India’s First Nuclear Reactor Tarapur Unit 1 and 2: तारापूर येथे ऑक्टोबर १९६९ मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपच्या पाइपलाइनचा दर्जा खालावल्याने ती बदली करण्याचे आव्हान एनपीसीआयएलसमोर (न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन) होते. तारापूर १ व २ या अणुभट्ट्यांचे अजूनही किमान १० वर्ष आयुर्मान शिल्लक असून देशाला असणारी विजेची गरज लक्षात घेता या दोन त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर हे काम पूर्ण झाले असून तारापूर येथील १६० मेगावॉट क्षमतेच्या अणुभट्टीमधून वीज उत्पादन करण्यास सुरुवात झाली आहे. जगभरात अशा प्रकारचे कार्यरत असणाऱ्या फक्त दोनच अणुभट्ट्या असून त्यांचे पुनरुज्जीवन होत असल्याने देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची पार्श्वभूमी
बॉयलिंग वॉटर रिॲक्टर अर्थात पाणी उकळून वीजनिर्मिती करणाऱ्या दोन अणुभट्ट्या (१ व २) तारापूर येथे १९६९ मध्ये कार्यरत झाल्या होत्या. काही तांत्रिक कारणांमुळे आरंभीची २२० मेगावॉट वीज उत्पादन क्षमता १६० मेगावॉटवर मर्यादित ठेवण्यात आली होती. देशात सध्या या अणुभट्ट्यांमधून सर्वात कमी दराने म्हणजे २.४१ रुपये प्रतियुनिट इतक्या माफक दरात महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांना वीज पुरवठा केला जातो. सन २००५ मध्ये प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर पद्धतीच्या प्रत्येकी दोन ५४० मेगावॉट अणुभट्ट्या (३ व ४) कार्यरत झाल्या असून तारापूर येथे १४०० मेगावॉट वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे.
अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन का?
सन २०२० मध्ये तारापूर येथील अणुभट्टी १ नियमित तपासणीच्या वेळी रिॲक्टर प्रणालीच्या रिसर्क्युलेशन पायपिंग अर्थात पुनर्संचरण लूपच्या वाहिनीचे अध:पतन (डिग्रेडेशन) झाल्याचे निदर्शनास आले. ‘इंटरग्रॅन्युलर स्ट्रेस करोजन क्रॅकिंग’मुळे या जलवाहिनीमध्ये गळती होण्याची शक्यता बघता जानेवारी २०२० मध्ये ही अणुभट्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै २०२० मध्ये अणुभट्टी २ तपासणीमध्ये याच प्रकारची समस्या निदर्शनास आल्याने या दोन्ही अणुभट्ट्यांमधील अणुऊर्जा उत्पादन तात्पुरते बंद करण्यात आले. या दोन्ही अणुभट्ट्यांचे आयुष्य किमान १० वर्षे शिल्लक असल्याने तसेच सुरक्षिततेच्या व अखंड वीज उत्पादन व्हावे या दृष्टिकोनातून, डिग्रेडेशेन झालेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण रिसर्क्युलेशन पायपिंग व किरणोत्सर्ग क्षेत्रातील इतर पाइप बदलण्याचा नूतनीकरण प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुनरुज्जीवन प्रकल्प कसा राबविण्यात आला?
तारापूर १ व २ अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, किरणोत्सर्ग भागात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळ व उपकरणांची उपलब्धता, विशिष्ट दर्जाचे पाइप व इतर जोडणारे साहित्य मिळविणे व काम करण्यासाठी सक्षम ठेकेदार नेमणे हे आव्हानात्मक व वेळखाऊ काम होते. कोर (CORE) इंजीनियरिंग कंपनीच्या माध्यमातून प्राथमिक पुनर्संचरण लूपच्या ओस्टेनिटीक स्टील धातूचे पाइप बदलण्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपये व इतर उपकरणे व साहित्य बदलण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. अणुभट्टी पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रकल्प सुमारे दोन वर्षांपूर्वी संपवण्याचा प्रयत्न होता. मात्र ऑस्टेनिटीक स्टीलच्या वेगवेगळ्या व अमानक आकाराच्या जलवाहिन्या इटलीतून उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाला विलंब झाला.
पुनरुज्जीवित अणुभट्ट्यांमधून वीज कधी?
अणुभट्ट्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पादरम्यान अणुभट्टी १ चा कार्यरत करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. अणुऊर्जा नियामक मंडळाने या अणुभट्टीची तपासणी करून ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वीज उत्पादन करण्यास ही अणुभट्टी कार्यक्षम असल्याचा दाखला दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये विशिष्ट प्रकारे वृद्धिंगत केलेले समृद्ध (एनरिच) युरेनियम हे इंधन या अणुभट्टीमध्ये भरून वीज निर्मितीचा ‘क्रिटिकॅलिटी’ हा वीज निर्मितीमधी महत्त्वपूर्ण प्राथमिक टप्पा ३० डिसेंबर २०२५ रोजी गाठण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अणू विखंडनाद्वारे (न्यूक्लिअर फिशन) वीज उत्पादन करून २९ जानेवारी रोजी रात्री १०.२२ वाजता अणुभट्टी १ मधील वीज राष्ट्रीय विद्युत ग्रीडला जोडून सिंक्रोनायझेशन हा टप्पा गाठण्यात आला. अशा प्रकारे अणुभट्टी १ मधून वीज उत्पादन तांत्रिक दृष्ट्या सुरू झाले.
अणुभट्टी १ चे वीज उत्पादन थांबविण्यात का आले?
वीज उत्पादन क्षमता टप्याटप्याने वाढविली जात असताना ३० जानेवारीच्या सकाळी वीज निर्मितीमधील टर्बाइन या उपकरणाच्या बाह्य बाजूला असणाऱ्या इन्सुलेशनमधून धूर निघत असल्याचे दिसून आल्याने वीज उत्पादन बंद करण्यात आले. या टर्बाइनच्या इन्सुलेशनमध्ये तेल, ग्रीस अथवा इतर ज्वलनशील पदार्थामुळे ही घटना घडल्याची शक्यता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली. आवश्यक दुरुस्ती व बदल करून पुढील काही दिवसांत अणुभट्टी १ मधून वीज निर्मिती पुन्हा सुरू केली जाणार आहे.
अणुभट्टी २ मधून वीज उत्पादन कधी?
अणुभट्टी २ मधील बहुतांश नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे परीक्षण अणुऊर्जा नियामक मंडळातून होऊन आवश्यक दाखले मिळाल्यानंतर अणुभट्टीमध्ये इंधन भरणे व नंतर क्रिटिकॅलिटी व राष्ट्रीय विद्युत ग्रीडला जोडून सिंक्रोनायझेशन हा टप्पा गाठण्यात येईल. त्यानंतर अणुभट्टीमधून वीज उत्पादन सुरू होऊन ९० मेगावॉट क्षमता गाठेपर्यंत धीम्या गतीने वीज उत्पादन वाढवले जाईल. अणू विखंडनाद्वारे वीज उत्पादन सुरू केल्यानंतर १६० मेगावॉट वीज उत्पादन क्षमता गाठण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, एकंदरीत पुढील तीन महिन्यात या अणुभट्टीमधून वीज सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

