Dengue Vaccine in India : पावसाळा सुरू झाला की डासांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याचबरोबर डेंग्यूचा धोका देखील वाढतो. ताप, अंगदुखी, प्लेटलेट्स कमी होण्याची चिंता आणि काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ… डेंग्यूचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी हा अनुभव त्रासदायक ठरतो. आता अशा परिस्थितीत भारतात डेंग्यूविरोधात आणखी एक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जपानची ताकेडा फार्मास्युटिकल आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यात लस विकसित करण्यासाठी करार केला आहे. डॉ. रेड्डीज भारतात या लसीचा प्रचार आणि वितरण करणार आहे. मात्र, लस बाजारात येण्यापूर्वी आवश्यक असलेल्या काही नियामक आणि गुणवत्ता प्रक्रियांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

डेंग्यूचा वाढता धोका

भारतात डेंग्यूचा धोका अजूनही कायम आहे. हा आजार प्रामुख्याने एडीस डासांमुळे पसरतो. हे डास साचलेल्या पाण्यात वाढू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आणि त्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते.

डेंग्यूचा विषाणू DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4 अशा चार प्रकारांमध्ये आढळतो. भारतातील अनेक भागांमध्ये हे चारही प्रकार आढळून आले आहेत. ताकेडाने दिलेल्या देशव्यापी आण्विक सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, दर १४ डेंग्यू रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये एकाच वेळी डेंग्यूच्या एकापेक्षा जास्त प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग आढळला आहे. महत्त्वाचं म्हणजे, डेंग्यूच्या एका प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर इतर प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण मिळेलच, असं नाही.

क्यूडेंगा लस नेमकी काय?

क्यूडेंगा ही डेंग्यूविरोधी लस आहे. या लसीमध्ये कमकुवत केलेल्या DENV-2 विषाणूचा आधार वापरला आहे. त्यासोबत DENV-1, DENV-3 आणि DENV-4 या तीन प्रकारच्या डेंग्यू विषाणूंचे संरचनात्मक प्रथिने जोडण्यात आली आहेत. म्हणजेच, डेंग्यूच्या चारही प्रकारच्या विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही लस तयार करण्यात आली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, २०२२ पासून ४३ देशांमध्ये क्यूडेंगाला मंजुरी मिळाली असून, आतापर्यंत जगभरात सार्वजनिक आणि खासगी लसीकरण कार्यक्रमांमधून ३.२ कोटींपेक्षा अधिक डोस वितरित करण्यात आले आहेत. क्यूडेंगा लसीचे ०.५ मिलीचे दोन डोस दिले जातात. पहिला डोस दिल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) पूर्व पात्रता मान्यता देखील मिळाली आहे. डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये लसीकरणापूर्वी तपासणी न करताही क्यूडेंगा वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

क्यूडेंगा भारतात कधी उपलब्ध होणार आहे?

क्यूडेंगा लस २०२७ च्या पहिल्या सहामाहीत भारतात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक नियामक प्रक्रिया आणि बाजारपेठेतील परवानगीची प्रक्रिया पूर्ण होणं अद्याप बाकी आहे. भारताच्या औषध नियामकाने जुलै २०२६ मध्ये क्यूडेंगाला मंजुरी दिली आहे. मात्र गुणवत्ता तपासणी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि टाकेडा यांच्यात झालेल्या करारामुळे भारतात या लसीचे वितरण अधिक सुरळीतपणे होण्याची अपेक्षा आहे.

क्लिनिकल चाचण्यांमध्ये लस किती प्रभावी ठरली?

डेंग्यूची लस घेतल्यानंतरही डेंग्यू होण्याची शक्यता पूर्णपणे संपत नाही. मात्र, डेंग्यूचा संसर्ग आणि गंभीर स्थितीपासून संरक्षण मिळण्यास ही लस किती मदत करते, याबाबतच्या चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसले आहेत.

टाकेडाच्या २०२५ मधील विश्लेषणानुसार, लस घेतल्यानंतर ४.५ वर्षांनी डेंग्यूचा संसर्ग रोखण्यात लस ६१.२ टक्के प्रभावी ठरली आहे. तर डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ नये, यासाठी रुग्णाला ८४.१ टक्के संरक्षण मिळाल्याचे दिसून आले आहे.

भारतात ही लस कोणाला घेता येणार?

भारतात ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना क्यूडेंगा लस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, ही लस घेण्याआधी त्या व्यक्तीला यापूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, हे तपासण्याची गरज नाही. म्हणजेच, लस घेण्यापूर्वी रक्ताची चाचणी किंवा डेंग्यूचा संसर्ग झाला होता का, याची तपासणी करावी लागणार नाही.

टाकेडाच्या इंटरकॉन्टिनेंटल मार्केट्स, इंटरनॅशनल बिझनेस युनिटचे प्रमुख डॉ. महेंद्र नायक यांनी सांगितले की, क्यूडेंगा ही लस ४ ते ६० वर्षांच्या व्यक्तींसाठी वापरता येईल. या लसीमुळे डेंग्यूच्या चारही प्रकारांपासून होणाऱ्या आजाराला रोखता येणार आहे. लस घेण्यासाठी त्या व्यक्तीला यापूर्वी डेंग्यू झाला आहे किंवा नाही, हे जाणून घेण्याची गरज नाही. भारतात डेंग्यू लसीकरणाची उपलब्धता वाढवण्याच्या टाकेडाच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे ग्लोबल जेनेरिक्सचे सीईओ एम. व्ही. रमणा यांनी भारतात पहिली मंजूर डेंग्यू लस उपलब्ध होणे ही आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले आहे. खासगी बाजारात ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीचे डॉक्टर, लस देणारे आरोग्य कर्मचारी आणि वितरणाचे नेटवर्क प्रभावीपणे वापरले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

लस कशी उपलब्ध होणार?

क्यूडेंगा लस खासगी बाजारात उपलब्ध होणार आहे. लहान मुलं आणि प्रौढांसाठी लसीच्या प्रचार आणि वितरणाची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडे असणार आहे.

लसीबाबत डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये माहिती पोहोचवण्यासोबतच डेंग्यू आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे कामही दोन्ही कंपन्या करणार आहेत. हे सर्व संबंधित नियमांचे पालन करून केले जाणार आहे.

लसीचे काही साइड इफेक्ट्स आहेत का?

कुठलीही लस घेतल्यानंतर काही किरकोळ त्रास जाणवू शकतो. क्यूडेंगाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्येही काही साइड इफेक्ट्स नोंदवले गेले आहेत. यामध्ये लस टोचलेल्या ठिकाणी दुखणे, डोकेदुखी, स्नायूंमध्ये दुखणे, टोचलेल्या जागेभोवती त्वचा लाल होणे आणि ताप यांसारखी प्रतिक्रिया दिसून आली