scorecardresearch

Premium

विश्लेषण : ‘इस्रो’च्या यशस्वी ‘आरएलव्ही’ चाचणीचे महत्त्व काय? भविष्यात याचे कोणते फायदे?

आता अवकाश यानाच्या स्वयंचलित भू अवतरणाची क्षमता ‘इस्रो’ने प्राप्त केली असून पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान मोहिमेची स्वप्नपूर्ती दृष्टिपथात आली आहे.

ISRO RLV LEX
इस्रो भू अवतरण मोहिम – आरएलव्ही एलईएक्स (छायाचित्र – इस्रो/ट्विटर)

– संदीप नलावडे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वी चाचणी केली. त्यामुळे आता अवकाश यानाच्या स्वयंचलित भू अवतरणाची क्षमता ‘इस्रो’ने प्राप्त केली असून पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान मोहिमेची स्वप्नपूर्ती दृष्टिपथात आली आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

इस्रोची ‘आरएलव्ही एलईएक्स’ मोहीम काय आहे?

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील हवाई परीक्षण केंद्रात नुकतीच पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची म्हणजेच ‘आरएलव्ही एलईएक्स’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुनर्वापरयोग्य अंतरीक्ष यानाच्या जमिनीवर उतरण्यासंबंधीच्या सर्व बारकाव्यांची काटकोर पूर्तता करून ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी इस्रोच्या पाच प्रमुख चाचण्यांपैकी दुसरी असून पृथ्वीच्या कमी कक्षेत प्रवास करू शकतील, ‘पेलोड’ अर्थात उपग्रह वा तत्सम सामग्री अवकाशात विलग करू शकतील आणि पुन्हा अशा मोहिमासाठी पृथ्वीवर परत येऊ शकतील असे अंतराळ यान विकसित करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ‘आरएलव्ही एलईएक्स’साठी विकसित तंत्रज्ञान जागतिक समकालीन प्रचलित तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेचे असल्याने ‘इस्रो’ची इतर प्रक्षेपण यानेही अधिक किफायतशीर ठरतील, असे इस्रोला वाटते.

‘आरएलव्ही एलईएक्स’ची चाचणी कशी झाली?

हवाई दलाच्या ‘चिनूक’ या हेलिकॉप्टरच्या मदतीने रविवारी सकाळी ७.३० वाजता हे यान साडेचार किलोमीटर उंचीवर नेण्यात आले. मोहिमेसाठी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर मोहीम व्यवस्थापन संगणकाच्या आज्ञावलीनुसार आरएलव्ही हे यान ४.६ किलोमीटर उंचीवरून क्षितिज समांतर स्थितीत हवेत सोडण्यात आले. ताशी ३५० किलोमीटर वेगाने खाली उतरू शकेल अशी रचना आरएलव्हीची करण्यात आली होती. एकात्मिक मार्गक्रमण, मार्गदर्शक नियंत्रण प्रणाली वापरून हे यान चालविण्यात आले. मार्गदर्शक नियंत्रण प्रणालीचा वापर करून सकाळी ७.४० वाजता स्वयंचलित पद्धतीने या यानाचे धावपट्टीवर भू अवतरण करण्यात आले.

आरएलव्ही प्रकल्प किती जुना आहे?

आरएलव्हीची पहिली चाचणी करण्याचे इस्रोने २०१०मध्ये घोषित केले होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ती होऊ शकली नाही आणि पुढे ढकलण्यात आली. २०१५मध्येही तांत्रिक समस्यांमुळे चाचणी हाेऊ शकली नाही. कारण इस्रोने जिओसिंक्रोनस् सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (जीएसएलव्ही) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. अखेर ‘आरएलव्ही- व्हीडी’ची पहिली चाचणी २३ मे २०१६ रोजी घेण्यात आली. ‘हायपरसॉनिक फ्लाइट एक्सपिरिमेंट’ (एचईएक्स) मोहिमेंतर्गत ‘आरएलव्ही-टीडी’ यानाच्या पुनर्प्रवेश क्षमतेची यशस्वी चाचणी करण्यात आली, जी पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण यान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. २०१६मध्ये जेव्हा पहिला प्रयोग करण्यात आला, तेव्हा इस्रोच्या अधिकाऱ्यांनी त्याचे वर्णन ‘आरएलव्ही’च्या विकासातील ‘बालकाची पावले’ असे केले होते. १.७५ टन आरएलव्ही-टीडी वाहून नेणारे अवकाश यान ९१.१ सेकंदांसाठी अंतराळात सोडण्यात आले आणि सुमारे ५६ किलोमीटर उंचीवर पोहोचले. हे आरएलव्ही-टीडी यानापासून वेगळे झाले आणि सुमारे ६५ किलोमीटर उंचीवर गेले.

