कपिल देव यांच्यासह जगातील २२ माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सहा महिन्यांत दुसर्यांदा पत्र लिहून इम्रान खान यांना योग्य वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे, त्याबद्दल-
माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पुन्हा पत्र का लिहिले?
जगातील २२ माजी क्रिकेट कर्णधारांनी इम्रान खान यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नुकतेच पत्र लिहिले आहे. फेब्रुवारी महिन्यात सुनील गावस्कर यांच्यासह १४ माजी कर्णधारांनी अडियाला कारागृहातील इम्रान यांच्या आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती. मात्र वासिम अक्रम, वकार युनिस आणि जावेद मियांदाद वगळता इतर कोणत्याही प्रमुख पाकिस्तानी क्रिकेटपटूने इम्रान खान यांच्यासंदर्भात अवाक्षरही काढलेले नाही. आताही मोईन खान यांनी इम्रान यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. पण बाकी पाकिस्तानी क्रिकेटपटू मूग गिळून गप्प आहेत.
कपिल देव यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी का मिळाली?
कपिल देव यांनी अलीकडेच एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान यांना तुरुंगात योग्य वागणूक दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पाकिस्तानातील मुख्य माध्यमांनी इम्रान खान यांचे नाव जवळपास टाकले आहे. पण कपिल देव यांच्या मुलाखतीनंतर तेथील मुख्य प्रवाहातील नाही, पण समाजमाध्यमांवरील पत्रकारांनी इम्रान खान यांच्या तुरुंगवासाविषयी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्याचवेळी भारतातील जंतर-मंतरवरील जेन-झी आंदोलन पाहून उत्तेजित झालेले पाकिस्तानी ब्लॉगर ‘आपण इम्रान खान यांच्या सुटकेसाठी भारतीय तरुणांप्रमाणे आंदोलन का करू नये,’ असे आवाहन करू लागले आहेत.
कपिल देव काय म्हणाले?
‘पाकिस्तानातील कायद्यांची आम्हाला माहिती नाही, तो एक वेगळा विषय आहे. तरीही, कोणताही कैदी असो त्याच्याशी सौजन्याने आणि माणुसकीने वागले जावे आणि त्याला मूलभूत सुविधा मिळायला हव्यात. इम्रान खान यांना शक्य तितके सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी आमची इच्छा आहे. आम्ही इतर कशाचीही मागणी करत नाही किंवा आम्हाला कोणत्याही विशिष्ट प्रतिसादाची अपेक्षा नाही. आम्ही पाकिस्तान सरकारला केवळ एक विनंती करत आहोत,’ असे कपिल देव यांनी आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.
जावेद मियांदाद यांच्या मुलाखतीने लक्ष का वेधले?
इम्रान खान यांचे दीर्घकालीन सहकारी आणि माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनीही एका मुलाखतीत इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आवाहन केले. ‘तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणारा माणूस नाही. तसे असते, तर त्याने खूप काही केले असते. त्याला बाहेर सोडले तर त्याने काय होणार आहे? तो कोणाला इजा करणार आहे का? तो सध्या काय करत असेल, याचा मी सतत विचार करतो,’ असे मियांदाद यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंना राजकीय महत्त्वाकांक्षा कितपत आहेत?
इम्रान खान यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा विकसित होत असताना मियांदाद यांनी कधी ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ तर कधी ‘मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट’ला पाठिंबा दिला होता. पण ते स्वत: कधी राजकारणाच्या रिंगणात उतरले नाहीत. दुसरीकडे, वासिम अक्रम आणि वकार युनूस हे दोघेही इम्रान खान यांच्याशी एकनिष्ठ आहेत. २०१८च्या ज्या निवडणुकीत ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ला यश मिळून इम्रान खान पंतप्रधान झाले, त्यावेळी वासिम आणि वकार या दोघांनीही प्रचारात उत्साहाने सहभाग घेतला होता. वासिम अक्रम यांनी अन्य क्रिकेटपटूंनाही समर्थनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर दोघांनीही राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले.
इम्रान खान यांच्या मुलांचे काय म्हणणे आहे?
लॉर्डस् येथे पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान क्रिकेट सामन्याआधी इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आथरटन यांनी ‘स्काय स्पोर्ट्स’साठी इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत घेतली. त्यात सुलेमान आणि कासिम यांनी आपल्या वडिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. इम्रान यांना तुरुंगातच ‘जीवे मारण्याचे उघड प्रयत्न’ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इम्रान यांच्यासाठी पत्र लिहिणार्या क्रिकेटपटूंमध्ये आथरटन यांचाही समावेश होता.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची भूमिका काय?
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी खेळाडूंना, माजी कर्णधार इम्रान खान यांच्या अटकेच्या मुद्द्यावर भाष्य न करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या देशातील विश्वचषक विजेत्या कर्णधाराच्या अटकेबाबत काही पाकिस्तानी खेळाडूंकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर ‘पीसीबी’ने हे पाऊल उचलले.
sandip.kadam@expressindia.com
