Premium

दलित पार्श्वभूमी आणि प्रसिद्ध पंजाबी गायकाची २७ व्या वर्षी हत्या; इम्तियाज अलीच्या चित्रपटातील ‘अमर सिंग चमकिला’ कोण आहे?

ग्रामीण भागातील जीवन, अमली पदार्थांचे व्यसन, बंदुका, विवाहबाह्य संबंध, हुंडा, व्यसन आणि पंजाबमधील मणगटशाही या विषयांवर चमकिलाने गाणी तयार केली होती. १९७९ ते १९८८ या काळात चमकिलाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता.

Amar Singh Chamkila and His wife Amajot Kaur Diljit Dosanjh
अमर सिंग चमकिला आणि त्याची पत्नी अमरजोतने पंजाबमध्ये लोककला सादर करून संगीत विश्वात धुमाकूळ घातला होता. (Photo – OfficialAmarSinghChamkila Facebook Page / Netflix)

पंजाबी लोकगायक अमर सिंग चमकिला याच्या हत्येला ३५ वर्षांचा काळ लोटला आहे. पंजाबचा इल्विस (Elvis Presley हा अमेरिकन गायक होता, ज्याच्या गाण्यांनी अमेरिकेतले संगीत विश्व भारावून गेले होते) म्हणून ओळख असलेला चमकिला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. इम्तियाज अली याने मंगळवारी (दि. ३० मे) रोजी अमर सिंग चमकिला याच्या जीवनावर २०२४ मध्ये चरित्रपट प्रदर्शित करत असल्याची घोषणा केली. तसेच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला. पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. पंजाबी संगीताचे अफाट विश्व आणि त्यामध्ये चमकिलासारख्या लोककलावंताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद याच्या आठवणी या ट्रेलरच्या निमित्ताने जाग्या झाल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या चमकिला आणि त्याच्या पत्नीची एका कार्यक्रमादरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली होती. अवघ्या २७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर पंजाबच्या संगीतविश्वात खळबळ माजली होती. कोण होता अमर सिंग चमकिला आणि त्याची गाणी एवढी प्रसिद्ध का होत होती? यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७९ ते १९८८ या काळात चमकिलाने ग्रामीण भागातील जीवन, अमली पदार्थांचे व्यसन, बंदुका, विवाहबाह्य संबंध, हुंडा, व्यसन आणि पंजाबमधील मणगटशाही या विषयांवर गाणी गाऊन पंजाबचे संगीत विश्व भारावून सोडले होते. चमकिलाची गाणी विद्रोही होती. तत्कालीन व्यावसायिक गायक गुरदास मान किंवा सुरिंदर कौर आणि आशा सिंग मस्ताना यांच्यापेक्षा चमकिलाची शैली जरा हटके होती.

चमकिलाची गाणी कर्कश आणि बिनधास्त होती. चमकिलाची जमेची बाजू म्हणजे त्याचा सुरेल आवाज. त्याच्या गाण्याची रचना ओबडधोबड असायची. गाण्यांचे लेखनही चमकिला स्वतः करायचा. बऱ्याचदा त्याच्या गाण्यात लैंगिक द्विअर्थ असायचा. चमकिलाच्या अनेक त्या वेळच्या निंदकांनी त्याच्या गाण्यावर सडकून टीका केली होती. चमकिलाच्या लाइव्ह शोचे नंतर अल्बममध्ये रूपांतर करण्यात आले. ज्यामुळे अनेक पिढ्या चमकिलाच्या चाहत्या झाल्या. चाहत्यांनी त्याला संगीतविश्वातला महान दर्जा दिला.

चमकिलाचे बालपण आणि गायक होण्याआधीचे आयुष्य

अमर सिंग चमकिलाचे खरे नाव धनी राम होते. आई करतार कौर आणि वडील हरी सिंग संदिला हे गरीब दलित कुटुंब होते. डुगरी या गावात धनी रामचा जन्म झाला होता, जे आता पंजाबच्या लुधियानामध्ये मोडते. वयाच्या सहाव्या वर्षीपासूनच धनी रामने गायला सुरुवात केली होती. त्याला इलेक्ट्रिशियन बनायचे होते. पण ते काही शक्य झाले नाही, म्हणून त्याने नातेवाईकांच्या मदतीने लुधियाना येथे कापड कारखान्यात नोकरी मिळवली. वयाच्या अठराव्या वर्षी गुरमैल कौर नामक मुलीशी त्याचे लग्न झाले. कौरपासून धनी रामला चार मुले झाली होती. त्यापैकी दोन मुलांचा बालपणीच मृत्यू झाला. दोन मुली अमनदीप आणि कमलदीप यादेखील पंजाबच्या लोकगायिका आहेत.

कापड कारखान्यात काम करत असताना धनी रामचा संगीताकडे कल वाढू लागला. नोकरी करत असतानाच त्याने हार्मोनियम आणि ढोलकी वाजण्याची कला अवगत केली. यासोबतच स्थानिक गायकांसोबत बसून गायनाचेही धडे गिरवायला सुरुवात केली. पंजाबी कवी शिवकुमार बटालवी यांच्या कवितांना गाण्याचे स्वरूप देणारे पंजाबचे पहिले लोकगायक के. दीप यांच्यासोबत धनी रामची गट्टी जमली होती. तसेच पंजाबी गायक मोहम्मद सादिक यांच्यासोबतही त्याची मैत्री झाली होती. मोहम्मद सादिक फरिदकोट येथून काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत.

संगीत शिकण्याच्या या प्रक्रियेदरम्यान धनी रामची भेट सुरिंदर शिंदा यांच्याशी झाली. सुरिंदर शिंदा तत्कालीन पंजाबी लोकगायक म्हणून प्रसिद्ध होते. धनी रामने त्यांचे शिष्य होऊन त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. शिंदा यांच्यासाठी धनी रामने अनेक गाणी लिहिली, त्यांच्या गायक संघात सामील होऊन कोरस दिला. पण या कामातून त्यांना महिन्याकाठी केवळ १०० रुपये मिळत होते, जे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी अपुरे होते. शेवटी धनी राम यांनी चमकिला या नावाने स्वतः गाणी गाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून कुटुंबासाठी पुरेसे पैसे मिळवता येतील.

पंजाबी गायकाचा उदय

गाणी गाण्यासाठी अमर सिंग चमकिला हे नाव धारण करण्याचा निर्णय धनी राम यांनी घेतला. चमकिला म्हणजे चमकणारा. या नावामुळे लोकांचे लक्ष वेधावे, असा त्यामागचा हेतू होता. गायक सुरिंदर सोनिया यांच्या पथकासोबत एकत्र येऊन चमकिलाने आठ गाण्यांचा पहिला अल्बम १९७९ साली प्रसिद्ध केला. अल्बम व्यवस्थित चालला, पण सोनिया यांचे मॅनेजर आणि पतीसोबत चमकिलाचे फारसे जमले नाही. त्यामुळे सोनिया यांची कंपनी सोडून गायिका उषा किरण यांच्यासोबत गाणे गाण्यास चमकिलाने सुरुवात केली. उषा किरण यांचे नाव अमरजोत कौर असे करण्यात आले. कालांतराने चमकिला आणि अमरजोतने लग्नही केले.

अमरजोतची गायकी चमकिलाच्या तोडीची नव्हती. चमकिलाच्या आधी तिने प्रसिद्ध गायक कुलदीप मानक यांच्यासोबत काम केले होते. गाणे गाण्यासाठी अमरजोतने आपला पहिला पती आणि घरदार सोडले होते. चमकिला आणि अमरजोत गाण्याच्या मंचावर असताना अतिशय बिनधास्तपणे कला सादर करत होते. जणू काही ते घरातच एकमेकांशी सहज संवाद साधत आहेत. दोघांनीही गायलेले प्रत्येक गाणे हिट ठरत होते. चमकिलाच्या पथकाकडून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला आखाडा असे म्हणत असत. (मोकळ्या जागेत मोफत कार्यक्रम) या आखाडाने पंजाबच्या प्रत्येक भागात धुमाकूळ घातला. मात्र त्यामुळे अनेक स्थानिक गायकांचा रोजगार हिरावून घेतला गेला. चमकिलाच्या कार्यक्रमाला मैदानात तुडुंब गर्दी व्हायची. लोक झाडांवर, घराच्या गच्चीवर चढून कार्यक्रम पाहायचे. अनेकांनी तर चमकिलाच्या कार्यक्रमाच्या तारखा पाहून घरातील लग्न त्याप्रमाणे ठरविली होती.