इस्रोचा आरएलव्ही-टीडी प्रकल्प काय आहे?

इस्रोने विकसित केलेला हा ‘रियुजेबल लाँच व्हेइकल- टेक्नॉलॉजी डेमॉन्सट्रेटर’ (आरएलव्ही-टीडी) प्रक्षेपक पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे. अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च कमी करण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा प्रक्षेपक महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या प्रक्षेपकाद्वारे उपग्रहाचे उड्डाण केले जाते. हा उपग्रह कक्षेत गेल्यानंतर प्रक्षेपकाचे कार्य संपते. मात्र प्रक्षेपक पृथ्वीवर उतरल्यास आणि तो हस्तगत करता आल्यास त्याचा पुन्हा वापर होऊ शकतो यासाठी आरएलव्ही-टीडी प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. ‘आरएलव्ही-टीडी’चा वापर हायपरसॉनिक फ्लाइट, ऑटोनॉमस लँडिंग, रिटर्न फ्लाइट एक्सपेरिमेंट, पॉवर्ड क्रूझ फ्लाइट आणि स्क्रॅमजेट प्रोपल्शन एक्सपेरिमेंट यांसारखे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.

‘आरएलव्ही’च्या दोन चाचण्यांमध्ये काय फरक आहे?

इस्रोच्या म्हणण्यानुसार आरएलव्ही-टीडी या पहिल्या चाचणीत बंगालच्या उपसागरावरील तात्पुरत्या गृहीत धरलेल्या धावपट्टीवर वाहन भू अवतरण करण्यात आले. मात्र ते अचूक नव्हते. रविवारी आरएलव्ही एलईएक्सच्या प्रयोगात धावपट्टीवर अचूक भू अवतरण करण्यात यश आले. एलईएक्स मोहिमेत अंतिम दृष्टिकाेन टप्पा गाठला आहे. ज्यामुळे स्वयंचलित पुनर्वापरयोग्यन यान बनविण्याच्या दिशेने दमदार पाऊल उचलले आहे. अंतराळ संशोधनासाठी आरएलव्ही एलईएक्स मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फेरवापर म्हणून यान वापरता येणार असल्यामुळे अंतराळ संशोधनाचा खर्च कमी होणार असून मागणीनुसार या यानाचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण: इस्रोच्या ‘वनवेब’ मोहिमेचे यश महत्त्वाचे का?

जागतिक स्तरावर आरएलव्ही तंत्रज्ञान किती प्रगत आहे?

आरएलव्ही प्रकल्पासाठी इस्रोने पंखांचे यान प्रथमच विकसित केले असून अमेरिकेतील नासा संस्थेच्या ‘डिस्कव्हरी’, ‘कोलंबिया’ आदी यानांप्रमाणेच त्याची रचना आहे. नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी पुनर्वापरयोग्य अंतराळ यान बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत. खासगी अवकाश प्रक्षेपण सेवा प्रदाता ‘स्पेस एक्स’ने २०१७ पासून ‘फाल्कन ९’ आणि ‘फाल्कन अवजड अवकाश याना’सह पुनर्वापर प्रक्षेपण प्रणालीचे प्रात्यक्षिक केले होते. स्पेस एक्स हे ‘स्टारशिप’ नावाच्या पूर्णपणे पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन प्रणालीवर काम करत आहे. अनेक खासगी प्रक्षेपण सेवा प्रदाते आणि सरकारी अंतराळ संस्था इस्रोबरोबर जगात पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण प्रणाली विकसित करण्यावर काम करत आहेत. रशिया, जपान, तसेच युरोपीय अवकाश संस्था याबाबत प्रयोग करत असून अद्याप त्यांना यात यश आलेले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Importance of isro rlv lex test and its future benefits print exp pbs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×