भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दोन्ही देशांची जुनी मैत्री आणि सामरिक गरज लक्षात घेता हा दुरावा फार काळ राहू देणे दोन्ही भारताच्या आणि बांगलादेशच्याही फायद्याचे नाही. त्यामुळेच हे संबंध सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?

द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून भारताने बांगलादेशातील उच्चायुक्तपदी एखाद्या आयएफएस किंवा राजनैतिक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याऐवजी ही जबाबदारी राजकीय नेत्याकडे सोपवली. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेते दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिवेदी यांना दोन्ही देशांतील संबंधांची चांगली जाण आहे. तसेच ते बंगाली उत्तम बोलू शकतात. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशच्या पार्लमेंटचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींदरम्यान संबंध दृढ करण्याविषयी चर्चा करण्यात आली. दुसरीकडे, सीमाभागातील बाजारपेठा खुल्या करण्याच्या मुद्द्यावर ढाक्यात उच्चाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये व्यापारातील अडथळे दूर करणे तसेच बंदरे व रस्तेमार्गे मालवाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यावरही चर्चा करण्यात आली.

तारिक रहमान यांच्या दौऱ्यासाठी भारत प्रयत्नशील का आहे?

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. मग दिल्लीमध्ये सत्ता कोणत्याही राजकीय पक्षाची असो. मात्र, त्या सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला, फेब्रुवारीमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी) विजयी झाली. भारताशी फारशे सख्य नसलेल्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भारताने त्या देशाच्या अंतर्गत राजकारणापासून दूर राहत नव्या सरकाशी संबंध सुधारण्याची योग्य भूमिका घेतली. रहमान यांना देण्यात आलेल्या शुभेच्छांदरम्यान त्यांना ब्रिक्स परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण देण्यात आले. तेव्हापासून तारिक रहमान यांनी भारताचा दौरा करावा आणि तो यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बांगलादेश का संतप्त?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या पदच्युत झाल्यावर त्यांनी देश सोडला आणि भारताने त्यांना आश्रय दिला. तेथील न्यायालयाने त्यांना ऑगस्ट २०२४मधील विद्यार्थी निदर्शने मोडून काढण्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याच्या आणि निदर्शकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर भारताने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करावे, अशी बांगलादेशने मागणी केली आहे. मात्र, शेख हसीना यांना आश्रय देण्याची भूमिका घेतलेल्या भारताने बांगलादेशची विनंती अद्याप मान्य केलेली नाही. त्यातच, बांगलादेशी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर, शेख हसीना यांनी दिल्लीमध्ये दूरदृश्य प्रणालीने पत्रकार परिषद घेतली. त्यावर बांगलादेशमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर शेख हसीना यांच्या विधानांशी भारत सरकार समहत नसल्याचे, तसेच पत्रकार परिषद आयोजित करण्याशी सरकारचा संबंध नसल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने केला. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांसमोरील आव्हान वाढले.

बांगलादेशची भूमिका काय आहे?

ब्रिक्स शिखर परिषद १२-१३ सप्टेंबरला होणार आहे. परिषदेला एक आठवड्यापेक्षा कमी काळ उरलेला असताना बांगलादेशने अद्याप तारिक रहमान यांचा दौरा निश्चित केलेला नाही. परस्पर आदर आणि परस्पर हितसंबंध लक्षात घेऊन, तसेच दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपलब्ध वेळा लक्षात घेऊन आम्ही दौऱ्याची तारीख निश्चित करू असे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री हूमायूं कबीर यांनी सांगितले आहे. हूमायूं कबीर हे तारिक रहमान यांचे जवळचे मित्रही आहेत. “आम्ही बांगलादेशच्या भूमीवरून कोणत्याही दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही आणि बांगलादेशातील फरारी दहशतवाद्यांना भारताने दिल्लीत आणि अन्यत्र कुठेही स्थान देऊ नये,” असे हूमायूं यांनी म्हटले आहे. मात्र, ‘बीएनपी’ सरकारने कितीही आग्रह धरला तरी शेख हसीना यांना बांगलादेशच्या थेट ताब्यात दिले जाण्याची शक्यता कमी आहे. हसीना यांनी आपल्या पत्रकार परिषदेत या वर्षाच्या सुरुवातीला मायदेशी परत जाण्याचे सूतोवाच केले. पण त्या भारतात असेपर्यंत तरी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल भारत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. अशा परिस्थितीत बांगलादेश केवळ या एका मुद्द्यावर द्विपक्षीय संबंध पणाला लावणार नाही. त्याचवेळी भारतासाठी आपले स्थान महत्त्वाचे आहे हे तेथील नेते लक्षात ठेवणार हे निश्चित.

भारतासाठी बांगलादेश का महत्त्वाचा?

भारताची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सीमा बांगलादेशबरोबर आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पसरलेली ही सीमा ४,०९६ किमी इतकी मोठी आहे. भारताने बांगलादेशला तिन्ही देशांनी घेरलेले असून दक्षिणेला बंगालचा उपसागर आणि आग्नेय दिशेला म्यानमार आहे. यामध्ये ईशान्येकडील राज्ये आणि उर्वरित भारत यांना जोडणारा २२ किमी लांबीचा अरुंद सिलिगुडी कॉरिडॉर (चिकन्स नेक) हा भूभाग सामरिकदृष्ट्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो बांगलादेशला लागूनच आहे. याच्या जोडीला सागरी प्रदेशाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. दुसरीकडे, दक्षिण आशियात बांगलादेश हा भारताच्या सर्वात मोठ्या व्यापार भागीदार देशांपैकी आहे. सध्या हा द्विपक्षीय व्यापार वार्षिक १३ ते १४ अब्ज डॉलर इतका आहे आणि तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. थोडक्यात, सुरक्षा आणि सामरिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्याही बांगलादेश हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे.

बांगलादेशसाठी भारताचे महत्त्व

भारत हा चीननंतर बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश आहे. बांगलादेशची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात तेथील कापड आणि तयार कपड्यांच्या उद्योगावर आधारित आहे. या मालाच्या निर्यातीतून बांगलादेशला दरवर्षी ४७ अब्ज डॉलरची कमाई होते. त्यासाठी लागणारा कच्चा कापूस हा प्रामुख्याने भारताकडून आयात केला जातो. त्याशिवाय त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, विद्युतपुरवठाही भारताकडून केला जातो. थेट विद्युतपुरवठा करण्याबरोबरच बांगलादेशातील विद्युतनिर्मितीसाठी आवश्यक असलेला डिझेलचा पुरवठाही भारत करतो. अमेरिका-इराण युद्धादरम्यान भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा झाल्यानंतरही बांगलादेशला केल्या जाणाऱ्या डिझेल पुरवठ्यात खंड पडू दिला नव्हता. या सर्व बाबी पाहता बांगलादेशसाठीही आर्थिक आणि सुरक्षेच्या कारणावरून भारत अतिशय महत्त्वाचा शेजारी देश आहे.
nima.patil@expressindia.com