ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील वाहतुकीचा भार हलका करून मुंबई ते नवी मुंबई, पुणे प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे खाडीवर तिसरा पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. ‘ठाणे खाडी पूल – ३’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे आता ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. ही मार्गिका सुरू झाल्याने कोणाला आणि कसा फायदा होणार, ठाणे खाडी पूल – ३ प्रकल्प कसा आहे, याचा हा आढावा…

मुंबई-पुणे वाटेवर ओलांडून किती खाडी पूल?

मुंबई आणि नवी मुंबईला रस्तेमार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल वापरात आहेत. पहिला ठाणे खाडी पूल १९७३ मध्ये बांधण्यात आला असून दोन पदरी असलेल्या या खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते. याच ठाणे खाडी पुलापासून नजीक २२ मीटर अंतरावर १९९४ मध्ये ठाणे खाडी पूल – २ बांधण्यात आला आहे. या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे ठाणे खाडी पूल – २ वरील भार दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असल्याने आता या पुलाची क्षमताही खालावली आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
pager blasts in Lebanon marathi news
विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?
Nawab Malik Son in Law Accident
Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन

हेही वाचा : विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?

तिसर्‍या खाडी पुलाची गरज काय?

सध्या ठाणे खाडी पूल – १ आणि ठाणे खाडी पूल – २ वरून सध्या मोठ्या संख्येने वाहतूक होत आहे. त्यातही ठाणे खाडी पूल – २ वरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा पूल वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी कमी पडू लागला आहे. परिणामी मुंबई ते नवी मुंबई आणि पुढे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. इंधन आणि वेळ वाया घालवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने तिसरा खाडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. ठाणे खाडी पूल – ३ या नावाने २०२० पासून प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या प्रकल्पाचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला. तर २४ नोव्हेंबर २०१७ रोजी यासंबंधीच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली. निविदा प्रक्रिया राबवत २९ ऑक्टोबर २०२० रोजी कंत्राटदारास कार्यादेश देत बांधकामास सुरुवात करण्यात आली.

ठाणे खाडी पूल – ३ प्रकल्प नेमका कसा?

एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प एकूण १.८३७ किमी लांबीचा आहे. ठाणे खाडी पूल – २ ला समांतर तीन-तीन मार्गिकांचा हा तिसरा खाडी पूल आहे. तर या तिसर्‍या पुलाला जोडणारे मुंबईसाठी आणि नवी मुंबईसाठी असे पोहोच रस्ते आहेत. या पुलाचा खर्च निविदेनुसार ५५९ कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. तर मूळ खर्च ७७५.५७ कोटी रुपये असा आहे. दरम्यान हा खाडी पूल आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना संकट आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण आता मात्र एमएसआरडीसीने या प्रकल्पाच्या कामास वेग दिला आहे.

हेही वाचा : यावर्षी देशभरात पाऊस तर समाधानकारक! पण जलसाठ्यांची स्थिती काय आहे?

पूल वाहतूक सेवेत कधी दाखल होणार?

प्रकल्पाच्या कामास २०१७ मध्ये सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने काम सुरू होण्यास २०२० उजाडले. काम सुरू झाले आणि त्यानंतर लगेच करोनाचे संकट आले. त्याचा फटका या प्रकल्पाच्या कामास बसला. पण आता कामाने वेग घेतला असून या प्रकल्पातील मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका पूर्ण झाली आहे. आता केवळ या मार्गिकेच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. त्यानुसार आचारसंहितेपूर्वी, सप्टेंबरअखेरीस वा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मार्गिकेचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ मिळाला की मार्गिकेचे लोकार्पण करत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. मात्र त्याच वेळी या प्रकल्पातील उत्तरेकडील अर्थात पुण्याहून, नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीच्या मार्गिकेचे काम अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास डिसेंबरअखेर उजाडणार आहे. मार्गिका सेवेत दाखल करण्यासाठी जानेवारी २०२५ उजाडणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये या मार्गिकेचे लोकार्पण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

हेही वाचा : तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम

मुंबई ते नवी मुंबई, पुणे प्रवास वेगवान कसा?

खाडी पूल – ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील, मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका लवकरच वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईहून नवी मुंबई, पुण्याला जाण्यासाठी खाडी पूल – १ आणि २ सह आणखी एका खाडी पुलाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणे खाडी पूल – २ वरील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणावर हलका होणार असून वाहनचालक-प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईहून नवी मुंबईला जाणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असून मुंबईहून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे राज्यातील कानाकोपऱ्यात जाणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.