India Heatwave Reasons Weather Experts Analysis : सध्या देशभरात सूर्य आग ओकत असल्याने भारतीय हवामान विभागाने विविध भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या महिनाभरात उष्माघाताने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून काहींचा मृत्यूही झाला आहे. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद केली जात आहे. भारतात दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा येतात. मात्र, यंदाचा हंगाम नेमका वेगळा का ठरत आहे? या परिस्थितीचा सर्वाधिक फटका कोणाला बसू शकतो आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो? या सर्व मुद्द्यांवर बंगळुरू येथील तक्षशिला संस्थेचे जिओस्पेशिअल रिसर्च प्रोग्रामचे प्राध्यापक वाय. नित्यानंदम यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे, त्याविषयी…

यंदा उन्हाचा कहर इतका का वाढला?

सध्या उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत आणि पाकिस्तानच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत या भागांमध्ये प्रखर सूर्यप्रकाश, कोरडे वारे, जमिनीतील कमी आर्द्रता आणि राजस्थान तसेच लगतच्या पाकिस्तान भागात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे नैसर्गिकरित्या तीव्र उष्णता जाणवते. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात तापमान नकाशांमध्ये लाल आणि नारंगी रंग दिसणे हवामानशास्त्रीयदृष्ट्या सामान्य मानले जाते. मात्र, यावर्षीची उष्णतेची तीव्रता, तिचा दीर्घ मुक्काम आणि प्रचंड विस्तार काळजी वाढवणारा आहे. रात्रीच्या वेळीही तापमान कमी न होता ते दीर्घकाळापर्यंत असामान्यपणे उच्च पातळीवर राहत असल्याने उष्णतेच्या तीव्र लाटेचे संकेत मिळत आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसाचे कमी प्रमाण, सातत्याने वाहणारे कोरडे वारे, जमिनीच्या पृष्ठभागाचे वाढते तापमान यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. याशिवाय, हवामानात सातत्याने होणारा बदलही या समस्येला कारणीभूत ठरत आहे. भारतासाठी उष्णतेच्या लाटा नवीन नसली, तरी जागतिक तापमानवाढीमुळे त्यांची दाहकता कमालीची वाढली आहे. परिणामी, संपूर्ण प्रदेशात अशा प्रकारचे तीव्र उन्हाळे आता सामान्य होऊ लागले आहेत. यावर्षी उष्णतेची तीव्रता, तिचा दीर्घ मुक्काम प्रचंड विस्तार काळजी वाढवणारा आहे.

तापमानातील वाढ कशी मोजतील जाते?

तापमान दर्शवणारे सर्व नकाशे एकाच पद्धतीने तयार केले जात नाहीत. त्यातील पहिली पद्धत म्हणजे, विविध भागांत असलेल्या हवामान केंद्रांद्वारे मोजल्या गेलेल्या हवेच्या तापमानाची आकडेवारी गोळा केली जाते आणि गणितीय पद्धतीने ती संपूर्ण परिसराचा नकाशा तयार करण्यासाठी वापरली जाते. हवामान केंद्रांचे हे जाळे जितके जास्त आणि जवळ-जवळ असेल, तितका नकाशाचा अंदाज अधिक अचूक येतो. ही माहिती सरकारी यंत्रणा, खाजगी संस्था आणि हवामानप्रेमी व्यक्तींकडून गोळा केली जाते. दुसऱ्या पद्धतीत, उपग्रहावर बसवलेल्या थर्मल सेन्सर्सचा वापर करून खूप मोठ्या क्षेत्राचे तापमान मोजले जाते. हे सेन्सर्स जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान आणि त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा मोजतात आणि त्यानंतर तापमान निश्चित केले जाते. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून तापमान बदलांचा अभ्यास करण्यासाठी हे एक प्रमुख साधन बनले आहे. सन २००० नंतर ‘मॉडिस’ आणि ‘लँडसॅट’ सारख्या अत्याधुनिक थर्मल सेन्सर्समुळे दररोजची जागतिक आकडेवारी मिळणे अधिक सोपे झाले आहे. तिसऱ्या पद्धतीमध्ये, संगणकीय हवामान मॉडेल्सच्या आधारे हवेच्या तापमानाची गणना केली जाते. त्यामध्ये जमिनीवरील हवामान केंद्रे, उपग्रहांद्वारे मिळालेले जमिनीचे तापमान, हवेतील आर्द्रता, सूर्यकिरणांची प्रखरता, ढगांचे प्रमाण, पावसाची स्थिती, जमिनीतील ओलावा, जमिनीचा वापर, समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि भौगोलिक रचना अशा अनेक घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, याद्वारे ४ ते १५ दिवसांनंतरच्या हवामानाचा अचूक अंदाज बांधता येतो.

