विविधतेत एकता असे ब्रीद मिरवणाऱ्या आपल्या भारतात पक्ष्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वैविध्य असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे जागतिक स्तरावर पक्ष्यांच्या विविधतेत भारताचा अव्वल पाच देशांमध्ये समावेश झाला आहे. तो कसा झाला, याचा हा आढावा…
जागतिक पक्षीगणना कधी झाली?
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक पक्षीगणना करण्यात येते. ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट (जीबीबीसी) असे या कार्यक्रमाचे नाव असून यामध्ये भारताने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. यंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित जीबीबीसीच्या १४ व्या आवृत्तीत जगभरातील पक्षी निरीक्षक एकत्र आले होते, ज्यांनी पक्ष्यांची संख्या आणि वितरणाचा मागोवा घेण्यास मदत करण्यासाठी ई-बर्ड (eBird) या ऑनलाइन व्यासपीठावर पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवली.
भारतात २७ हजार ठिकाणी गणना
भारतात २७ हजारांहून अधिक ठिकाणी पक्षीगणना करण्यात आली. देशातील पक्षी निरीक्षणाच्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असलेल्या या मोहिमेत ५६२ जिल्ह्यांमधील एकूण ७,३३६ पक्षी निरीक्षकांनी तब्बल ६४,९९२ नोंदी केल्या. यामध्ये पक्ष्यांच्या १,०९२ प्रजातींची नोंद करण्यात आली. पक्षीतज्ज्ञांच्या मते ही आकडेवारी भारतात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी जवळपास ७८.८ टक्के आहे.
पक्ष्यांच्या प्रजातींच्या विविधतेच्या बाबतीत देशाने जागतिक पातळीवर चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ही संख्या जीबीबीसीच्या इतिहासात भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रजातींची संख्या ठरली. पक्ष्यांची नोंदणी सादर करण्याच्या आधारावर भारताने या जागतिक मोहिमेतील सहभागात दुसरे स्थानही मिळवले. दोन लाखांहून अधिक नोंदींसह अमेरिका या यादीत अव्वल ठरली. प्रजातींच्या संख्येनुसार कोलंबिया १,३८४ प्रजातींसह अव्वल स्थानी आहे, त्याखालोखाल ब्राझील (१,१५५) दुसऱ्या आणि इक्वेडोर (१,१२९) तिसऱ्या क्रमांकावर आहे. पेरू १,०७० पक्ष्यांच्या प्रजातींसह पाचव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक २१२ प्रजाती कुठे?
देशभरामध्ये करण्यात आलेल्या पक्षीगणनेच्या नोंदींचा अभ्यास केल्यानंतर पक्षी निरीक्षणाच्या ठिकाणांमध्ये गुडगावमधील सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान हे अव्वल ठरले. येथे पक्ष्यांच्या २१२ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यामुळे हे ठिकाण पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या अभ्यास करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रमुख केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पक्ष्यांच्या अधिक प्रजातींची नोंद झालेल्या ठिकाणांमध्ये दुसऱ्या स्थानी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था आहे. या संस्थेच्या परिसरात पक्ष्यांच्या २०६ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे देहरादून येथेच असलेल्या वन्यजीव संशोधन संस्था परिसरात १७५ प्रजातींची नोंद होऊन हे ठिकाण तिसऱ्या स्थानी आले. त्यानंतर भुवनेश्वरमधील नंदनकानन वन्यजीव अभयारण्य येथे पक्ष्यांच्या १७३ प्रजातींची नोंद करण्यात येऊन हे ठिकाण चौथ्या स्थानावर राहिले.
तांबडा बुलबुल भारतातील सर्वव्यापी पक्षी?
भारतात करण्यात आलेल्या पक्षीगणनेत पक्ष्यांच्या काही प्रजातींची नोंद विविध ठिकाणी झालेल्या निरीक्षणात नोंदवण्यात आली. यातून काही पक्षी भारतात विविध ठिकाणी पसरल्याचे आढळून आले. यामध्ये तांबडा बुलबुल हा पक्षी अव्वल स्थानी राहिला. या बुलबुल पक्ष्यांची नोंद भारताच्या पूर्व, मध्य, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम अशा पाच प्रमुख प्रदेशांमध्ये करण्यात आलेल्या नोंदणीतील पक्ष्यांच्या सर्वाधिक पाच प्रजातींच्या यादीत करण्यात आली होती. तसेच सामान्यपणे सर्वत्र आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये मैना, पोपट, कावळा, रानकबूतर आणि काळा ड्रोंगो यांचा समावेश होता. या पक्षीगणना मोहिमेमुळे काही पक्ष्यांमध्ये देशातील विविध अधिवासांमध्ये राहण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट झाले.
देशातील पक्षीप्रेमींमध्ये वाढ?
देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या पक्षीगणना मोहिमेत सहभाग घेतला. यात ओडिशातील सर्व जिल्ह्यांचा पहिल्यांदाच समावेश झाला. २०२५ च्या तुलनेत, या वर्षीच्या पक्षीगणनेत सहभाग घेणाऱ्यांच्या संख्येत १२.९ टक्क्यांची वाढ झाली. तसेच पक्षी निरीक्षकांची संख्या ६,५०० वरून ७,३३६ पर्यंत वाढली. जिल्हा व्याप्तीमध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली, तर प्रजातींच्या विविधतेत ०.६ टक्क्यांची वाढ दिसून आली. या सर्व आकड्यांवरून भारतात पक्षी निरीक्षकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट तर होतेच, त्याहून अधिक जागतिक जैवविविधता निरीक्षणात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही अधोरेखित होते. भारतात पक्षीगणना मोहिमेचे समन्वय करणाऱ्या ‘बर्ड काउंट इंडिया’च्या मते, या पक्षी निरीक्षण उपक्रमाने जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. देशभरात सुमारे १,४७४ पक्षी निरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्याद्वारे १०,००० हून अधिक नवीन सहभागींना पक्षी निरीक्षण आणि निसर्गस्नेही अनुभवाची ओळख झाली. सार्वजनिक पक्षीभ्रमंती आणि जनजागृती कार्यक्रमांमुळे देशातील विविध प्रदेशांतील पक्षी निरीक्षकांचे समुदाय एकत्र आले.
dharmesh.shinde@expressindia.com
