R-37M missile India भारत रशियाकडून जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्र घेण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारत जागतिक शस्त्रागारांमधील सर्वात शक्तिशाली एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या रशियन R-37M ची खरेदी करणार आहे. या क्षेपणास्त्राला जगातील सर्वात घातक हवाई क्षेपणास्त्र आहे.

‘न्यूज २४’च्या वृत्तानुसार, या करारामुळे भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) क्षमतांमध्ये, विशेषतः त्यांच्या Su-30MKI विमानांच्या ताफ्यात मोठी वाढ होणार आहे. ७,४०० किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने झेपावणारे R-37M वेगाच्या बाबतीत सुप्रसिद्ध ब्राह्मोस क्षेपणास्त्रालाही मागे टाकते. अत्यंत कमी वेळात हे क्षेपणास्त्र आपल्या शत्रुला टार्गेट करु शकते. त्यामुळे हे क्षेपणास्त्र भारतासाठी गेमचेंजर ठरणार आहे. R37 M ची वैशिष्ट्ये काय? त्याचे भारतासाठी महत्त्व काय? जाणून घेऊयात…

R-37M ची वैशिष्ट्ये काय?

R-37M ची सर्वात लक्षणीय क्षमता म्हणजे त्याचा ३०० किलोमीटरपेक्षा अधिक असलेला अभूतपूर्व पल्ला. यामुळे भारतीय वायुसेनेला संभाव्य संघर्षात दूरवरील लक्ष्यांवर हल्ला करून निष्क्रिय करण्याची क्षमता मिळते. हे क्षेपणास्त्र AWACS विमाने, हवाई इंधन भरणारे टँकर, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, शत्रूची लढाऊ विमाने आणि कमी उंचीवर उडणारी क्रूझ क्षेपणास्त्रे अशा विविध प्रकारच्या हवाई मालमत्तांना लक्ष्य करते. त्याची रचना शेकडो किलोमीटरचे अंतर काही सेकंदात पार करून, लक्ष्य गाठण्यासाठी केली गेली आहे. ही बहुमुखी क्षमता आधुनिक हवाई युद्धात गेमचेंजर ठरते.

भारताच्या Su-30MKI साठी या क्षेपणास्त्राचे महत्त्व

रशिया आधीच त्याच्या Su-30SM आणि Su-35 लढाऊ विमानांवर R-37M चा वापर करत आहे. त्यामुळे भारताच्या Su-30MKI मध्ये या क्षेपणास्त्राचा वापर करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासाठी N011M बार्स रडार आणि मिशन कॉम्प्युटरमध्ये फक्त किरकोळ सुधारणांची आवश्यकता आहे, ज्यामुळे विमानाची सेवा खंडीत होण्याचा कालावधी आणि खर्च कमी होईल.

R-37M ची ब्राह्मोसशी तुलना

भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असलेल्या ब्राह्मोसशी तुलना केल्यास R-37M चे विशिष्ट क्षेत्रातील वर्चस्व दिसून येते. ब्राह्मोस जमिनीवरील आणि सागरी लक्ष्यांविरुद्ध जमिनीवरून-जमिनीवर किंवा हवेतून-जमिनीवर मारा करण्यात उत्कृष्ट आहे. मात्र, असे असले तरी ते विमानांवर हल्ला करू शकत नाही. R-37M ही उणीव भरून काढते, ते ब्राह्मोसपेक्षा वेगवान असून हवाई धोक्यांवर हल्ले करण्यास सक्षम आहे. R-37M AWACS सारख्या शत्रूच्या पाळत ठेवणाऱ्या मालमत्तांना दूरवरून नष्ट करू शकते. R-37M हे टँकर निष्क्रिय करते, ज्यामुळे लढाऊ विमानांना इंधनाची तफावत भासू शकते.

रशिया आणि भारतातील हा खरेदी करार झाल्यास भारताच्या शस्त्रागारातील तातडीची पोकळी भरून निघू शकते. स्वदेशी अस्त्र एमके-३ क्षेपणास्त्र हे SFDR तंत्रज्ञानाने (Solid-Fuel Ducted Ramjet) सज्ज आहे. ते ३०० किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला गाठू शकते, परंतु त्याचे उत्पादन २०३०-२०३२ पर्यंत लांबले आहे. तोपर्यंत, R-37M याची पोकळी भरून काढू शकते.

या क्षेपणास्त्राची तैनाती कशी होणार?

योजनेनुसार, प्रत्येक Su-30MKI विमानावर दोन R-37M क्षेपणास्त्रे जोडली जातील, त्याबरोबर पंखांवर अस्त्र एमके-१, एमके-२ आणि आर-७७-१ सारखे लहान पल्ल्याचे पर्याय असतील. ही शस्त्रास्त्रे ‘लेयर डिफेन्स’ प्रदान करते. या अपग्रेडमुळे Su-30MKI चे आशियातील प्रमुख हवाई-लढाऊ प्लॅटफॉर्म म्हणून स्थान उंचावेल अशी अपेक्षा आहे. शेजारील राष्ट्रांबरोबर, विशेषतः उत्तर सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अशा सुधारणा महत्त्वाच्या मानला जात आहेत. हा करार अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कराराचे भू-राजकीय परिणाम आणि आव्हाने

या करारामुळे सुधारित एव्हिऑनिक्स, इंजिन आणि शस्त्रे R-37M सह एकत्रितपणे कार्य करतील. त्यामुळे हवाई वर्चस्वापासून अचूक हल्ल्यांपर्यंत भारतीय हवाई दलाची परिणामकारकता वाढेल. भू-राजकीय दृष्ट्या पाहिल्यास हा करार इंडो-रशियन संरक्षण भागीदारीला बळकटी देते. हे चीनच्या J-20 स्टील्थ फायटर्स आणि PL-15 क्षेपणास्त्रांसारख्या प्रादेशिक प्रतिस्पर्धकांना तोंड देते. मात्र, पुरवठा साखळीतील रशियावरील अवलंबित्व यासारखी आव्हाने कायम आहेत. तरीही, स्थानिक पातळीवर असेंब्लीचा परवाना मिळाल्यास धोके कमी होतील आणि स्वदेशी कौशल्याला प्रोत्साहन मिळेल.

क्षेपणास्त्र ठरणार भारतासाठी गेमचेंजर

हे पाऊल हवाई युद्धाच्या उत्क्रांतीमध्ये भारताची धोरणात्मक दूरदृष्टी दर्शवते. कारण- आधुनिक युद्धात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्रे महत्त्वाचे ठरते. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकद दिसेल आणि त्यामुळे अस्थिर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण होईल, हे नक्की. हा करार जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी याच्या अधिकृत घोषणांची अपेक्षा वाढत आहे. R-37M मुळे एरोस्पेस शक्ती म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल.