पश्चिम आशिया युद्धस्थितीमुळे पारंपरिक इंधन टंचाई निर्माण झाली. भारतीय ईव्ही क्षेत्रासाठी ही ईष्टापत्ती ठरलीय, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शिवाय, ती खरीही आहे, असा ठाम निष्कर्ष काढणारी आकडेवारीही नुकतीच काही संघटनांनी प्रसिद्ध केली. इंधन तुटवडा हा अडसर ठरू नये, यासाठी ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे धाव घेतली आहे. यात सर्वाधिक दुचाकींची खरेदी झाली आहे. तर कारच्या खपात मार्चमध्ये ८४ टक्क्यांची वाढ झाली.

इलेक्ट्रिक वाहनांची विक्रमी विक्री का?

जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी धोरणात्मक पाठिंबा मिळत नसल्याने ईव्ही खप उतरणीला लागला आहे. मात्र त्याच वेळी भारतीय बाजारपेठेत ईव्हीच्या विक्रीत मोठी वाढ नोंदली गेली. पश्चिम आशियातील भूराजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ऊर्जेचा नवा पर्याय भारतीय बाजारपेठेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. संघर्षमय स्थिती आणखी किती काळ सुरू राहील, याबद्दल ग्राहकांमध्ये साशंकता आहे. भविष्यात पारंपरिक इंधनाचे दर वाढीस पर्याय म्हणून ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय हा सध्या स्वस्त आणि स्थिर पर्याय मानला जात आहे. त्यात अनेकविध मॉडेलची उपलब्धता आणि स्वच्छ इंधन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जात आहे.

जागतिक खप घसरणीला का?

आंतरराष्ट्रीय पातळीवर खासकरून अमेरिका आणि चीनमध्ये ईव्ही धोरणात बदल करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचे दोन मुद्दे म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, म्हणजेच चार्जिंग केंद्रे व बॅटरीचे आयुर्मान. या दोन्ही गोष्टींवर सध्या अनेक देशांमध्ये ठोस धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शिवाय, एका चार्जमध्ये आवश्यक दीर्घ टप्प्यांपर्यंत प्रवास करता येईल, असे तंत्रज्ञान ग्राहकांसमोर  ठेवता आलेले नाही, असे ‘ईवाय’ या संस्थेमार्फत २०२४मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील अहवालात नोंदवण्यात आले आहे.

या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे, की पाश्चिमात्य देशांमधील चोखंदळ ग्राहकांनी अद्याप तरी पारंपरिक पर्याय सोडून दिलेला नाही. म्हणजे डिझेल व पेट्रोलवर धावणाऱ्या गाड्यांमध्येही असलेली प्रीमियम अर्थात सर्वसुखदायी सुविधा जोवर ईव्हीमध्ये स्थापित केली जात नाही, तोवर ती तोडीस तोड ठरणार नाही, अशी या मुख्य धारेतील ग्राहकांची धारणा आहे. याचा अर्थ नवश्रीमंतांनी ईव्ही गाड्या खरेदी केल्याने या क्षेत्राची वृद्धी होईल, असे नाही, तर बाजाराला वळण देऊ शकेल, असा ग्राहक त्यासाठी पुढे आला पाहिजे, असा एक निष्कर्ष यातून काढला जात आहे.

चीनचे ईव्ही धोरण निर्णायक?

पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा सामना करण्यासाठी जगभरातील अनेक देशांना अन्य पर्याय शोधावे लागले. त्याच वेळी चीनने स्वीकारलेल्या ईव्ही धोरणामुळे इंधन तुटवड्याचा परिणाम जाणवला नाही. २७ फेब्रुवारी ते २७ मार्च या महिनाभराच्या काळात पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ‘ओपेक’च्या किमतीत ६७ टक्क्यांनी वाढ झाली. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्या गेल्या. भारत व चीन हे दोन खनिज तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करतात. त्यात भारताची कच्च्या तेलाची आयात जवळपास ८८ टक्के इतकी प्रचंड आहे. त्यामुळे ग्राहक पूर्ण इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहन खरेदीकडे वळला.

भारतीय कंपन्या ईव्ही खपात आघाडीवर…

शून्य कर्ब उत्सर्जनाचा मजबूत आधार म्हणून विजेवर धावणाऱ्या वाहनांची खरेदी सध्या चढत्या भाजणीला आहे. ईव्ही क्षेत्राने पहिल्यांदाच २० लाख युनिटचा टप्पा पार केला. यात दुचाकी व तीन चाकींच्या खपाचा आकडा अधिक आहे. त्या जोडीला चारचाकी वाहनांचीही संख्या लक्षणीय आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने किरकोळ वाहन विक्रीचे आकडे नुकतेच जाहीर केले. त्यात २०२६ या चालू आर्थिक वर्षात एकूण ईव्हीच्या २४.५ लाख युनिटची विक्री झाली. गेल्या आर्थिक वर्षात १९.६ लाख ईव्ही युनिटची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.  ईव्ही खपात दुचाकींचा वाटा अधिक आहे. यात टीव्हीएस, बजाज ऑटो व अथेर कंपन्यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात १४ लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. २०२५मध्ये ११.५ लाख इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तीनचाकींच्या यंदाचा खप ८.३ लाख इतका असून गेल्या वर्षी तो ७ लाख इतका होता.

भारतीय बाजारपेठ हुकमी एक्का? 

ईव्ही कारच्या संदर्भात बोलायचेच तर कारच्या खपात मार्चमध्ये ८४ टक्क्यांची वाढ झाली. ईव्ही कारच्या किमतीत कपात करण्यात आल्याने खपात वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात ईव्ही वाहन खपाचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. २०२५मध्ये १.१ लाख युनिटची विक्री झाली. ईव्ही वाहनांसाठी २०२६ वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत चालू आर्थिक वर्षात १९,४५४ युनिट विक्री झाली. २०२५मध्ये ८,८२० युनिटची विक्री झाली. दुचाकी, तीनचाकी, प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची मिळून २४. ५२ लाख युनिट विक्री झाली. प्रत्येक वाहनाच्या विक्रीतील वाढ ही २५ टक्के आहे. ती भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय बाजारपेठेतील वाहनविक्रीचा चढता आलेख हा ईव्ही दुचाकी व चारचाकीमधील खपामुळे कायम राहिला आहे, असे ‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी स्पष्ट केले.

टाटा, महिंद्रा ईव्ही आघाडीवर

पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या कर्ब उत्सर्जनावरील मर्यादांमुळे ईव्ही खपात वाढ झाल्याचे हे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टाटा मोटर्स ईव्ही कार खपात आघाडीवर आहे. चालू आर्थिक वर्षात टाटा मोटर्सच्या ७८.८११ युनिटची (३६ टक्के वाढ) विक्री झाली. गेल्या वर्षी टाटाच्या ईव्ही कारच्या ५७,९९४ युनिटची विक्री झाली होती. त्याखालोखाल जेएसडब्ल्यू एमजी मोटारचा वाटा आहे. एमजीच्या ५३,०८९ युनिटची विक्री झाली (७४ टक्क्यांची वाढ) यात महिंद्रा अँड महिंद्राच्या खपात लक्षणीय वाढ झाली. यंदा महिंद्राच्या खपात ४०० टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षात ४२ युनिट खप झाला. २०२५मध्ये महिंद्राचे ८,४२६ युनिटची विक्री झाली होती. वाहनांच्या एकूण खपातील ईव्ही वाहनांच्या खपाचा वाटा हा एक पंचमांश इतका आहे. यात टाटा मोटर्स व महिंद्रा अँड महिंद्रा या भारतीय कंपन्यांच्या ईव्ही खपाचा वाटा सर्वाधिक आहे. भारतात खपात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाई कंपनीला या दोन्ही भारतीय कंपन्यांनी मागे टाकले आहे.