भारत आणि युरोपीय समुदायाने मुक्त व्यापार करार केला आहे. याला महाकरार असे नाव देण्यात आले असून, यामुळे भारतीय उत्पादनांसाठी युरोपीय बाजारपेठ खुली होणार आहे. भारताच्या निर्यातीत मोठी वाढ करणारा हा करार ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेजारी देश असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशने या कराराची धास्ती घेतली आहे. या दोन्ही शेजारी देशांतील वस्त्रोद्योगासाठी युरोप ही मोठी बाजारपेठ आहे. या करारामुळे या देशांच्या हातातून युरोपीय बाजारपेठ निसटण्याची भीती व्यक्त होत आहे.

सद्य:स्थिती काय?

पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांसाठी अनेक दशकांपासून युरोपीय बाजारपेठ महत्त्वाची आहे. या बाजारपेठेत त्यांना सर्वसाधारण प्राधान्यक्रम योजना लागू आहे. या योजनेतून दोन्ही देश आयात शुल्क मुक्त निर्यात युरोपला करीत आहेत. त्यात प्रामुख्याने वस्त्रोद्योगाचा समावेश आहे. या दोन्ही देशांना शस्त्रास्त्रे वगळता इतर सर्व उत्पादनांची निर्यात युरोपला सहजपणे करता येते. पाकिस्तानसाठी युरोप ही आशियाबाहेरील दुसरी मोठी निर्यात बाजारपेठ आहे. याच वेळी बांगलादेशसाठी युरोप ही सर्वांत मोठी निर्यात बाजारपेठ आहे. दोन्ही देशांच्या परकीय उत्पन्नात त्यामुळे युरोपचा वाटा मोठा आहे.

स्पर्धा वाढणार?

भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतीय उत्पादनांना युरोपीय बाजारपेठ खुली होणार असून, ९३ टक्के उत्पादनांना आयात शुल्क मुक्त प्रवेश मिळेल. यामुळे भारतीय उत्पादने युरोपीय बाजारपेठेत स्वस्तात उपलब्ध होतील. भारताच्या युरोपीय बाजारपेठेतील प्रवेशामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी तीव्र स्पर्धा निर्माण होईल. आधीपासून या शेजारी देशांनी स्थान निर्माण केलेल्या बाजारपेठेत आगामी काळात त्यांना भारताशी सामना करावा लागेल.

पाकिस्तानचे संबंध कसे?

युरोपीय समुदाय आणि पाकिस्तान यांच्यात २००४ मध्ये सहकार्य करार झाला. द्विपक्षीय व्यापारावर यात भर देण्यात आला. त्यानंतर युरोपीय समुदाय – पाकिस्तानने २०१२ मध्ये पंचवार्षिक भागीदारी योजना स्वीकारली. त्यात गुंतवणुकीवर भर देण्यात आला. पाकिस्तानला युरोपीय समुदायाकडून २०१४ पासून सर्वसाधारण प्राधान्यक्रम प्लसचा दर्जा देण्यात आला आहे. त्या बदल्यात पाकिस्तानने २७ आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यात मानवी व कामगार हक्क, पर्यावरण संरक्षण, चांगले प्रशासन यांसह इतर मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तानातून युरोपीय समुदायाला होणाऱ्या ८५ टक्के निर्यातीला मुक्तद्वार मिळाले.

व्यापार किती?

पाकिस्तानसाठी युरोपीय समुदाय हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. पाकिस्तानच्या २०२४ मधील एकूण व्यापारापैकी १२.४ टक्के व्यापार युरोपीय समुदायाशी झाला. युरोपीय समुदाय आणि पाकिस्तान यांच्यात २०२४ मध्ये १२ अब्ज डॉलरचा वस्तू व्यापार झाला. त्यात पाकिस्तानकडून प्रामुख्याने वस्त्रोद्योगाची निर्यात झाली. युरोपमधून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये रसायने, यंत्रे, उपकरणे आणि मूळ धातूंचा समावेश आहे. बांगलादेशलाही युरोपीय समुदायाकडून प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. याचा फायदा २०२३ मध्ये बांगलादेशच्या १७.१ अब्ज डॉलरच्या निर्यातीला झाला. बांगलादेश आणि युरोपीय समुदायातील एकूण व्यापार २०२४ मध्ये २२.२ अब्ज डॉलर झाला. बांगलादेशकडून प्रामुख्याने वस्त्रोद्योग निर्यात असून, युरोपीय समुदायाकडून यंत्रे, उपकरणे आणि रासायनिक उत्पादनांची निर्यात केली जाते.

करारामुळे काय घडणार?

पाकिस्तान आणि बांगलादेशच्या तुलनेत युरोपीय बाजारपेठेत भारताला प्राधान्यक्रम मिळत नव्हता. आता युरोपीय समुदायाकडून भारताला प्राधान्यक्रम देशाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे भारतीय उत्पादनांवर अवास्तव आयात शुल्क आकारले जाणार नाही. भारताला युरोपीय बाजारपेठेत प्राधान्यक्रम नसतानाही द्विपक्षीय व्यापारात गेल्या दशकभरात ९० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. युरोपीय समुदाय हा भारताचा सर्वांत मोठा व्यापार भागीदार आहे. भारत आणि युरोपीय समुदायात २०२४ मध्ये १२० अब्ज डॉलरचा वस्तू व्यापार झाला. भारताच्या एकूण व्यापारात याचे प्रमाण ११.५ टक्के होते. या कराराचा फायदा भारतातील वस्त्रोद्योग, वस्त्रप्रावरणे, पादत्राणे, दागिने आणि चर्मोद्योग या क्षेत्रांना होणार आहे. युरोपीय समुदायाच्या २५० अब्ज डॉलरच्या वस्त्रप्रावरणे बाजारपेठेत भारताचा वाटा केवळ ३ टक्के आहे. त्यात चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम आघाडीवर आहेत. आता करारानंतर भारताच्या वस्त्रोद्योग व वस्त्रप्रावरणे निर्यातीत २० ते २५ टक्के वाढीचा अंदाज आहे. त्यातून या क्षेत्राची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे.

sanjay.jadhav@expressindia.com