भारतीय हवामान खात्याने (IMD) रविवारी (१९ मे) दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमधील बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. स्थानिकांना या भागामध्ये उष्ण आणि तीव्र उष्ण लहरींचा सामना करावा लागेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांमधील दिल्ली, चंडिगड आणि इतर प्रमुख शहरांमध्येही जवळपास ४४ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, उष्णतेची लाट म्हणजे काय? भारतातील कोणत्या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका आहे आणि या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली पाहिजे? याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ.

उष्णतेच्या लाटेचा इशारा म्हणजे काय आणि तो कशा प्रकारे दिला जातो?

हवामान खात्याच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, “मानवी शरीरासाठी घातक ठरणाऱ्या हवेच्या तापमानाची स्थिती म्हणजे उष्णतेची लाट होय. प्रत्येक भागातील सामान्य तापमानामध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो.” त्यामुळे प्रत्येक भागामध्ये असलेले सामान्य तापमान आणि त्यामध्ये होणारी तफावत यावरून उष्णतेच्या लाटेचा अंदाज घेतला जातो. समुद्रकिनारच्या भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशाच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे. त्यामुळे सामान्यपणे तापमान ३७ अंशाच्या वर गेल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो; तर मैदानी भागामध्ये हाच निकष ४० अंश इतका आहे. डोंगराळ भागात हाच निकष ३० अंशाचा आहे. हवामान उपविभागातील दोन स्थानकांवर तापमानाची ही परिस्थिती सलग दोन दिवस राहिल्यास उष्णतेची लाट असल्याची घोषणा केली जाते.

Ebrahim Raisi convoy accident
कट्टर धर्मगुरूचा इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ; नेमके कोण आहेत इब्राहिम रईसी?
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Panchgrahi Yog
तब्बल ३०० वर्षानंतर जुळून येतोय ‘महा दुर्लभ संयोग’; ६ दिवसांनी ‘या’ राशींची लागणार लाॅटरी? जीवनात असेल राजयोग!
History of Indian Spices and Vasco da Gama
विश्लेषण: दालचिनीचं ग्रीक कनेक्शन; भारतीय मसाल्यांना हजारो वर्षांचा इतिहास!
what are volcanoes
बर्फाळ प्रदेशातल्या आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा भीषण उद्रेक कसा झाला? ज्वालामुखीची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…
jagannath temple puri missing keys
पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Antarctic Parliament meeting in India
भारतात सुरू असलेली अंटार्क्टिक संसद बैठक म्हणजे काय? तिचा काय आहे अजेंडा?

हेही वाचा : विश्लेषण: उत्तर प्रदेशानेच का दिले भारताला सर्वाधिक पंतप्रधान?

उष्णतेची तीव्र लाट म्हणजे काय?

एखाद्या भागामधील तापमान हे सरासरीपेक्षा साडेचार ते ६.४ अंशांनी जास्त नोंदवल्यास तिथे उष्णतेची लाट जाहीर केली जाते. तसेच कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी जास्त नोंदवले गेल्यास उष्णतेची तीव्र लाट जाहीर केली जाते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नटक राज्यातील काही भाग, आंध्र प्रदेश व तेलंगणा या भागांत वारंवार उष्णतेची लाट दिसून येते. काही वेळा तमिळनाडू आणि केरळमध्येही उष्णतेची लाट येते. मुख्यत: राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात मे महिन्याच्या सुमारास ४५ अंशापेक्षा अधिक तापमान दिसून येते.

उष्णतेच्या लाटेसाठी ‘रेड अलर्ट’ कधी दिला जातो?

उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला जातो. याचा अर्थ त्या भागात दोनपेक्षा अधिक दिवस उष्णतेची तीव्र लाट दिसून आली आहे किंवा तीव्र उष्ण लहरी असणाऱ्या दिवसांची एकूण संख्या सहा दिवसांपेक्षा जास्त आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उष्माघाताची समस्या सर्व वयोगटांमध्ये निर्माण होऊ शकते. आधीपासूनच सहव्याधीग्रस्त असणाऱ्या व्यक्ती, बालके आणि गर्भवती महिलांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चंदिगड प्रशासनाने दुपारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा विचार केला आहे. मानवी हस्तक्षेपाने निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे तीव्र उष्णतेची ही परिस्थिती उदभवली असल्याचे अमेरिकेतील ‘क्लायमेट सेंट्रल’ संस्थेतील हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, १९९८ ते २०१७ या दरम्यानच्या काळात १,६६,००० हून अधिक लोकांचे उष्माघातामुळे बळी गेले आहेत.

उष्णतेच्या लाटेसाठी काय खबरदारी घ्यावी?

उष्माघाताच्या प्रतिकूल परिणामांपासून वाचण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) खालील उपाय सुचवले आहेत.

१. बाहेर सूर्यप्रकाशात जाणे टाळा. विशेषत: दुपारी १२ ते ३ दरम्यान घरी राहा.

२. जर तुम्ही बाहेर काम करीत असाल, तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करा. तुमच्या डोके, मान, चेहरा व हातपाय आदी शारीरिक भाग ओलसर कापड झाकून घ्या.

३. तुम्ही तहानलेले नसलात तरीही भरपूर पाण्याचे सेवन करीत राहा.

४. हलके, फिकट रंगाचे, सैलसर सुती कपडे घाला. उन्हात जाताना उष्णतेपासून संरक्षण होऊ शकेल, अशा गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चपलांचा वापर करा.

५. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये टाळा. कारण यांच्या सेवनामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. त्याऐवजी ओआरएस, लस्सी, सरबत, लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये प्या.

हेही वाचा : श्रीनगरमध्ये विक्रमी मतदान कशामुळे? धर्मनिहाय विभागणीमुळे भाजप आणि विरोधकांना समान संधी?

उष्माघात झाल्यास काय करावे?

जर एखादी व्यक्ती उष्माघाताच्या तडाख्यामुळे अत्यवस्थ झाली असेल, तर करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे :

१. उष्माघातग्रस्त व्यक्तीला थंड ठिकाणी वा हवेशीर जागेत सावलीत झोपवा. ओल्या कापडाने त्याचे शरीर पुसून घ्या. शरीर वारंवार पाण्याने धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी ओता. थोडक्यात शरीराचे तापमान कमी करणे हेच यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

२. उष्माघातात सापडलेल्या व्यक्तीला ओआरएस, लिंबू सरबत, ताक अशा गोष्टी प्यायला द्या. जेणेकरून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढेल.

३. उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात न्या. उष्माघात ही समस्या गंभीर असल्याने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे ठरते.