India Builds Baby BrahMos रशिया-युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील युद्धांमधून मिळालेल्या जागतिक धड्यानंतर आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षानंतर भारत आपले लष्करी बळ वापरण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. भारताला आधुनिक युद्धाचे गणित लक्षात आले आहे. भारत हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, आधुनिक शस्त्रे विकसित करत आहे. जागतिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा ही आता प्रामुख्याने पल्ला, वेग आणि टिकाऊपणा यावर केंद्रित झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेली ‘पिनाका रॉकेट सिस्टम’ केंद्रस्थानी आहे.

मुळात भारतीय लष्करासाठी ‘मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर’ म्हणून विकसित केलेली ही प्रणाली तिच्या अचूकतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. आता पिनाकाचे हवेतून मारा करणाऱ्या आवृत्तीत रूपांतर करण्यात आले आहे. भारतीय सेनेचे लक्ष आता केवळ महागड्या क्षेपणास्त्रांवर नसून त्यांच्या ‘मिनी मॉडेल्स’वरदेखील आहे. या नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या ‘पिनाका रॉकेट सिस्टम’लाच बेबी ब्राम्होस म्हटले जात आहे. काय आहे ही प्रणाली? याला बेबी ब्राम्होस असे नाव का देण्यात आले? जाणून घेऊयात…

अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पिनाकाच्या या हवाई आवृत्तीचा उद्देश उच्च श्रेणीतील महागड्या शस्त्रांप्रमाणे परिणाम साधणे हा आहे, पण ही प्रणाली अगदी कमी खर्चात विकसित केली जात आहे. पिनाका प्रणालीच्या एका युनिटची किंमत साधारणपणे २.३ कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे, अमेरिकेची ‘M142 HIMARS’ सारखी यंत्रणा जगात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि तिच्या एका युनिटची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.

जर ही क्षमता परदेशातून आयात केली असती तर ती १० पट अधिक किमतीला मिळाली असती. आता भारतीय शास्त्रज्ञांनी एक स्वदेशी पर्याय तयार केला आहे, जो अत्यंत किफायतशीर आहे. संरक्षण क्षेत्रातील वृत्तांनुसार, फ्रान्ससह अनेक देशांनी या प्रणालीत रस दाखवला आहे. फ्रेंच लष्कर आपल्या जुन्या होत चाललेल्या रॉकेट आर्टिलरी प्लॅटफॉर्मला बदलण्यासाठी पिनाकाची निवड करण्याचा विचार करत आहे. भारत आणि फ्रान्समध्ये यासंबंधित अद्याप कोणताही अधिकृत करार झालेला नाही.

ब्रह्मोस असताना या हवाई आवृत्तीची गरज का?

हवेतून मारा करणाऱ्या पिनाकाची तुलना ‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राशी केली जात आहे. ब्रह्मोस हे भारताचे सर्वात शक्तिशाली शस्त्र मानले जाते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मॅक ३ (Mach 3). ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी डिझाइन केलेले हे क्षेपणास्त्र रडारच्या नजरेतून वाचण्यासाठी कमी उंचीवरून उडत युद्धनौका, मजबूत बंकर्स आणि नियंत्रण केंद्रे उद्ध्वस्त करू शकते.

मात्र, एका ब्रह्मोस क्षेपणास्त्राची किंमत ३५ ते ४० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. या तुलनेत पिनाका घन इंधनावर म्हणजेच सॉलिड फ्यूलवर चालते. पिनाकाची हवाई आवृत्ती फायटर विमानांमध्ये बसवण्यासाठी त्याची लांबी कमी करून साधारण ४.८ मीटर करण्यात आली आहे. उंचावरून सोडल्यानंतर ते हवेच्या दाबाचा वापर करून लक्ष्याकडे झेप घेते आणि मधेच आपली दिशा बदलू शकते. त्यामुळे शत्रूला हे क्षेपणास्त्र कठीण जाते.

संरक्षण विश्लेषकांच्या मते, याचा वापर मोठ्या धोरणात्मक पायाभूत सुविधांऐवजी शत्रूचे टँक, सैन्याची तुकडी, धावपट्टी आणि लॉजिस्टिक हब नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ब्रह्मोस हे अत्यंत महत्त्वाच्या आणि कडक सुरक्षा असलेल्या लक्ष्यांसाठी आहे, तर पिनाका कमी खर्चात अचूक मारा करण्यासाठी तयार केले जात आहे. दोन्ही क्षेपणास्त्रे घातक आहेत, मात्र त्यांची भूमिका आणि वापर वेगवेगळे आहेत.

इस्रायलबरोबर धोरणात्मक चर्चा

भारताचे वाढते सामर्थ्य केवळ स्वदेशी यंत्रणांपुरते मर्यादित नाही. इस्रायलने भारताला ‘गोल्डन होरायझन’ हे हवेतून मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. या क्षेपणास्त्राची अधिकृत माहिती अद्याप गोपनीय आहे. मात्र, त्याचा पल्ला १,००० ते २,००० किलोमीटरदरम्यान असल्याचा अंदाज आहे. जर हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील झाले, तर ते भारतीय वायुसेनेच्या सुखोई Su-30MKI विमानांशी जोडले जाईल, त्यामुळे भारताची लांब अंतरावरून मारा करण्याची क्षमता वाढेल.

इस्रायलने यापूर्वी भारताला ‘लोरा’ आणि ‘रॅम्पेज’सारखी शस्त्रे पुरवली आहेत. ही कमी पल्ल्याची शस्त्रे आहेत. मात्र, ‘गोल्डन होरायझन’ हे एका वेगळ्या श्रेणीतील शस्त्र मानले जाते. हे क्षेपणास्त्र जमिनीखाली खोलवर असलेले बंकर्स आणि मजबूत सुविधा फोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे क्षेपणास्त्र सोडल्यानंतर वेगाने वर जाते आणि नंतर अत्यंत तीव्र वेगाने खाली येते, परिणामी त्याच्या आघाताची शक्ती प्रचंड वाढते.

भारताची आधुनिक युद्धनीती

स्वदेशी एअर-लाँच पिनाका आणि इस्रायलचा प्रस्ताव हे दोन्ही विकास भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा भाग आहेत. स्वस्त दरातील रॉकेट, सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि भविष्यातील एअर-लाँच बॅलिस्टिक प्रणाली यामुळे भारताकडे युद्धाच्या प्रत्येक परिस्थितीसाठी विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. प्रादेशिक सुरक्षेची बदलती समीकरणे पाहता, भारतासाठी ‘कॉस्ट एफिशिअन्सी’ हा मोठा फायदा ठरत आहे. २.३ कोटी रुपयांचे हे रॉकेट केवळ भारतासाठीच नव्हे, तर निर्यात बाजारामध्येही शस्त्रास्त्रांचे गणित बदलून टाकणारे ठरणार आहे.