पावसाचा माघारी परतण्याचा विचार आहे का, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती सध्या दिसत आहे. पण ऋतुचक्रानुसार पावसाळा काही दिवसांत संपेल आणि हिवाळ्याचे वेध लागतील. या ऋतुबदलाच्या मधे असणारी ऑक्टोबर हिट यंदा जाणवणार का? की दिवाळीत अभ्यंगस्नानाला बोचरी थंडी असेल? आणि नंतर हिवाळा कडाक्याचा असेल का? या प्रश्नांची उत्तरं हवामान विभागाने दिली आहेत.
‘ला निना’ स्थिती असणार?

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर यंदाचा हिवाळा हाडं गोठवणारा असू शकतो. कारण भारतातल्या थंडीला कारणीभूत ठरणारी हवामानाची ‘ला निना’ स्थिती यंदाच्या हिवाळ्यात सक्रिय असणार आहे. भारतासाठी, ला निना विशेषतः उत्तर भारतात थंड हिवाळा घेऊन येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) च्या मते, प्रशांत महासागर थंड करणारी ही स्थिती उत्तर भारतात तीव्र थंडीच्या लाटा निर्माण करू शकते.

जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे काय?

या सप्टेंबरमध्ये जागतिक हवामान संघटनेने (WMO) म्हटले की, ला निना पुन्हा परत येऊन या महिन्यापासून हवामान आणि वातावरणीय पद्धतींवर परिणाम करू शकते. मात्र, या संस्थेने असेही स्पष्ट केले आहे की या ला निनाच्या प्रभावाने तात्पुरता थंडावा निर्माण झाला तरी, बहुतेक देशांमध्ये जागतिक तापमान नेहमीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे.

एल निनो आणि ला निना

भारतापासून हजारो कि.मी. दूर प्रशांत महासागरात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतातील मान्सून प्रभावित होतो. प्रशांत महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा समुद्र आहे. या महासागराच्या पश्चिमेला ऑस्ट्रेलिया आहे तर पूर्वेला दक्षिण अमेरिका आहे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे विषुववृत्तीय रेषेवरील हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यांना व्यापारी वारे म्हणतात. हे वारे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील उबदार पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहून नेतात.

ऑस्ट्रेलियावर या गरम पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढगात रूपांतर होऊन कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परिणामी ऑस्ट्रेलियात (विशेषतः पूर्व ऑस्ट्रेलियात) पाऊस पडतो. ज्या वाऱ्यांचे बाष्पीभवन होत नाही ते थंड वारे पुन्हा दोन ठिकाणी खाली उतरतात. एका बाजूला ते थंड वारे दक्षिण अमेरिकेकडे उतरतात. तर दुसरीकडे मादागास्करपर्यंत खाली उतरतात. थंड वारे खाली उतरल्यामुळे तेथे पाऊस होत नाही. प्रशांत महासागरातील व्यापारी वाऱ्यांच्या या संपूर्ण चक्राला वॉकर चक्र असे म्हणतात. ही सामान्य स्थिती आहे. या स्थितीला म्हणजे व्यापारी वाऱ्यांच्या स्थितीला ENSO (अल निनो साऊथ ऑझिलिएशन) म्हणजे अल निनो-दक्षिणी दोलन असे म्हणतात.

हे थंड वारे खूप चांगल्या प्रकारे तयार झाले, मादागास्करपर्यंत ते उतरून खूप चांगले जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाले तर भारताकडे थंड वारे येतात. मान्सून चांगला होतो. या स्थितीला ला निना स्थिती म्हणतात. ला निना या शब्दाचा स्पॅनिश भाषेत ‘लिटल गर्ल’ (लहान मुलगी) असा अर्थ होतो.

याउलट हे व्यापारी वारे खूप तीव्रतेने तयार झाले नाहीत तर ते प्रशांत महासागराच्या पूर्व किंवा मध्यावरच समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान उबदार करतात आणि तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार करतात. परिणामी मध्य अमेरिकेत चांगला पाऊस पडतो. आणि बाष्पीभवन न झालेले थंड वारे ऑस्ट्रेलिया आणि आसपासच्या बेटांवर खाली उतरतात आणि एल निनो स्थिती तयार होते. तेथे पाऊस होत नाही. शिवाय मदागास्करपर्यंत कोणतेही थंड वारे येत नाहीत. परिणामी भारतीय मान्सून तयार होण्याची स्थिती कमकुवत होते. या स्थितीला एल निनो स्थिती म्हणतात. थोडक्यात, ला निना थंडावा आणते, तर एल निनो स्थिती उष्णता निर्माण करते.

हवामान बदलांमुळे अंदाज निष्प्रभ?

भारताला सर्वसाधारणपणे ला नीना चा फायदा होतो, कारण ही स्थिती भरपूर पाऊस घेऊन येते. त्यामुळे शेतीला मदत होते आणि भूगर्भजलसाठे भरतात. मात्र, हिवाळा अधिक थंड होतो. हिमवृष्टी होणाऱ्या डोंगराळ भागात ला नीना जोरदार बर्फवृष्टी घडवते, ज्यामुळे शेती उत्पादन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते. ला निनाची पारंपरिक पद्धतीने भाकीत करता येणारी परिणामकारकता आता हवामान बदलामुळे कमी विश्वासार्ह होत चालली आहे. हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे वातावरणात गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया निर्माण होतात आणि त्या कधी कधी नेहमीच्या ला नीना परिणामांनाही निष्प्रभ करतात.

भारतातील हाहाकार

भारतामध्ये यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसादरम्यान झालेल्या भरपूर पावसामुळे अनेक ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. ला निना स्थितीमुळे हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ला निनाचा प्रभाव आता हिवाळ्यातही दिसेल असा अंदाज व्यक्त होत आहे. या शक्यतेचे प्रमाण ७१ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.