अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवले होते. हल्लेखोरांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेची दोन प्रवासी विमाने ताब्यात घेतली आणि ती विमाने थेट न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डीसीमधील पेंटागॉनवर धडकवली. या घटनेनंतर हवाई प्रवासातील कमकुवत दुवे आणि असुरक्षितता या बाबी प्रकर्षाने समोर आल्या. मृतांचा आकडा पाहता, हा आजवरचा सर्वांत मोठा हल्ला मानला जातो. जवळजवळ तीन हजार नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. विशेषतः सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले गेले. पूर्वीची व्यवस्था कशी होती आणि या हल्ल्यानंतर नक्की काय बदलले? त्याविषयी जाणून घेऊ.

९/११ च्या हल्ल्याने जगाच्या उड्डाणाच्या पद्धतीमध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणले. विमानतळांवर आणि विमानांमध्ये सुरक्षा सुधारण्याच्या दृष्टीने नवीन नियम लागू करण्यात आले. लोकांना विमान प्रवासाबाबत आश्वस्त करावे; किंबहुना त्यांना विमानोड्डाण पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे, याची खात्री पटावी यासाठी हे बदल आवश्यक होते. कारण- या हल्ल्यानंतर लोकांनी काही काळासाठी का होईना विमान प्रवास करणे टाळले होते.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेची दोन प्रवासी विमाने ताब्यात घेतली आणि ती विमाने थेट न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन डीसीमधील पेंटागॉनवर धडकवली. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारतीय वायूदलातील विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप : भारताच्या सशस्त्र दलांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ?

हल्ल्यानंतर नक्की काय बदलल झाले?

९/११ हल्ल्यापूर्वी अमेरिकेमध्ये आणि इतर बहुतेक ठिकाणी उड्डाण करणे ही एक आरामदायक आणि आनंददायक बाब होती. प्रियजनांना भेटण्यासाठी लोक विमानाच्या बोर्डिंग गेटपर्यंत जाऊ शकायचे, प्रवासी अगदी बेसबॉल बॅट आणि लहान धारदार उपकरणेही घेऊन जाऊ शकायचे. तसेच अनेक वैमानिक समोरच्या रांगेतून प्रवाशांना बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी आमंत्रित करायचे. विमानात हल्लेखोरांना चाकू आणि बॉक्स कटर सहजपणे उपलब्ध होत होते. त्यामुळे प्रवाशांना विमानात जाण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांच्या सामानाची व्यवस्थितरीत्या तपासणी करणे हा सर्वांत पहिला व महत्त्वाचा बदल करणे अत्यावश्यक झाले.

९/११ हल्ल्यापूर्वी अमेरिकेत केवळ पाच टक्के प्रवासी सामानाची तपासणी करण्यात आली होती. ‘पीबीएस’च्या म्हणण्यानुसार, हे प्रमाण आज १०० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या दुर्घटनेनंतर प्रत्येक ठिकाणी प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी अनिवार्य करण्यात आली. गेल्या काही वर्षांत प्रवाशाची ओळख पटवणे ही महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. ही तपासणी सरकारने जारी केलेल्या ओळखपत्राशी (आयडी) जुळण्यापासून फिंगर प्रिंट, बायोमेट्रिक स्कॅनर आणि आता फेस स्कॅनिंगपर्यंत विकसित झाली आहे.

९/११ च्या हल्ल्याने जगाच्या उड्डाणाच्या पद्धतीमध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणले. (छायाचित्र-रॉयटर्स)

या हल्ल्यानंतर अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी बरोबर असलेल्या सर्व वस्तूंची सुरक्षा तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले. नोव्हेंबर २००१ मध्ये जॉर्ज डब्ल्यू. बुश प्रशासनाने विमानतळ आणि इतर वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ट्रान्स्पोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन (टीएसए) या नवीन संस्थेची स्थापना केली. त्यानंतर एअरलाइन्स किंवा विमानतळांद्वारे नियुक्त केलेल्या खासगी सुरक्षा यंत्रणांना हटविण्यात आले. देशभरातील ‘टीएसए’मध्ये ६० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती, अशी माहिती अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने दिली आहे.

विमानातील कॉकपिट सील करण्यासाठीही पावले उचलली गेली; ज्यामुळे दहशतवाद्यांना विमानावर ताबा मिळवणे कठीण झाले. विमान उत्पादकांनी व्यावसायिक विमानांना बुलेटप्रूफ आणि लॉक केलेले कॉकपिट दरवाजे लावले. तसेच, नियामकांनी उड्डाणादरम्यान प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली. बहुतेक विमानांमध्ये आता कॉकपिटच्या दारावर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरून कॉकपिटचे दार कोण ठोठावत आहे, हे आतील वैमानिकांना दिसू शकते. त्यासह अमेरिकेने इन-फ्लाइट एअर मार्शलची संख्या दुप्पट केली आहे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या विमानातही वाढवण्यात आली आहे.

हल्ल्याचा आणि हवाई प्रवासातील बदलांचा प्रभाव अनेक वर्षे विमान वाहतूक उद्योगावर पडला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : करोना काळात किशोरवयीन मुलींच्या मेंदूमध्ये बदल, अभ्यासातून धक्कादायक माहितीचा उलगडा; याचा नेमका परिणाम काय?

विमान वाहतूक उद्योगावर या हल्ल्याचा काय परिणाम झाला?

हल्ल्याचा आणि हवाई प्रवासातील बदलांचा प्रभाव अनेक वर्षे विमान वाहतूक उद्योगावर राहिला. यूएस ब्यूरो ऑफ ट्रान्स्पोर्टेशन स्टॅटिस्टिक्सनुसार, अमेरिकेतील विमान कंपन्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पाच वर्षे लागली. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) नुसार, २००० मध्ये जागतिक एअरलाइन्सचे उत्पन्न ३२८.५ बिलियन डॉलर्स इतके होते; जे २००१ मध्ये ३०७.५ बिलियन डॉलर्सपर्यंत घसरले. २००२ मध्ये ते ३०६ बिलियन डॉलर्सपर्यंत आणखी खाली आले.