दशकभरापासूनचा 'आयसीसी' जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यात भारतीय संघाला पुन्हा अपयश आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास लाखभर प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १९८३ आणि २०११ नंतर तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. तसेच २००३च्या अंतिम लढतीत झालेल्या दारुण पराभवाचा वचपाही राहून गेला. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाची मानसिकता आणि पॅट कमिन्सचे खंदे नेतृत्वही निर्णायक ठरले. कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय आश्चर्यकारक, पण धाडसी का ठरला? भारतात एखादा सामना होत असताना तेथील खेळपट्टीबाबत चर्चा झाली नाही तरच नवल. त्यातच तो विश्वचषकाचा अंतिम सामना असल्यास अधिकच तर्क वितर्क लावले जाणार हे अपेक्षितच. अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सला खेळपट्टीबाबत विचारले असता त्याने सावध पवित्रा घेतला होता. ‘‘खेळपट्टीचे अवलोकन करण्यात मी फारसा पटाईत नाही,’’ असे कमिन्स म्हणाला. त्याच कमिन्सने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि खेळपट्टीबाबत आपले विचार स्पष्टपणे मांडले. ‘‘खेळपट्टी कोरडी दिसत आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाचे आव्हान असू शकेल. तसेच सामना जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला,’’ असे नाणेफेकीच्या वेळी कमिन्स म्हणाला. अखेर कमिन्सचा निर्णय धाडसी आणि योग्य ठरला. हेही वाचा - विश्लेषण : नागरी बँकांना आता तरी व्याजावर सवलती मिळतील? चांगल्या सुरुवातीनंतर भारताची धावसंख्या मर्यादित राहण्यामागे निर्णायक क्षण कोणता? ‘सूर्य किरण’ पथकातर्फे हवाई कसरत, तारेतारकांसह मान्यवरांची उपस्थिती यामुळे सामन्याच्या सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. त्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळताच अहमदाबादेतील स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. त्यानंतर रोहित शर्माने फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांचा आवाज अधिकच वाढला. मात्र, प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यांनी भरलेल्या स्टेडियमला शांत करण्यासारखे दुसरे समाधान नाही असे कमिन्स अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणाला होता. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ३१ चेंडूंत ४७ धावांची खेळी करून बाद झाला. भारताच्या डावातील हा निर्णायक क्षण ठरला. यानंतर प्रेक्षक शांत झालेच, शिवाय भारताच्या डावाचा पूर्ण सूरच बदलला. पहिल्या १० षटकांत ८० धावा करणाऱ्या भारताला पुढील ४० षटकांत केवळ १६० धावा करता आल्या. रोहितने एकट्याने ३१ चेंडूंत चार चौकार व तीन षटकार मारले. तर अन्य फलंदाजांना मिळून उर्वरित २६९ चेंडूंत केवळ नऊ चौकार मारता आले. कोहली आणि राहुलची फलंदाजीची शैली टीकेला पात्र ठरते का? रोहित, गिल आणि श्रेयस बाद झाल्याने भारताची ३ बाद ८१ अशी स्थिती झाली. त्यावेळी भारताला आणखी ३९.४ षटके खेळायची होती आणि विराट कोहली-केएल राहुल ही जोडी खेळपट्टीवर होती. यानंतर केवळ सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा हे दोनच फलंदाज शिल्लक होते. त्यामुळे कोहली आणि राहुल जोडीला सावधपणे खेळावे लागले. मात्र, बघता-बघता षटके होत गेली, पण त्यांना धावांचा वेग वाढवण्यात अपयश आले. आम्हाला ३०-४० धावा कमी पडल्याचे भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड अंतिम सामन्यानंतर म्हणाला. भारताने १०व्या षटकानंतर थेट २७व्या षटकात चौकार लगावला. कोहलीने ६३ चेंडूंत ५४ धावा केल्या, तर राहुलने ६६ धावा करण्यासाठी १०७ चेंडू घेतले. राहुलला आपल्या खेळीत केवळ एक चौकार मारता आला. त्यामुळे ते काही प्रमाणात टीकेला पात्र ठरतात. दोन संघांतील क्षेत्ररक्षणात काय फरक होता? भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. प्रत्येक सामन्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांची सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला विविध प्रकारे पदक देण्याची पद्धत समाजमाध्यमांवर खूप गाजली. अंतिम सामन्यात मात्र दडपणाखाली भारताने बऱ्याच चुका केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिल्याच चेंडूवर बुमराने वॉर्नरला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. परंतु वॉर्नरच्या बॅटची कड घेतलेला चेंडू पहिल्या स्लीपवरील कोहली आणि दुसऱ्या स्लीपवरील गिलच्या मधून गेला. दोघांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच यष्टिरक्षणात केएल राहुलला बरेचदा चेंडू अडवण्यात अपयश आले. याउलट ऑस्ट्रेलियाने आपल्या जागतिक दर्जाच्या क्षेत्ररक्षणाने किमान ३०-४० धावा वाचवल्या. तसेच हेडने मागील दिशेला धावत जात सूर मारून रोहितचा उत्कृष्ट झेल पकडला. हा दोन संघांतील मोठा फरक ठरला. हेही वाचा - छठ पूजा: हा बिहारचा महत्त्वाचा सण का आहे? कर्णधार कमिन्सची भूमिका किती महत्त्वाची? यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत कमिन्सच्या नेतृत्वगुणांचा कस लागला. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने गमावले होते. मात्र, लखनऊ येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कमिन्सने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेतील आव्हानाला बळ मिळाले. ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड सुरू झाली ती अंतिम सामन्यातही कायम राहिली. अंतिम सामन्यात कमिन्सचे नेतृत्व आणि गोलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली. गोलंदाजांचा योग्य वापर आणि अचूक क्षेत्ररचना यामुळे कमिन्सने भारतीय फलंदाजांवर दडपण राखले. त्याने गोलंदाजांना छोटेखानी म्हणजेच एका वेळी दोन-तीन षटकांचेच स्पेल दिले. तसेच त्याने स्वतः अप्रतिम गोलंदाजी करताना लयीत असलेल्या श्रेयस आणि कोहली यांना माघारी धाडले. त्याने १० षटकांत केवळ ३४ धावाच दिल्या. हेडची शतकी खेळी कौतुकास्पद का ठरली? २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळती झाली. पहिल्या १० षटकांत चेंडू चांगला स्विंग होत होता आणि याचा बुमरा-शमी जोडीने योग्य वापर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४७ अशी स्थिती झाली होती. एका बाजूने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने ट्रॅव्हिस हेडने मात्र संयम राखला. त्याने धावा करण्यासाठी संधीची वाट पाहिली. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळणे थांबताच हेडने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्याने ५८ चेंडूंत अर्धशतक, तर ९५ चेंडूंत शतक साकारले. हेडने १३७ धावांच्या खेळीत १५ चौकार व चार षटकार मारले. त्याला लबूशेनने ११० चेंडूंत नाबाद ५८ धावांची खेळी करताना मोलाची साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एकूण सहाव्यांदा आणि गेल्या सातपैकी पाच एकदिवसीय विश्वचषकांत जेतेपदावर मोहोर उमटवता आली. भारताच्या जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना अंतिम सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.