उष्णतेच्या लाटेसाठी कोणते घटक कारणीभूत?

भारतातील उष्णतेच्या लाटेसाठी प्रामुख्याने दोन घटक जबाबदार आहेत. त्यातील पहिला घटक हा अल निनोचा प्रभाव असून दुसरा घटक मानवी हस्तक्षेपामुळे सातत्याने होणारी जागतिक तापमानवाढ आहे. सध्या प्रशांत महासागरात अल निनोची स्थिती निर्माण होत असून आगामी काळात तिचा प्रभाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भारतीय उपखंडातील हवेतील ओलावा कमी होणे आणि मान्सूनपूर्व उष्णता वाढणे यासारखे परिणाम दिसून येत आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. भारतात १९६१ पासून उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात वाढतच चालले असून भविष्यात हा धोका आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, ही उष्णता किती तीव्रतेने जाणवेल हे स्थानिक घटकांवर अवलंबून असणार आहे. कमकुवत पश्चिमी विक्षोभ, दीर्घकाळ कोरडे वातावरण आणि कमी ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता वाढते. तसेच, शहरी भागात दाट बांधकामे, वाहनांची संख्या, एअर कंडिशनर आणि उद्योगांमुळे तापमान अधिक वाढते. ग्रामीण भागात जंगलांना लागणारे वणवे, जैवइंधन जाळणे आणि कोरड्या जमिनीमुळे तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि मधुमेहासारख्या समस्या उद्भवत आहे. त्याशिवाय उष्माघातामुळेही काहींचा मृत्यू होत आहे.

तापमानाच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञान कसे मदत करू शकते?

अचूक आणि प्रादेशिक पातळीवरील आकडेवारीशिवाय उष्णतेचा सामना करण्यासाठी आखलेल्या योजना फारशा प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे जागतिक हवामान बदल आणि स्थानिक पातळीवरील उष्णतेचे स्त्रोत यांमधील फरक ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते. आजच्या काळात जिओस्पेशिअल डेटामुळे कोणत्या शहरात किती तापमान आहे आणि त्यामागील नेमकी कारणे कोणती, याचा अचूक नकाशा तयार करता येतो. त्यामुळे संपूर्ण देशासाठी एकच योजना न आखता प्रत्येक भागाच्या गरजेनुसार योग्य आणि प्रभावी उपाययोजना करणे सरकारला शक्य होऊ शकते. उष्णतेचे स्वरूप प्रत्येक ठिकाणानुसार वेगळे असते. एका शहरात प्रभावी ठरणारी उपाययोजना दुसऱ्या ठिकाणी तितकीच उपयुक्त ठरेलच असे नाही. कारण स्थानिक हवामान, लोकसंख्येची घनता आणि मानवनिर्मित उष्णतेचे प्रमाण या गोष्टी प्रत्येक भागात वेगवेगळ्या असतात. त्यामुळे भारतात अधिक घनदाट हवामान केंद्रांचे जाळे आणि सुधारित तापमान निरीक्षण प्रणालीची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी संतुलित दृष्टीकोन आवश्यक आहे. त्यामध्ये उष्णतेचे परिणाम आणि तिची कारणे या दोन्हींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून, त्यासाठी वैज्ञानिक माहितीवर आधारित धोरणे आणि जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाच्या मदतीने नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.