भारतात यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होताना दिसत असून याचा थेट परिणाम आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. आतापर्यत देशभरात ३०० हुन अधिक नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यंदा आणखी एक नवा पॅटर्न दिसून येत आहे. अनेक प्रदेशात रात्रीच्या वेळीही उकाड्यात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि वर्धा आदी भागांमध्ये रात्रीच्या वेळीही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
असह्य उष्मा
देशातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती मागील काही दिवसांपासून कायम असून उष्णतेचा पारा ४५ ते ४८ दरम्यान नोंदला जात आहे. जगभरातील १०० उष्ण शहरांच्या यादीत भारतातील तब्बल ९७ शहरांचा समावेश झाला असून यामुळे भारतात उष्णता वाढ एक गंभीर समस्या होत चालली आहे. नागरिकांसोबतच पशु आणि पक्ष्यांनाही वाढत्या उष्णतेचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याही वर्तनात बदल होत आहे.
सर्वाधिक प्रभाव कुठे?
सध्या मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य आणि तीव्र उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस या प्रदेशात हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागांसह महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांताचा समावेश आहे. विदर्भासह अनेक भागात रात्रीच्या वेळीही उष्णतेचा सामना करावा लागत असून दिवसभराच्या काहिलीनंतर नागरिकांना रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीच्या वाढत्या घटनांमुळे उष्माघात आणि उष्णतेशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या वेळीही उकाड्यात वाढ
भारतात उन्हाळा कायमच तीव्र असतो. असे जरी असले तरीही तज्ज्ञांच्या मतानुसार, उष्णतेचे मानवी आरोग्यवर होणारे परिणाम वाढू लागले आहेत. तसेच अनेक प्रदेशात रात्रीच्या वेळीही उकाड्यात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि वर्धा आदी भागांमध्ये रात्रीच्या वेळीही नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे या प्रदेशांना मागील काही दिवसांपासून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. येथे रात्रीच्या वेळीही ३० ते ३२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत आहे. रात्रीच्या तापमानात वाढ झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. कारण या दरम्यान शरीराचे तापमानही अधिक असते. यामुळे नागरिकांना आपण दीर्घ काळापासून शर्यतीत धावत आहोत अशी अवस्था निर्माण होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, रात्री वाढणाऱ्या उकाड्यामुळे तापमानाचे नवे विक्रम नोंदले जातील अशी शक्यता आहे. भारतामध्ये रात्रीचे सरासरी तापमान दर दशकाला सुमारे ०.२१ अंश सेल्सियसने वाढत आहे. तसेच कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू ) च्या आकडेवारीनुसार, भारतातील ३६ पैकी ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ होत आहे.
सध्याच्या तीव्र उष्णतेचे कारण काय?
जागतिक हवामानातील तापमानवाढीमुळे भारतातील उष्णतेच्या लाटेसदृश्य घटनांमध्येह वाढ होत आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, राजस्थानच्या वाळवंटी भागांमधून आणि पाकिस्तानमधून वायव्य दिशेहून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या उष्णेतची तीव्रता वाढली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आणि राजस्थानमधील वाळवंटी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव देशातील बहुतांश भागांवर आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या वाऱ्यांचे प्रवाह अखंडपणे सुरू असून यामुळे भारतात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. पुढील काही दिवस भारतातील काही भागात तीव्र उष्मा जाणवेल असा अंदाज आहे.
हवामान स्थितीत बदल केव्हा?
सध्या महाराष्ट्रासह देशातील काही भागात मोसमी पूर्व घडामोडींना काहीसा वेग प्राप्त झाला आहे. तसेच उत्तरेच्या काही राज्यांवर पश्चिमी विक्षोभाची (वादळाची) स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. पश्चिमी विक्षोभामुळे पावसाची नोंद होते. तसेच वाऱ्यांची दिशा आणि हवामानाच्या स्थितीतही बदल होतो. पुढील काही दिवस उत्तरेच्या राज्यांवर पश्चिमी विक्षोभाची स्थिती राहील असा अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवसात उष्णतेच्या लाटांची तीव्रता काहीशी कमी होऊन कमाल तापमानातही घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
