रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला २४ फेब्रुवारीला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चिघळलेल्या युद्धामुळे जागतील राजकारण, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रही बदलले आहे…

युरोपीय देशांच्या मर्यादा उघड?

उत्तर अटलांटिक करार संघटना अर्थात ‘नेटो’चे युरोपीय सदस्य देश पारंपरिक युद्धाची शक्यताच आता संपुष्टात आल्याचे गृहीत धरून आपापले संरक्षण उद्योग आणि शस्त्रास्त्रांचे साठे कमी करत करत असताना रशियन फौजा युक्रेनमध्ये घुसल्या. मग युक्रेनला शस्त्रपुरवठा करताना ‘नेटो’ची तारांबळ उडाली.

आता या युरोपीय देशांना पुन्हा एकदा संरक्षणसिद्धतेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी आणखी एखाद दशक तरी लागेल. त्यापायी या देशांचे आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमही बदलण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर होतो आहेच, पण दोन्हीकडले सैनिक आजही, पहिल्या महायुद्धातल्याप्रमाणे खंदकांत आहेत. युद्ध अमुकच प्रकारे लढले जाईल हे गृहीतक कुचकामी ठरले, ते असे.

युरोपचा प्रतिसाद ४ वर्षांत कसा?

युरोपमधील सर्वात प्रबळ देश असलेल्या जर्मनीने कित्येक दशके अवलंबिलेली शांततावादी रणनीती मागे टाकून पुन्हा एकदा शस्त्रसज्जतेवर भर देण्याचा निर्णय घेतला. फिनलँड आणि स्वीडन यांसारखे तटस्थ देशही नेटोचे सदस्य झाले. परिणामी, गेली कैक वर्षे शांततावादाचा पाठपुरावा करत शस्त्रस्पर्धेत मागे पडलेल्या युरोपीय देशांचा संरक्षणखर्च वाढला आहे.

अमेरिकेचे अजूनही तळ्यात-मळ्यात?

आपण निवडून आलो तर अवघ्या काही तासांत रशिया-युक्रेन यांच्यात प्रथम युद्धविराम आणि नंतर कायमस्वरूपी युद्धबंदी आणू अशी गर्जना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात केली होती. त्यांच्या सत्ताग्रहणाला जानेवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले, पण तरीही परिस्थिती जैसे-थेच आहे. आजही युक्रेनच्या जवळपास २० टक्के भूभागावर रशियाचे नियंत्रण आहे. पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी चर्चेसाठी आता ट्रम्प यांना उसंत नाही. त्यामुळे या संघर्षात अमेरिका मध्यस्थी करेल ही आशा जवळपास मावळली आहे.

ड्रोन-युद्ध युगाचा आरंभ?

लष्करी इतिहासात पहिल्यांदाच, मानवरहित हवाई वाहने पारंपरिक युद्धभूमीवर प्रबळ ठरली. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी या युद्धात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या ड्रोनचा वापर केला. युद्ध सुरू झाल्यापासून अधिकाधिक विकसित ड्रोनने हल्ले करण्यात आले. रशियाचा फायबर-ऑप्टिक टेथर्ड हा सर्वात नवीन प्रकार आहे, या प्रकारचे ड्रोन इलेक्ट्रॉनिक जॅमिंगलाही जुमानत नाहीत.

युद्धसामग्रीच्या या बदलाचे परिणाम गंभीर आहेत. मोठ्या संख्येने जवानांचा माग काढणे या ड्रोनना सहजशक्य आहे, त्यामुळे मनुष्यबळ न गमावता विरुद्ध पक्षाच्या सैनिकांना लक्ष्य करणे शक्य झाले आहे. परिणामी भविष्यात संरक्षण सामग्रीमध्ये ड्रोनची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. आधुनिक युद्धे लहान, अचूक आणि महागड्या, मर्यादित उच्च-तंत्रज्ञानाच्या शस्त्रास्त्रांनी लढली जातील या गृहीतकाला रशिया-युक्रेन युद्धाने छेद दिला आहे.

वाटाघाटींमध्ये आण्विक ‘ब्लॅकमेलिंग’?

युद्ध थांबवण्यासाठी युरोप आणि अमेरिकेच्या पुढाकाराने आतापर्यंत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याकडे अनेकदा कुणी ना कुणी रदबदली केली. मात्र, या चर्चांतही पुतिन यांनी रशियाच्या आण्विक सामथ्र्याचा वारंवार उल्लेख केला.

अण्वस्त्रांचा वापर ते ढाल म्हणून करत असल्याची टीका होत आहे. यामुळे अण्वस्त्रांचा धाक वाढवा आणि त्या जोरावर शेजारी देशांवर आक्रमण करा, असा संदेश रशियाकडून दिला जात आहे. यामुळे बिगर-आण्विक देशांमध्येही अण्वस्त्रे विकसित करण्याची वा मिळवण्याची इच्छा बळावण्याचा धोका आहे. परिणामी, अण्वस्त्रे कमी करण्यासाठी धडपडणार्‍या संस्थांसमोरील आव्हान वाढले आहे. या अर्थाने, रशिया-युक्रेन युद्धामुळे आगामी दशकांमध्ये जग अधिक धोकादायक झाले.

जागतिक व्यवस्थेत कितपत उलथापालथ?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या रशियाने आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून शेजारी देशावर आक्रमण केले. त्यानंतर चीन, भारत आणि ब्राझीलसह ‘ग्लोबल साउथ’च्या बहुसंख्य देशांनी रशियाचा निषेध केला नाही. रशियाशी जुनी मैत्री लक्षात घेऊन भारताने चर्चेद्वारेच युद्ध थांबावे, अशी भूमिका घेतली.

यामुळे जागतिक पातळीवर कितीही मोठा संघर्ष झाला तरी सर्व देश त्याविरोधात एकवटतील, याची शक्यताच पांगुळली आहे. म्हणजेच पाश्चात्त्य देशांनी आखून दिलेल्या नियमांनुसार जागतिक राजकारण चालण्याचे दिवस आता सरले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

nima.patil@expressindia.com