पावलस मुगुटमल

देशातील एकूण पर्जन्यमानात ७० टक्क्यांहून अधिकचा वाटा असणारा नैऋत्य मोसमी पाऊस सध्या समुद्राकडून भारतभूमीकडे मार्गक्रमण करतो आहे. यंदा १६ मे रोजी मोसमी वाऱ्यांचे आगमन अंदमानमध्ये झाले. त्यानंतर त्यांची आगेकूच सुरूच आहे. यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी मोसमी वारे अंदमानात पोहोचले. त्यांच्या प्रगतीस पोषक असलेली स्थिती पाहता महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश ५ जून रोजी होऊ शकतो, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. नुकत्याच झालेल्या खरीप हंगामाच्या बैठकीतही हे भाकीत गृहीत धरण्यात आले. त्यामुळे खरोखरच या तारखेला मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण अनेकदा मोसमी पावसाच्या प्रवासाच्या तारखांचे अंदाज खरे ठरले असले, तरी काही वेळेला लहरी हवामानाने त्यास चकवाही दिला आहे. यंदा काय होईल, हे पाहावे लागेल.

maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक

पावसाच्या वेळा ठरलेल्या असतात?

नैऋत्य मोसमी वारे आणि त्यामुळे येणाऱ्या मोसमी पावसाच्या देशभरातील प्रवासाच्या नियोजित सर्वसाधारण तारखा ठरलेल्या आहेत. त्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास केला आहे. अमुक एका तारखेच्या आसपास मोसमी वारे सक्रिय होऊन ठरावीक भागात पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन संबंधित भागासाठी एक तारीख निश्चित केली जाते. सन १९४० पासून मोसमी पावसाचा देशातील प्रवेश आणि प्रवासाचा अभ्यास करून या सर्वसाधारण नियोजित तारखा ठरविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत काही विभागांतील नियोजित तारखा आणि प्रत्यक्षात मोसमी पावसाचे आगमन यांत मोठी तफावत निर्माण झाल्याने दोन वर्षांपूर्वी काही तारखांत बदल करण्यात आले. विशेषत: मध्य भारतातून मोसमी वारे पुढे जात असताना त्यात गेल्या काही वर्षांत अनियमितता असल्याने प्रामुख्याने या टप्प्यातील तारखा बदलण्यात आल्या आहेत.

पावसाच्या प्रवासाचा मार्गही ठरलेला असतो का?

नैऋत्य दिशेकडून समुद्रातून बाष्प घेऊन भूपृष्ठाकडे येणारे वारे म्हणजे नैऋत्य मोसमी वारे. हे वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतात आणि बाष्प घेऊन येतात. मे महिन्याच्या मध्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. हे वारे त्या दिशेने पुढे येत ढगांचा मोठा समूह अंदमानपर्यंत आणतात. त्या वेळेस नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा प्रवास नैऋत्य दिशेने सुरू होतो. या वाऱ्यांचा भारतातील प्रवेश केरळ राज्यातून होतो. महाराष्ट्रात ते तळकोकणातून प्रवेश करतात. महाराष्ट्र व्यापल्यानंतर मध्य भारतात ते आगेकूच करतात. याच वेळेला पूर्वोत्तर राज्यांमध्येही मोसमी वारे पोहोचतात.

मोसमी पावसाच्या ठरलेल्या वेळा कोणत्या?

गेल्या अनेक वर्षांतील मोसमी वाऱ्यांच्या, पावसाच्या घडामोडी आणि प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन आता नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या अंदमानातील प्रवेशासाठी २२ मे ही तारीख नियोजित करण्यात आली आहे. यंदा अंदमानात सहा दिवस आधी म्हणजे १६ मे रोजीच मोसमी पाऊस दाखल झाला. आता मोसमी पाऊस केरळमार्गे भारतात प्रवेशाचे वेध लागले आहेत. केरळमध्ये प्रवेशाची सर्वसाधारण नियोजित तारीख गेल्या अनेक वर्षांपासून १ जून हीच आहे. यंदा अंदमानात पाऊस लवकर दाखल झाल्याने केरळमध्येही तो काही दिवस आधी म्हणजे २७ मे रोजीच पोहोचेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तेथून पुढे कर्नाटकमार्गे हा पाऊस ५ जूनला तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल, असे यंदाचे भाकीत आहे. महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख ७ जून आहे. त्याचप्रमाणे १५ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो.

नियोजित वेळांनुसार पावसाचा प्रवास होतो का?

अनेक वर्षांच्या अभ्यासातून नैऋत्य मोसमी पावसाच्या प्रवासाच्या सर्वसाधारण नियोजित वेळा काढल्या जात असल्या, तरी हवामानशास्त्रानुसार या वेळा किंवा तारखांमध्ये तीन ते चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, असे गृहीत धरण्यात आलेले असते. अंदमानातून मोसमी पावसाचा प्रवास सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी हवामानाची स्थिती, समुद्रातील वातावरण, वाऱ्यांची दिशा आदी बाबींचा अभ्यास करून हवामानशास्त्र विभागाकडून मोसमी पावसाच्या तंतोतंत तारखेचे भाकीत मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख ७ जून आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकदाही ७ जूनला मोसमी पावसाचा राज्यात प्रवेश झाला नाही. २०१५, २०१७, २०१८ या वर्षांत ८ जूनला महाराष्ट्रात मोसमी पावसाने प्रवेश केला होता. सर्वांत उशिरा २०१९ मध्ये २० जूनला, तर सर्वांत आधी ३ जूनला मोसमी पावसाचा महाराष्ट्रात प्रवेश झाला होता. २०१६ मध्येही मोसमी पावसाचे महाराष्ट्रातील आगमन १९ जूनपर्यंत लांबले होते. मोसमी वाऱ्यांचा प्रवाह-वेग मंदावणे आणि त्यामुळे समुद्रातून भूभागाकडे येणारे बाष्प कमी होणे, हे पाऊस लांबण्याचे प्रमुख कारण असते. हा परिणाम मोसमी पावसाच्या प्रवासात कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो. तो लक्षात घेऊनच मोसमी पावसाच्या वेळेबाबत भाकीत केले जाते.

गेल्या दोन वर्षांत नेमके काय झाले?

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सहा दिवस आधी १६ मे रोजी अंदमानात दाखल झाला. तशाच पद्धतीने २०२० मध्येही तो पाच दिवस आधी म्हणजे १७ मे रोजी अंदमानात पोहोचला होता. यावर्षात केरळमध्ये पोहोचण्याची १ जून ही सर्वसाधारण नियोजित तारीखही त्याने साधली. मात्र, महाराष्ट्रात पोहोचण्यास त्याने तब्बल दहा दिवसांचा कालावधी घेतला, पण ११ जूनला एकाच दिवसात तळकोकणातच नव्हे, तर तो थेट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याही काही भागांत दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२१ मध्ये मोसमी पावसाने नियोजित वेळ काही प्रमाणात गाठत २१ मे रोजी अंदमानात धडक दिली होती. भारतातील प्रवेशासाठी त्याने १३ दिवसांचा कालावधी घेतला आणि ३ जूनला तो केरळमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याने महाराष्ट्रापर्यंत विक्रमी वेगाने प्रवास केला. अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे ५ जूनलाच मोसमी पाऊस तळकोकणातून महाराष्ट्रात आला होता. यंदाही तो सलग दुसऱ्या वर्षी ५ जूनलाच महाराष्ट्रात दाखल होईल, असे हवामान विभागाचे भाकीत आहे. त्यामुळे उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे.