आयात कच्च्या तेलावरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पर्यायी इंधन वापरावर भर दिला आहे. इथेनॉल २० हा त्यातील एक. खरेतर इथेनॉल २० हे इंधन २०२७ च्या आरंभी वापरात आणले जाणार होते. परंतु, ते वर्षभर आधीच अमलात गेले आहे. अर्थात, ते या घडीला किफायतशीर आहे का, हा मोठा प्रश्न आहे.
इथेनॉल २०मुळे वाहनचालकांना नेमका तोटा काय?
इथेनॉल २० अर्थात, ८० टक्के पेट्रोल व २० टक्के इथेनॉलच्या मिश्रणातून तयार झालेले इंधन वापरल्यास तेलाची आयात कमी करता येईल. त्याच वेळी इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्यक ऊस व मक्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. मात्र, अलिकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात काही ग्राहकांना इथेनॉल २० च्या वापरात काही प्रमाणात खर्चाची बाजू वाढलेली असेल, जी प्रथमदर्शनी दिसून येत नाही.
देशात घेण्यात आलेल्या ‘लोकलसर्कल’च्या एका सर्वेक्षणात २४,००० वाहनचालकांना इंधन क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यातील २५ टक्के चालकांनी मायलेज २० टक्क्यांनी घसरल्याचे सांगितले. तर सात टक्के चालकांनी १५ ते २० टक्क्क्यांनी मायलेज कमी झाल्याचे स्पष्ट केले. तर १३ टक्के जण १० ते १५ टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हणाले. इथेनॉलमिश्रित इंधनामुळे वाहनांचे कोसमान एक ते सहा टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली होती. प्रत्यक्षात ते त्याहून अधिक घसरत असल्याने या सर्वेक्षणातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरले आहेत. याचा अर्थ ग्राहकांना इंधनासाठी येणाऱ्या महिनाभराच्या खर्चात वाढ करावी लागणार आहे. त्यातही गेल्या काही दिवसांत पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
इथेनॉल २०मुळे मायलेजवर परिणाम?
इथेनॉल २० इंधन वाहनांमध्ये भरण्यास सुरू केल्यानंतर गाड्यांचे कोसमान (मायलेज) कमी झाल्याचे दिसून आले, असे अनेक चालकांचे म्हणणे आहे. एका सर्वेक्षणातून ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली. यातील बहुतेक चालक आधी शुद्ध पेट्रोलवरच गाड्या चालवत होते. इथेनॉलमिश्रित इंधनाचा अधिक वापर सुरू करण्यात आल्याने इंधन खर्च, दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याचे हाती आलेल्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले आहे.
जुने इंजिन इथेनॉल २० कसे सहन करेल?
केंद्र सरकारने इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनांमध्ये भरण्यासाठी आक्रमक पावले उचलल्याने शुद्ध पेट्रोलवर वाहने चालवणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. २०२५मध्ये इथेनॉल २० पेट्रोल सक्तीचे करण्यात आल्याने २०२२ वा त्याआधी वाहन खरेदी केलेल्या दहापैकी पाच चालकांनी मायलेजबाबत चिंता व्यक्त केली. २०२३ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांमध्ये इथेनॉल २० इंधन किफायतशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे. यामागील महत्त्वाचे कारण असे की, या वाहनांमधील इंजिन हे इथेनॉल ५ वा इथेनॉल १० साठी विकसित करण्यात आले आहे. इथेनॉल २० साठी इंजिन पूरक नसल्याचे दिसून आले आहे. म्हणजे कमी इथेनॉल वापराला अशा गाड्या अधिक चांगला प्रतिसाद देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घनता कमी असल्याने अधिक खर्च?
इथेनॉलची ज्वलन प्रक्रिया पारंपरिक इंधन अर्थात पेट्रोलपेक्षा वेगळी आहे. इथेनॉलची घनता ही पारंपरिक इंधनाहून अधिक असते. याचा अर्थ कमी घनता असलेले इंधन इंजिनासाठी अधिक जाळावे लागते. म्हणजे ज्या प्रमाणात पेट्रोल जाळून वाहन जे अंतर पार करेल, तेच अंतर पार करण्यासाठी इथेनॉल मिश्रित इंधनाचा अधिक वापर करावा लागेल. शुद्ध पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांच्या इंजिनातील रबर व प्लास्टिकचे सुटे भाग (कॉम्पोनन्ट्स) हे इथेनॉलच्या अधिक वापरासाठी अनुकूल नसतात. इथेनॉलमिश्रित इंधनामुळे इंजिनमधील आर्द्रता झपाट्याने कमी होत जाते आणि त्यामुळे काही सुट्या भागांवर त्याचा परिणाम होतो, असे वाहन निर्मिती क्षेत्रेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंजिन क्षमतेवर नेमका परिणाम काय?
इथेनॉलमिश्रित इंधनामुळे केवळ मायलेज कमी होत असल्याचे स्पष्ट झाले नसून सुमारे २९ टक्के ग्राहकांनी काही सुटे भाग नव्याने बसवावे लागल्याचे तसेच काही सुटे भाग खराब झाल्याचे सांगितले. यात इंधन, कार्बोरेटर आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे त्यांना दिसून आले. इंजिनातील बदल हे ग्राहकांनी घेतलेल्या अनुभवावर आधारित आहेत. त्यासाठी शास्त्रीय यांत्रिकी अभ्यास करण्यात आला नाही, हे जरी मान्य केले तरी २०२३ आधीच्या वाहने इथेनॉल २० ला कशी सिद्ध करता येण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत अधिक चर्चा झडू शकते.
इंधनातील इथेनॉल वाढ का?
गेल्या काही वर्षांतील केंद्र सरकारच्या ऊर्जा संक्रमण प्रकल्पातील इथेनॉल मिश्रित इंधन हा उपक्रम महत्त्वाकांक्षीच म्हणावा लागेल. देशातील कच्चा तेलाची मागणी ही आजघडीला ८७ टक्क्यांच्या आसपास आहे. हा तेल पुरवठा देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे कोणतेही भूराजकीय अस्थैर्य वा कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही अर्थव्यवस्थेवर ताण आणणारी ठरते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यास इंधनाचा कमी वापर होऊन कच्चा तेलाची आयात कमी होऊन देशात उपलब्ध साधनांद्वारे खर्च कमी करता येईल. शिवाय, इथेनॉलसाठीचा कच्चा माल माल म्हणून ऊस आणि मक्याचे उत्पादन वाढवता येईल आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतील, असे दुहेरी उद्दिष्ट आहे.
इथेनॉल वाढीसाठी सरकारचे धोरण काय?
खरे तर इथेनॉल २० हे इंधन २०२७ च्या आरंभी वापरात आणले जाणार होते. परंतु, ते वर्षभर आधीच अमलात गेले आहे. अर्थात सरकारने इथेनॉल २०साठी पूरक गाड्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य वाहन निर्मिती कंपन्यांना घालून दिले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सरकार कंपन्यांना मदत करण्यास तयार आहे. भविष्यात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवले जाईल. इथेनॉल २० नंतर सरकार काही श्रेणींतील वाहनांसाठी इथेनॉल २२, इथेनॉल २५, इथेनॉल ३० आणि शेवटी इथेनॉल ८५ इंधन लागू करेल.
