DRDO ULPGM-V3 Missile successful test enhances India’s drone warfare and precision strike capabilities: आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असताना भारताने संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ‘ULPGM-V3’ या ड्रोनवरून डागल्या जाणाऱ्या प्रिसिजन गाइडेड मिसाईलची अंतिम चाचणी यशस्वी केली असून, यामुळे भारतीय लष्कराची मानवरहित युद्धक्षमता आता अनेक पटींनी वाढली आहे.

मानवरहीत शस्त्रास्त्र यंत्रणा

आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. रणांगणावर आता केवळ रणगाडे, फायटर जेट्स किंवा तोफखानाच निर्णायक राहिलेला नाही; तर त्यासोबतच ड्रोन, मानवरहित हवाई यंत्रणा (UAV), नेटवर्क- आधारित लक्ष्यभेद करणारी शस्त्रास्त्रे यांना विद्यमान परिस्थितीत अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यानही त्याचा प्रत्यय आला आणि सध्या एकिकडे सुरू असलेल्या युक्रेन- रशिया आणि दुसरीकडे इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धांमध्येही ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भारताने आता या मानवरहित शस्त्रास्त्र यंत्रणांच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी घेतली आहे.

हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) यूएव्ही-लाँच्ड प्रिसिजन गाइडेड मिसाईल – व्हर्जन ३ (ULPGM-V3) या ड्रोनवरून अचूक डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या अंतिम चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. या चाचण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर आणि त्याचप्रमाणे हवेतून हवेतही अशा दोन्ही प्रकारच्या लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते.

DRDO ULPGM-V3 missile drone test success | India drone warfare technology update | DRDO ने तयार केलेले स्वदेशी ड्रोन क्षेपणास्त्र चाचणी | भारतीय सैन्य ड्रोन युद्धतंत्र तंत्रज्ञान
DRDO चे नवे ULPGM-V3 क्षेपणास्त्र: भारताच्या ड्रोन शक्तीचा नवा अवतार (Image- Indian Express )

कर्नूलमध्ये पार पडल्या अंतिम चाचण्या

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूलजवळील डीआरडीओच्या चाचणी क्षेत्रात या अंतिम विकास चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये पूर्णपणे एकात्मिक ग्राउंड कंट्रोल सिस्टम (GCS) वापरण्यात आली. ही प्रणाली क्षेपणास्त्राच्या तयारीपासून प्रक्षेपणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करते. लक्ष्य निवडणे, प्रहार करण्यासाठीचा कोन (अँगल) ठरवणे, कमांड पाठवणे आणि प्रत्यक्ष प्रक्षेपण यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या यशानंतर ULPGM-V3 आता केवळ प्रयोगशाळेतील संकल्पना न राहता प्रत्यक्ष युद्धसज्ज प्रणाली म्हणून मान्यता मिळण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

ULPGM-V3 म्हणजे नेमके काय?

ULPGM म्हणजे Unmanned Aerial Vehicle Launched Precision Guided Missile — म्हणजेच मानवरहित हवाई वाहनावरून अचूक डागले जाणारे क्षेपणास्त्र. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शस्त्र ड्रोनला केवळ माहिती गोळा करणारे साधन न ठेवता त्याला थेट आक्रमकता प्रदान करते.

महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये

  • Air-to-Ground मोड – जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी. यात रणगाडे, बंकर, संरक्षणात्मक ठिकाणे किंवा लष्करी तळ यांचा समावेश असू शकतो.
  • Air-to-Air मोड – शत्रूची ड्रोन, हेलिकॉप्टर किंवा कमी उंचीवरून उडणारी हवाई यंत्रणा यूएव्ही आदींना लक्ष्य करण्यासाठी.

यामुळे एकाच ड्रोन प्लॅटफॉर्मवरून विविध प्रकारच्या मोहिमा पार पाडणे शक्य होणार आहे.

पूर्णपणे स्वदेशी बनावटीची यंत्रणा

  • या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा संपूर्ण विकास भारतातच पार पडला आहे.
  • क्षेपणास्त्राच्या विकासात डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळांनी एकत्रित काम केले आहे.

मुख्य जबाबदारी Research Centre Imarat या प्रयोगशाळेकडे होती. त्यासोबत Defence Research and Development Laboratory डीआरडीएल, Terminal Ballistics Research Laboratory टीबीआरएल आणि High Energy Materials Research Laboratory एचइएमआरएल यांनीही त्यात सहभाग घेतला. उत्पादनासाठी डीआरडीओने दोन भागीदार निवडले आहेत त्यात Bharat Dynamics Limited आणि Adani Defence & Aerospace यांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्राचे एकात्मिकरण (integration) NewSpace Research and Technologies या बेंगळुरूस्थित कंपनीने विकसित केलेल्या ड्रोनवर करण्यात आले.

युद्धाचे बदलते स्वरूप आणि ड्रोनचे वाढते महत्त्व

पूर्व युरोपपासून पश्चिम आशियापर्यंत अनेक युद्धांमध्ये कमी खर्चातील ड्रोनने मोठ्या आणि महागड्या लष्करी साधनांनाही आव्हान दिले आहे. टेहळणी, लक्ष्य ओळखणे, माहिती संकलन करणे आणि अचूक प्रहार अशा सर्व क्षेत्रांत ड्रोन आता अग्रभागी आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर…

विशेषतः ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात मानवरहित यंत्रणांचा वापर केला होता. या परिस्थितीत केवळ ड्रोन तयार करणे पुरेसे नसून अचूक आणि प्रभावी शस्त्रास्त्रांसह ड्रोन सज्ज करणेही तेवढेच आवश्यक ठरले आहे. ULPGM-V3 ही प्रणाली म्हणजे त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

सैन्याला याचा फायदा काय?

या ड्रोन क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे भारतीय सैन्याला काही महत्त्वाचे धोरणात्मक फायदे मिळू शकतात:

१. स्टँड-ऑफ स्ट्राइ
सैनिकांना प्रत्यक्ष धोकादायक क्षेत्रात न जाता दूरवरून लक्ष्यांवर प्रहार करता येईल, त्यामुळे दुरवरून अचूक मारा करण्याची क्षमता वाढेल.

२. मानवी जीवितहानी टळू शकेल
मानवरहित प्लॅटफॉर्म वापरल्यामुळे वैमानिक किंवा सैनिकांची होणारी जीवितहानी टळेल.

३. कमी खर्चात अचूक हल्ले शक्य होतील
मोठ्या लढाऊ विमानांपेक्षा ड्रोन आणि त्यावरून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर तुलनेने कमी खर्चिक असतो.

४. प्रतिड्रोन युद्धक्षमता निर्माण होईल
शत्रूचे ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता भविष्यातील युद्धांमध्ये निर्णायक ठरू शकते.

राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, सार्वजनिक क्षेत्रातील सहभागी उद्योगांचे अभिनंदन केले. या क्षेपणास्त्राने रणगाड्यांविरोधातील Air-to-Ground आणि ड्रोन, हेलिकॉप्टर तसेच इतर हवाई लक्ष्यांविरोधातील Air-to-Air अचूक हल्ला नेमकेपणाने यशस्वीरित्या पार पाडल्याचे त्यांना सांगितले.

डीआरडीओ आणखी कोणत्या संरक्षण तंत्रज्ञानावर काम करत आहे?

बदलत्या युद्धस्वरूपाचा विचार करून डीआरडीओ प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यामध्ये हायपरसॉनिक शस्त्रास्त्र तंत्रज्ञान हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रकल्प आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट किंवा त्याहून अधिक वेगाने प्रवास करणारी अत्यंत वेगवान मारा करणारी भविष्यातील महत्त्वाची शस्त्रास्त्रप्रणाली असेल.

लॉयटरिंग म्युनिशन

त्याचबरोबर लॉयटरिंग म्युनिशन (Loitering Munition) किंवा ‘कॅमिकाझे ड्रोन’ विकसित करण्याचे कामही डीआरडीओमध्ये सुरू आहे. ही प्रणाली लक्ष्याच्या परिसरात काही काळ घिरट्या घालत राहते आणि योग्य क्षणी स्वतःलाच लक्ष्यावर आदळवून घेत प्रहार करते. भारतीय हवाई संरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी दीर्घ पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित निरीक्षण व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित युद्धनियंत्रण प्रणाली यांवरही DRDO मध्ये संशोधन सुरू आहे.

लेझरशस्त्र प्रणाली

डीआरडीओ सध्या डिरेक्टेड एनर्जी वेपन्स, DEW अर्थात उच्च क्षमतेची लेझरशस्त्र प्रणाली विकसित करण्याच्या दिशेनेही काम करत आहे. भविष्यात या प्रणाली ड्रोन, क्षेपणास्त्रे किंवा कमी उंचीवरील लक्ष्य अतिशय कमी खर्चात निष्प्रभ करू शकतात. जमिनीवरील मानवरहित वाहने (UGV), स्वदेशी इंजिन तंत्रज्ञान, क्वांटम कम्युनिकेशन, नेटवर्क- आधारित युद्धप्रणाली आणि सागरी मानवरहित प्रणाली याही क्षेत्रात संशोधनाचे काम डीआरडीओतर्फे सुरू आहे. या साऱ्यातून असे लक्षात येते की, भारताचा भर आता केवळ पारंपरिक शस्त्रसाठ्यावर नसून भविष्यातील तंत्रज्ञानाधारित युद्धासाठी स्वतंत्र आणि स्वदेशी संरक्षण व्यवस्थाच निर्माण करण्यावर आहे.