी संस्थांपैकी आयआयटी खरगपूरने सर्वांत आधी या क्षेत्रात पायाभरणी केली. आयआयटी खरगपूरची स्कूल ऑफ मेडिकल सायन्स आणि टेक्नॉलॉजी २००१ मध्ये सुरू झाली. त्याअंतर्गत आधीच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण देण्यासाठी एमएमएसटी अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. आता संस्थेने स्वतःचे रुग्णालय उभारले असून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांनाही मंजुरी मिळवली आहे.
आयआयटी मद्रासकडे शिक्षणाचा व्यापक आराखडा
दुसरीकडे, आयआयटी मद्रासने वैद्यकीय शिक्षणाचा सर्वांत व्यापक आराखडा मांडला आहे. आयआयटी संस्थेत एमबीबीएस, एमडी आणि पीएचडीचे शिक्षण देणारे विशेष महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत. संस्थेचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी यांच्या मते, तंत्रज्ञान संस्थांनी वैद्यकीय शिक्षणात उतरणे गरजेचे आहे; कारण तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र एकत्र आल्याशिवाय देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील गरजा पूर्ण करणे कठीण आहे.
इंजिनिअरिंग संस्थांना डॉक्टर घडवण्याची गरज का वाटते?
तीनही आयआयटीचा उद्देश केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणे नाही, तर त्यांना ‘फिजिशियन-इंजिनिअर’ तयार करायचा आहेत. म्हणजे वैद्यकीय ज्ञानासोबतच तंत्रज्ञान समजणारा तज्ज्ञ. आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. सुमन चक्रवर्ती यांच्या मते, पूर्वी वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान ही दोन स्वतंत्र क्षेत्रे होती. मात्र, आता आजाराचे निदान करणे, आजाराचा अंदाज घेणे, त्यानुसार उपचार करणे आणि रुग्णाची पुढील देखरेख यामध्ये तंत्रज्ञानाचा थेट सहभाग वाढला आहे, त्यामुळे डॉक्टर आणि इंजिनिअर यांनी आता केवळ आपापल्या क्षेत्रापुरते मर्यादित राहणे पुरेसे नसल्याचे तज्ज्ञ नमूद करतात.
आज डॉक्टरांना मेडिकल इमेजिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैविक निदान चाचण्या, बायोसेंसर, रोबोटिक्स आणि शरीरावर वापरता येणाऱ्या स्मार्ट उपकरणांसोबत काम करावे लागते, त्यामुळे या तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या इंजिनिअरलाही रुग्णाची वैद्यकीय गरज समजणे महत्त्वाचे झाले आहे. ‘डॉक्टर समस्या ओळखतील आणि इंजिनिअर त्यासाठी मशीन तयार करेल’ ही जुनी पद्धत आता अपुरी ठरत असल्याचे प्रा. चक्रवर्ती सांगतात. आयआयटी कानपूरचे प्रा. अनिल लालवानी हे या नव्या दृष्टिकोनाचे उदाहरण आहेत. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जवळपास तीन दशके एकाच वेळी कान-नाक-घसा वैद्यकशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक म्हणून काम केले.
प्रा. लालवानी यांनी वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकी याचा मेळ साधून संशोधन केले आहे. ऐकण्याची क्षमता कमी होण्यावर जनुक उपचार आणि आतील कानापर्यंत औषध पोहोचवण्यासाठी मायक्रोनीडल उपकरणे या दोन्ही विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. आता त्यांना हा अनुभव केवळ स्वत:पुरता मर्यादित ठेवायचा नाही, भारतात अशा प्रकारचे वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्र असलेले तज्ज्ञ तयार करण्याकरिता संस्थात्मक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे, असे ते अधोरेखित करतात.
डॉक्टर आणि इंजिनिअर एकत्र काम करताना नेमकी अडचण कुठे येते?
डॉक्टर आणि इंजिनिअर एकत्र काम करत असतील तर समस्या आपोआप सुटतेच असे नाही. आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. सुमन चक्रवर्ती याचे एक उदाहरण देतात. एखादा डॉक्टर सांगू शकतो की, त्यांना संवेदनशीलपणे पार पडेल अशी चाचणी हवी आहे. ही चाचणी अधिक अचूक करण्यासाठी इंजिनिअर काम करू शकतो. मात्र, ग्रामीण भागातील प्रत्यक्ष गरज त्यापेक्षा वेगळी असू शकते.
प्रत्यक्षात केवळ १० मिनिटांत विश्वासार्ह निकाल देऊ शकेल अशी वैद्यकीय गरज असू शकते, ज्यासाठी शीतसाखळीची गरज भासणार नाही, वाहतुकीत ती खराब होणार नाही आणि आरोग्य कर्मचाऱ्यालाही ती सहज वापरता येईल ही वैद्यकीय गरज असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवायचे की नाही, हे चाचणीच्या निकालावरून लगेच ठरवता आले पाहिजे.
इथे दोन कुशल तज्ज्ञ आपापल्या जागी योग्य काम करत आहेत, पण दुर्दैवाने ते केवळ चुकीच्या घटकांमध्ये सुधारणा करत आहेत.
“हायब्रिड माइंडचे तज्ज्ञ (म्हणजेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा दोन्ही क्षेत्रांची जाण असलेल्या संकरित बुद्धिमत्तेचे) केवळ ते दोन तज्ज्ञांची जागा घेतात असे नाही,” हे स्पष्ट करताना प्रा. चक्रवर्ती म्हणाले, “दोन्ही क्षेत्रांतील तज्ज्ञांप्रमाणे आपापल्या विषयात चुकीच्या मुद्द्यावर ऊर्जा वाया घालवण्याव्यतिरिक्त हे तज्ज्ञ मूळ आणि खरी गरज कोणती हे अचूक ओळखतात.”
वैद्यकीय नियमांच्या चौकटीत हे कसं साध्य होणार?
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) भारतात वैद्यकीय शिक्षणाचे नियमन करतो, त्यामुळे आयआयटींना स्वतःच्या पद्धतीने डॉक्टर तयार करता येणार नाहीत. आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. सुमन चक्रवर्ती यांच्या मते, एनएमसीच्या नियमांना बगल देण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न आयआयटींकडून केला जाऊ नये. सुरक्षित आणि सक्षम डॉक्टर तयार करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत वैद्यकीय कौशल्यांबाबतीत तडजोड केली जाऊ शकत नाही.
म्हणजेच आधी एक चांगला आणि सक्षम डॉक्टर तयार होणे गरजेचे आहे; त्यानंतर त्याच्या वैद्यकीय शिक्षणाला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिली जाऊ शकते. यासाठी एनएमसीच्या नियमांनुसार वैद्यकीय शिक्षणासोबत आयआयटीच्या तंत्रज्ञान आणि संशोधन क्षमतेचा वापर करण्याचा मार्ग स्वीकारला जात आहे, मात्र ही प्रक्रिया सोपी नाही. वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यासाठी अध्यापन रुग्णालय आणि एनएमसीची मंजुरी या दोन्हींची आवश्यकता आहे आणि यासाठी अनेक वर्षे लोटू शकतात, त्यामुळेच आयआयटी कानपूरने एमबीबीएस सुरू करण्यापूर्वी रुग्णालयातील खाटांची आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी सुरू केली आहे.
