जगातील अनेक बडे देश हायपरसॉनिक स्क्रॅमजेट तंत्राच्या विकासात गुंतलेले आहेत. सध्या केवळ रशिया, चीन यांसारख्या काही मोजक्याच देशांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करून तैनात केल्याचे मानले जाते. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) पूर्ण आकाराच्या सक्रिय थंड स्क्रॅमजेट कम्बस्टरची व्यापक दीर्घ कालावधीची चाचणी घेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या माध्यमातून भारताने आपल्या हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कार्यक्रमात मोठी झेप घेतली. स्क्रॅमजेट चाचणीतील प्रगती भारताला हायपरसॉनिक शर्यतीत आघाडीवर नेणारी ठरली आहे.
चाचणीचे स्वरूप
पाच महिन्यांपूर्वी ७०० सेकंदांपेक्षा जास्त कालावधीची सक्रिय थंड स्क्रॅमजेट कम्बस्टरची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता हैदराबाद येथील अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट पाईप टेस्ट (एससीपीटी) सुविधेत १२०० सेकंदांपेक्षा जास्त कालावधीची यशस्वी चाचणी करण्यात आली. म्हणजे इंजिनने २० मिनिटांचा अखंड कार्यकाळ साध्य केला. अत्याधुनिक सुपरसॉनिक वायू संशोषक अर्थात ‘एअर ब्रिदींग इंजिन’द्वारे हे यश प्राप्त झाले, जे स्वदेशी बनावटीचे द्रवरूप हायड्रोकार्बन एंडोथर्मिक इंधन, उच्च तापमान असणारे ‘थर्मल बॅरिअर कोटींग’ आणि प्रगत उत्पादन प्रक्रियांचा वापर करते. या माध्यमातून सक्रिय थंड स्क्रॅमजेट कम्बस्टरची रचना आणि अत्याधुनिक चाचणी सुविधेच्या क्षमतांची पडताळणी करण्यात आल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.
महत्त्व काय?
या ताज्या चाचणीमुळे स्क्रॅमजेट कम्बस्टर पूर्ण प्रमाणातील, उड्डाण योग्य चाचणीसाठी सज्ज झाले आहे, जे भारताच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्क्रॅमजेट ही हायपरसॉनिक वाहनाची गुरुकिल्ली मानली जाते. हायपरसॉनिक प्रणोदनच्या केंद्रस्थानी स्क्रॅमजेट इंजिन आहे. येणारी हवा इंधनाने संकुचित व ज्वलन करून वाहनांना हायपरसॉनिक वेगाने प्रवास करण्यास सक्षम करते. स्क्रॅमजेट इंजिनचा वापर करून वाहनांना माक – पाचपेक्षा जास्त वेगाने (ध्वनीच्या पाचपट वेगाने) चालवता येते. हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अर्थात दिशा नियंत्रित क्षेपणास्त्र ही ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक (६१०० किलोमीटर प्रतितास) वेगाने दीर्घकाळ मार्गक्रमण करू शकणारी आणि वायू संशोषक इंजिनद्वारे (एअर ब्रिदींग इंजिन) संचालित असणाऱ्या शस्त्रांमधील क्षेपणास्त्र आहेत.
स्वदेशी तंत्रज्ञान
या कम्बस्टरची रचना व विकास डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल) केला. उद्योग क्षेत्रातील भागिदारांनी तो प्रत्यक्षात साकारला. स्क्रॅमजेट कम्बस्टरमध्ये प्रति सेकंद १.५ किलोमीटरपेक्षा जास्त वेगातही स्थिर ज्योत टिकवून ठेवण्यासाठी एका नाविन्यपूर्ण ज्योत स्थिरीकरण तंत्राचा वापर केला जातो. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी स्क्रॅमजेट रचना विकसित करण्यापूर्वी जमिनीवर असंख्य प्रयोग केले. प्रज्वलन व ज्योत टिकवून ठेवण्याच्या अनेक आश्वासक पद्धतींचा अभ्यास केला. या प्रणालीसाठी स्वदेशी एंडोथर्मिक स्क्रॅमजेट इंधन विकसित करण्यात आले. पेटवण्यास तुलनेने सोपे असणारे हे इंधन शीतलीकरणात सुधारणा करते. या यशस्वी चाचणीद्वारे भारताने प्रगत एरोस्पेस क्षमता आणि नव्याने उदयास येणारे तंत्रज्ञान असणाऱ्या राष्ट्रांच्या पंक्तीत स्थान मिळवले. ही कामगिरी देशाच्या हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा एक भक्कम पाया आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला.
धोरणात्मक लाभ
हायपरसॉनिक तंत्रज्ञान जगात कुठेही अल्पावधीत हल्ला चढविणे, उपग्रहविरोधी मोहीम साध्य करण्याची क्षमता देऊ शकते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राला उच्च वेग, कमी उंचीवरील उड्डाण व चपळाईमुळे सध्याच्या हवाई संरक्षण प्रणालींना शोधणे अत्यंत कठीण असते. याचे धोरणात्मक लाभ घेण्यासाठी अनेक राष्ट्रांकडून प्रयत्न होत आहे. कारण, माक – पाचपेक्षा जास्त वेगाने प्रवास करण्यास सक्षम सुपरसॉनिक वाहने विलक्षण क्षमता देतात. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ५४०० किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त वेगाने वेगाने प्रवास करतात. या प्रगत क्षेपणास्त्रांसमोर हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ ठरतात. हे तंत्रज्ञान कमीत कमी वेळेत दूरच्या लक्ष्यांवर अचूक, मार्गदर्शित युद्धसामग्री तैनात करण्यास सक्षम करते. अल्पावधीत अवकाशात पेलोड्स प्रक्षेपित करण्याची क्षमता लष्करी उपग्रह तैनाती, शोध व संप्रेषणासाठी कामी येऊ शकते. स्क्रॅमजेट प्रणोदनाने सुसज्ज हायपरसॉनिक वाहने उपग्रहविरोधी मोहिमांसाठी वापरता येऊ शकतात.
जागतिक स्पर्धा
वेगवान जागतिक हल्ल्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी जगातील अनेक बडे देश हायपरसॉनिक स्क्रॅमजेट तंत्राच्या विकासात गुंतलेले आहेत. सध्या केवळ रशिया, चीन यांसारख्या काही मोजक्याच देशांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करून तैनात केल्याचे मानले जाते. या माध्यमातून जलदगतीने दूरवर हल्ला, आवश्यकतेनुसार प्रक्षेपण व उपग्रहविरोधी मोहीम साध्य करण्याची क्षमता मिळते. या तंत्रज्ञानाने आधुनिक युद्धाला वेगळा आयाम मिळणार आहे. आपली लढाऊ शक्ती वाढविण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी स्वदेशी हायपरसॉनिक शस्त्रांचा विकास हा संरक्षण उद्योगासोबतच लढाऊ क्षमतांच्या सज्जतेला चालना देणारा ठरणार आहे.