अमिर सिंग चमकिला आणि पत्नी अमरजोत गाणे सादर करताना. (Photo – Facebook)

त्या वेळेला प्रसिद्ध लोकगायक एका कार्यक्रमासाठी ५०० रुपये आकारत होते. तर चमकिला एका लग्नात गाण्यासाठी चार हजार रुपये मानधन घेत होता. एका वर्षात ३६५ पेक्षाही जास्त कार्यक्रम चमकिला करत होता. कधी कधी तर एकाच दिवशी वेगवेगळ्या गावांमध्ये त्याचे कार्यक्रम असायचे. चमकिलाचे गाणे लिहिण्याचे कौशल्य अतिशय सुरेख होतेच, त्याशिवाय गाणी सादर करण्याची त्याची शैलीही अनोखी होती. हातात तुंबी नावाचे वाद्य घेऊन गाणी सादर करणे, हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्या काळात पंजाबी चित्रपटांसाठीही त्याने गाणी गायली होती. तसेच गाणी सादर करण्यासाठी त्या काळात कॅनडा आणि दुबईचा प्रवास केला होता.

अमरजोत आणि चमकिला यांना एक मुलगा होता, ज्याचे नाव जैमन ठेवण्यात आले.

चमकिलाच्या कार्यक्रमाला अशाप्रकारे लोक गर्दी करत असत. (Photo – Facebook)

अशांत पंजाबच्या काळातील चमकिलाचे संगीत

१९८४ च्या सुवर्ण मंदिराच्या प्रसंगानंतर पंजाबमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शीखविरोधी दंगल, खलिस्तानचा उदय आणि वेगळ्या खलिस्तानची मागणी, दहशतवाद, हत्या, बॉम्बस्फोट, पोलिसांचे वाढते अत्याचार आणि मानवी अधिकारांचे होत असलेले उल्लंघन या पार्श्वभूमीवर चमकिलाची गाणी बेतलेली असत. चमकिलाच्या गाण्यांमध्ये लैंगिक द्विअर्थ असल्यामुळे दहशतवादी संघटनांकडून त्यांना अनेकदा धमक्या मिळत असत. पत्राच्या माध्यमातून ठार करण्याची धमकी मिळाल्यानंतर चमकिला काही दिवस मित्रांच्या घरी भूमिगत होत असत. काही दिवसांसाठी गाणी लिहिणेही थांबविले जायचे. पण जास्त काळ भूमिगत राहणे चमकिलाला जमायचे नाही, ते दोघेही पुन्हा कामाला सुरुवात करायचे.

चमकिलाचा मृत्यू आणि त्यामागचे षडयंत्र

८ मे १९८८ रोजी जालंधरमधील मेहसामपूर येथील गावात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी चमकिला आणि अमरजोत आले होते. गावात पोहोचल्यानंतर पांढऱ्या ॲम्बॅसेडर गाडीतून उतरताच मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळया झाडल्या. चमकिलाचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे वय फक्त २७ वर्षे होते. अमरजोत आणि चमकिला यांच्यासोबत त्यांचे दोन सहकलाकारदेखील या हल्ल्यात ठार झाले. या हल्ल्याची तक्रार दाखल झाली नाही आणि हल्ला झालेले आरोपीही कधीच पकडले गेले नाहीत.

अमर सिंग चमकिला आणि अमरजोतची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (Photo – Facebook)

या हल्ल्याच्या षडयंत्रावर आधारित अनेक कहाण्या जन्माला आल्या. त्याच्यावर आजपर्यंत बरेच चित्रपटही आलेले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांनी चमकिला आणि अमरजोतची हत्या केली. दोघा नवरा-बायकोमुळे अनेक गायक बेरोजगार झाले होते, त्यांचाही यामागे हात आहे, असे सांगितले जात होते. तर अमरजोत यांच्या जातीतील लोकांनी प्रतिष्ठेसाठी दोघांचा बळी घेतल्याचे बोलले गेले. अमरजोत या पंजाबमधील उच्च जातीतून येत होत्या. दलित असलेल्या चमकिलासोबत लग्न करण्यास त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे अमरजोत यांचे पार्थिव स्वीकारण्यासही तिच्या कुटुंबीयांनी विरोध केला. तसेच चमकिला आणि अमरजोत यांच्या मुलालाही त्यांनी स्वीकारले नाही. शेवटी चमकिला यांच्या पहिल्या पत्नीने या मुलाचा सांभाळ केला.

चमकिलाच्या आयुष्यावर २०१८ साली मेहसामपूर हा चित्रपट आला होता. तर दोसांज आणि निर्लम खैरा अभिनीत ‘जोडी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. २०१४ साली लेखक गुलझार सिंग यांनी चमकिलाच्या आयुष्यावर ‘आवाज नही मर दी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Imtiaz alis new film amar singh chamkila who was the controversial punjabi dalit folk musician who died at age of 27 kvg