Aug 31, 2020 India China border tensions : माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान या पुस्तकातील संदर्भाचा उल्लेख करीत चिनी घुसखोरीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला; पण सरकारने संसदीय नियमांचा हवाला देत त्यांना रोखल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. जनरल नरवणे यांनी २०१९ ते २०२२ या काळात भारतीय लष्कराचे प्रमुखपद भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात पूर्व लडाखमध्ये भारत-चीन यांच्यात नियंत्रण रेषेजवळ तणाव निर्माण झाला होता. त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

नरवणे यांच्या पुस्तकात नेमके काय?

जनरल नरवणे यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात ३१ ऑगस्ट २०२० रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. त्यावेळी पूर्व लडाखमधील ‘रेचिन ला’ भागातून चिनी रणगाडे वेगाने भारतीय सीमेकडे सरकत होते. अत्यंत तणावाच्या क्षणी भारतीय राजकीय नेतृत्वाकडून (पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री) स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला आणि शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपवण्यात आल्याचे नरवणे यांच्या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय २०२३ मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ भरती योजनेबाबत सशस्त्र दलांमध्ये झालेल्या चर्चांचा तपशीलही या पुस्तकात असल्याचे सांगितले जात आहे.

३१ ऑगस्टपूर्वी नेमके काय घडले होते?

ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत-चीन यांच्यातील लडाख सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यात आला होता. त्याआधी या संघर्षाची खरी सुरुवात एप्रिल २०२० मध्येच झाली होती. त्यावेळी पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. चीनने सीमेजवळ पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू करून, मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले होते. चीनच्या या हालचालींना उत्तर म्हणून भारतानेही तातडीने लडाख सेक्टरमध्ये आपले सैन्य आणि युद्धसामग्री तैनात करण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही देशांमधील तणावाचे रूपांतर अचानक हिंसक संघर्षात झाले. नियंत्रण रेषेजवळील दोन वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जवानांची चिनी सैन्याबरोबर झटापट झाली. या चकमकींमध्ये दोन्ही बाजूंचे अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले.

आणखी वाचा : India-US Trade Deal: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताचे व्यापार धोरण कसे बदलले?

भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक झटपट

लडाखमधील चकमकीत भारतीय लष्कराचे दोन अधिकारी आणि सुमारे ७० हून अधिक सैनिक जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेनंतर हा वाद तात्पुरता मिटवण्यात आला. मात्र, परिस्थिती कायम तणावपूर्णच राहिली. त्याआधी काही आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमधील जवानांमध्ये झालेली एक छोटी झटापटही परस्पर चर्चेतून शांततेत निकाली निघाली होती. लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील पँगॉग त्सोच्या उत्तर काठावर सप्टेंबर २०१९ मध्येही भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यात शेवटची मोठी चकमक झाली होती. अनेक आठवड्यांच्या तणावानंतर अखेर ६ जून २०२० रोजी भारत आणि चीनच्या लष्करी प्रमुखांमध्ये पहिली औपचारिक चर्चा झाली. सीमेवरील सैन्य मागे घेण्याबाबत प्राथमिक चर्चा करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

गलवान खोऱ्यातील संघर्ष कसा झाला?

लष्करी पातळीवरील चर्चेनंतर भारत आणि चीनकडून सलोख्याची विधाने करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच दोन्ही देशांमधील तणाव कमी होऊन, दोघांचेही सैन्य माघारी फिरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. संघर्ष टाळण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेखा आणि श्योक-गलवान नद्यांच्या संगमादरम्यान एक ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) तयार करण्याचे ठरले होते. या प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी भारतीय लष्कराने कर्नल संतोष बाबू यांच्यावर दिली होती. यादरम्यान १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झटापट झाली. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारतीय लष्कराचे २० जवान हुतात्मा झाले. चीनने त्यांच्या मृत किंवा जखमी सैनिकांची अधिकृत आकडेवारी कधीच जाहीर केली नाही; मात्र काही अंदाजांनुसार या झटापटीत चीनच्या ४० हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.

चिनी सैन्याकडून क्रूर हल्ला

भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांनी काटेरी तारा गुंडाळलेले रॉड आणि काठ्यांचा वापर केल्याचे समोर आले होते. काही भारतीय जवान गलवान नदीत पडल्यामुळे मृत्युमुखी पडल्याचेही सांगितले जाते. उंच डोंगराळ भागातील तीव्र थंडीमुळे अनेक जवानांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पीपी-१४ परिसरात बैठक झाली. त्यानंतर आठवडाभरातच पुन्हा चर्चेची दुसरी फेरीही पार पडली. तरीदेखील पुढील अनेक आठवडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव कायम राहिला. त्यावेळी दोन्ही देशांनी लडाखमध्ये अतिरिक्त सैन्याची कुमक व मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्री तैनात केली होती.

३१ ऑगस्ट २०२० मध्ये काय घडले?

पूर्व लडाखमधील सीमावादाच्या इतिहासात ३० ऑगस्ट २०२० ची रात्र अत्यंत निर्णायक ठरली. त्यावेळी भारतीय लष्कराने एक धाडसी पाऊल उचलले आणि पँगॉग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ‘रेचिन ला’ भागातील काही महत्त्वाच्या उंच ठिकाणांवर नियंत्रण मिळवले. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चिनी सैन्याने कुरापती सुरूच ठेवल्यामुळे हा प्रतिबंधक निर्णय घेतल्याचे भारतीय लष्कराने त्यावेळी स्पष्ट केले होते. तंयादरम्यान ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी तत्कालीन लष्करप्रमुखांना उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जोशी यांचा फोन आला. त्यांनी ‘रेचिन ला’ भागाकडे चीनचे चार रणगाडे येत असल्याचे माहिती दिली. त्यावेळी चिनी सैनिकांनी एक तोफगोळाही भारतीय सैन्याच्या दिशेने डागला होता; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट आदेश मिळेपर्यंत भारतीय लष्कराला गोळीबार न करण्याचे निर्देश देण्यात आले होते, असे नरवणे यांनी नमूद आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

हेही वाचा : जनरल नरवणे यांच्या ‘त्या’ पुस्तकात नक्की काय आहे? लोकसभेतील गदारोळ कशासाठी?

भारत-चीन संघर्षावर कसा तोडगा निघाला?

चिनी रणगाडे सीमारेषेजवळ आल्यानंतर भारतीय राजकीय नेतृत्वाकडून (पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री) शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार लष्करावरच सोपवण्यात आला. त्यानंतर भारतीय जवानांनी तत्काळ इशारे देऊन हवेत गोळीबार केला. अखेरीस चिनी रणगाड्यांनी माघार घेतल्याने पुढील अनर्थ टळला, असेही नरवणे यांनी पुस्तकात म्हटले आहे. त्यानंतरही अनेक महिने नियंत्रण रेषेजवळील तणाव कायम राहिला. ऑगस्ट २०२० ते जानेवारी २०२१ या काळात दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये शांतता चर्चेच्या चार फेऱ्या पार पडल्या. फेब्रुवारी २०२१ मध्ये पँगॉग त्सोच्या उत्तर व दक्षिण काठावरून दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्यावर सहमती दर्शवली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीत दहावी लष्करी बैठक झाली. मात्र, त्यानंतरही पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी हजारो सैनिक तैनात ठेवण्यात आले आहेत.