India heatwave and El Nino impact 2026: देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. काही भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद सोमवारी झाली. उत्तर प्रदेशातील बांदा येथे सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर मंगळवारी बांदा येथील तापमान ४५.६ अंश सेल्सिअस होते. यावर्षी देशात दीर्घकाळ तापमान वाढलेले असेल, याबाबतचे संकेत मिळत आहेत. पुढील काही महिने तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच मान्सून व त्यानंतरही तापमानात हे वाढलेलेच राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील काही महिने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे. मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा अनुभवायला येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी दीर्घकाळ उष्णता सहन करावी लागू शकते.

उष्णतेची लाट म्हणजे काय? ती कशी कळते?

देशातील काही भागांत उन्हाळा हा अत्यंत तीव्र असतो. परंतु, उष्णतेच्या लाटा ह्या विशिष्ट परिस्थितीत येतात. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटांची व्याख्या केली आहे. एखाद्या ठिकाणचे तापमान हे सलग दोन दिवस तेथील सामान्य तापमानापेक्षा पाच अंश सेल्सिअसने वाढलेले असते, तेव्हा त्या ठिकाणी उष्णतेची लाट आल्याचे म्हटले जाते. जर तापमान सामान्य तापमानापेक्षा ७ अंश सेल्सिअसने वाढले असेल तर उष्णतेची अति तीव्र लाट आल्याचे घोषित केले जाते. उष्णतेची लाट आहे की नाही हे ठरवताना संबंधित ठिकाण हे सपाट जमिनीवर आहे की डोंगराळ भागात आहे, याचा विचार केला जातो. तसेच त्या ठिकाणचे तापमान हे ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक आहे, हे देखील विचारात घेतले जाते. उष्णतेची लाट म्हणजे एक अशी परिस्थिती असते, जिथे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक तसेच प्रकृतीला सहन न होणारे असते. भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची केलेली ही व्याख्या फक्त भारतापुरती मर्यादीत आहे. ती जागतिक पातळीवर लागू होत नाही. देशात उष्णतेची लाट मुख्यत: मार्च ते जून या कालावधीत दिसून येते. कधीकधी ती मान्सून दरम्यानही दिसते. २०२३ मध्ये उष्णतेची लाट फेब्रुवारी महिन्यात आली होती. फेब्रुवारीत उष्णतेची लाट येणार असल्याचे घोषित करण्याची कोणतीही तरतूद त्यापूर्वी करण्यात आली नव्हती.

सर्वाधिक उष्णतेच्या लाटा कोणत्या दोन भागांत?

भारतात दोन भागात उष्णतेची लाट येणे सामान्य मानले जाते. एक म्हणजे वायव्य भारत ते बिहार आणि झारखंडपर्यंतचा भाग होय. हा भाग उष्णतेच्या लाटेसाठी ‘कोर झोन’ (मुख्य क्षेत्र) मानला जातो. तर दुसरा भाग म्हणजे पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश व ओडिशा ही राज्ये होय. या दोन्ही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची कारणे वेगवेगळी आहेत, परंतु, त्यांचा संबंध एकमेकांशी जुळलेला आहे. कोर झोनमध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याचे कारण म्हणजे उच्च वातावरणात सतत असलेल्या उच्च दाबाची स्थिती होय. उच्च वातावरणातून जमिनीकडे हवेचा मारा होतो. त्यामुळे हवेचे संकुचन होते व तापमानात लक्षणीय वाढ होते. आंध्र प्रदेश आणि ओडिशात उष्णतेची लाट येण्याचे कारण म्हणजे म्हणजे उत्तर व मध्य भारतातील तप्त भूभाग आहे. याच तप्त भूभागावरून पश्चिम व वायव्य दिशेकडून येणारे वारे आंध्र प्रदेश व ओडीशाच्या दिशेने वाहत येतात. हे वारे समुद्राकडून जमिनीकडे म्हणजे ओडीशा किंवा आंध्र प्रदेशकडे येणाऱ्या नैसर्गिक थंड वाऱ्यांना रोखतात. जेव्हा हे थंड वारे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तेव्हा उष्ण कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात प्रचंड वाढ होते आणि उष्णतेची लाट निर्माण होते. कोर झोन किंवा आंध्र प्रदेश, ओडिशात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव चार ते आठ दिवस राहतो.

दक्षिण व ईशान्य भारतालाही उष्णतेची झळ, पण कधी?

दक्षिण भारत व ईशान्य भारत (नॉर्थइस्ट) हे उष्णतेच्या लाटेपासून अद्याप सुरक्षित राहिले आहेत. या भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव जाणवत नाही. परंतु, भविष्यात या भूभागांनाही उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने २०२३ मध्ये थंडीच्या व उष्णतेच्या लाटेशी संबंधित एक अहवाल जारी केला होता. या शतकाच्या अखेर दक्षिण भारतात तीव्र उष्णतेच्या लाटांचा प्रभाव जाणवेल, तसेच भारतात उष्णतेच्या लाटा येण्याचे प्रमाण वाढेल, तसेच त्यांचा प्रभाव राहण्याच्या दिवसांमध्येही वाढ होईल, असे अहवालात नमूद आहे.

भारतात यावर्षी पाऊस कमी, उष्णतेच्या लाटा जास्त?

भारताच्या पूर्वेला असणाऱ्या प्रशांत महासागरात एल निनो परिस्थिती निर्माण झाल्याने भारतात उष्णतेच्या लाटा येतात, असे काही अभ्यासातून समोर आले आहे. एल निनोचा प्रभाव असल्यास उष्णतेच्या लाटांचा प्रभाव दीर्घकाळी राहतो. तसेच त्याचा परिणाम पावसावर होतो. पाऊस कमी प्रमाणात पडतो. यावर्षी एल निनो विकसित होत आहे. त्यामुळेच यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडले असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, एल निनोचा प्रभाव हा पुढील वर्षीही राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील वर्षीही उष्णतेच्या लाटा जाणवण्याचा अंदाज आहे. एल निनो परिस्थिती एका वर्षात दिसून आल्यास तिचा प्रभाव पुढील काही वर्षे जाणवतो, हे एल निनोच्या इतिहासातून दिसून येते.

उष्णतेची लाट – एक भीषण आपत्ती, राज्यांची केंद्राकडे कोणती मागणी?

सध्या देशातील २३ राज्य उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहेत. उष्णतेचा सामना करण्यासाठी जवळपास शंभरहून अधिक शहरांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. पिण्याच्या थंड पाण्याची सोय, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या वेळा बदलणे, शरीरात पाण्याची पातळी राखली जावी म्हणून उपाययोजना करणे, उष्णतेच्या झळा जाणवतात त्या वेळेत नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करणे, अशी तत्वे आखून देण्यात आली आहेत . दरवर्षी उष्णतेच्या लाटेने उष्माघात किंवा तत्सम उष्णतेसंबंधित आजार होऊन भारतात शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागतात. भारतात आपत्ती व्यवस्थापन कायद्यात उष्णतेची लाट ही आपत्ती मानली जात नाही. उष्णतेची लाट आणि वीज यांना आपत्ती घोषित करावे असे १६ व्या वित्त आयोगाने अहवालात म्हटले होते. तसे झाल्यास उष्णता व वीजांमुळे पीडित झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत मिळेल. भारतात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याने उष्णतेसंबंधित उपाययोजनांवर बराच खर्च होत असल्याने उष्णता व वीज यांना आपत्ती घोषित करावे, अशी मागणी राज्यांनी केंद्राकडे अनेक वर्षांपासून लावून धरली आहे.