India Crude Oil Import from 41 countries: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताने इतर देशांकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायूची आयात करणे सुरू केले आहे. युद्ध सुरू होण्याआधी भारत २७ देशांकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायू आयात करत होता. आता एकूण ४१ देश भारताला पुरवठा करत आहेत. रशियाकडून कच्चे तेल, तर लॅटिन अमेरिका व आफ्रिकेकडून नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. भारताला तेल व नैसर्गिक वायू पुरवणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होत आहे. भारताला असलेली इंधनाची गरज पाहता मागील काही वर्षांपासून इंधन पुरवठा सुरळीत कसा राहील यासाठी प्रयत्न केले जात होते. भारताला तेलाचा व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे नवीन देश कोणते? सविस्तर जाणून घेऊयात.
कच्चे तेल व नैसर्गिक वायूची आवश्यकता किती?
भारताला किती कच्च्या तेलाची व नैसर्गिक वायूची आवश्यकता आहे ते आधी जाणून घेऊयात. भारतात इंधन मोठ्या प्रमाणात लागते. देशात दररोज ५५ लाखांहून अधिक कच्च्या तेलाच्या बॅरल्सची मागणी असते. तसेच औद्योगिक क्षेत्रात, खत व ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलएनजी) ची आवश्यकता असते.
भारताला दररोज १९० ते १९५ दशलक्ष मेट्रिक स्टॅण्डर्ड क्यूबिक मिटर्स (MMSCMD) नैसर्गिक वायूची आवश्यकता आहे. दरम्यान, २०३० पर्यंत भारताच्या नैसर्गिक वायू गरजेत वाढ होऊन ती ३०० दशलक्ष मेट्रिक स्टॅण्डर्ड क्यूबिक मिटर्स (MMSCMD) पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे.
पश्चिम आशियातील देश वगळून इतर देशांकडून आयात किती?
पश्चिम आशियात युद्ध सुरू असल्याने कच्चे तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत सध्या एकूण गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल, तर ५० टक्के नैसर्गिक वायूची आयात करत आहे. पश्चिम आशियातील देश वगळून इतर देशांकडून भारत सध्या ६५ ते ७० टक्के कच्चे तेल आयात करत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल वाहतुकीवर परिणाम झाल्याने भारताने कच्च्या तेलासाठी इतर मार्ग स्वीकारले आहेत. नैसर्गिक वायू देखील पश्चिम आशियातील देशांना वगळून इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात सध्या आयात केला जात आहे.
रशियाकडून होणारी आयात कच्च्या तेलाची आयात वाढली ?
२०२२ च्या आधी तेलाचे पारंपारिक निर्यातदार असलेल्या पश्चिम आशियातील इराक (२४ टक्के) आणि सौदी अरेबिया (१६ टक्के) या देशांकडून भारत कच्चे तेल आयात करत होता. तर कतार हा देश भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा करत होता. अमेरिका (१० टक्के) आणि रशिया (२ टक्के) यांच्याकडूनही भारताला तेल पुरवले जात होते. २०२० मध्ये रशियाकडून भारत एकूण गरजेच्या फक्त १.७ टक्के तेल आयात करत होता. २०२१ मध्ये रशियाकडून फक्त १ लाख बॅरल्स तेल आयात होत होती.
रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने तेलावर सुट देणे सुरू केले. त्यामुळे भारताने रशियाकडून तेल आयात वाढवली होती. तसेच नैसर्गिक वायू देखील रशियाकडून आयात केला जात होता. २०२३ व २०२४ मध्ये रशियाने कच्च्या तेलावर सुट देणे बंद केले, त्यानंतर देखील भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चे तेल आयात करत होता. सध्या भारताच्या एकूण गरजेच्या ३५ टक्के कच्चे तेल रशियाकडून आयात केले जाते. २०२१ मध्ये रशियाकडून होणारी ३ अब्ज डॉलरची आयात वाढून ती ४५ ते ५० अब्ज डॉलर प्रति वर्ष पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, पश्चिम आशियात संघर्ष सुरू होण्याआधी भारताने रशियाकडून होणारी आयात कमी केली होती.
कोणत्या देशांकडून भारत सध्या तेल आयात करत आहे?
भारत सध्या ब्राझील, नोर्वे, कॅनडा, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायू आयात करत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी अर्जेंटिनाकडून देखील आयात केली जात असल्याची माहिती दिली आहे. “भारताला कच्चे तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या देशांची संख्या २७ वरून ४१ झाली आहे. त्यात अर्जेंटिना हा देश देखील जोडला गेला आहे. सध्याची परिस्थिती खडतर आहे. पण आपण इतर देशांकडून तेल आयात करण्यासाठी तयार आहोत”, असे हरदीप सिंह पुरी म्हणाले होते. दरम्यान, लॅटिन अमेरिकेकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ब्राझील व इतर देशांकडून भारताला होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या निर्यातीत वाढ झाली आहे.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, भारताने कच्च्या तेलासाठी व्हेनेझुएलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. २०१० च्या सुमारास व्हेनेझुएलातून भारताला १० टक्के कच्चे तेल पुरवले जात होते. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारतीय रिफायनरी या सर्वात मोठ्या ग्राहक आहेत. व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्याच्या बाबतीत त्यांनी मार्च महिन्यात अमेरिकेला मागे टाकले आहे.
जागतिक पातळीवर गयाना या देशात तेलाचे उत्पादन सर्वात वेगाने वाढत आहे. गयानाने तेल उत्पादनासाठी भारतीय कंपन्यांना आवाहन केले आहे. तसेच नायजेरिया, अंगोला, सूरीनाम आणि नामिबिया हे देश देखील भारतासाठी महत्वाचे पुरवठादार आहेत. या चार देशांकडून सध्या १० ते १२ टक्के कच्चे तेल आयात केले जात आहे. या भागातील देश नैसर्गिक वायूसाठी देखील महत्वाचे आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या धोरणात्मक तेलसाठ्यांचा विस्तार कसा होत आहे, याबाबत माहिती दिली होती. सध्या भारतातील धोरणात्मक तेल साठे विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर या ठिकाणी आहेत.
