India Prambanan Temple restoration agreement: इंडोनेशियाच्या योग्याकार्ता परिसरात उभे असलेले प्रम्बनन मंदिर हे केवळ दगडांनी घडवलेले प्राचीन देवालय नाही; तर ते भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील हजार वर्षांहून अधिक जुन्या सांस्कृतिक संवादाचे जिवंत प्रतीक आहे. हिंदू स्थापत्यकला, पुराणकथा, स्थानिक जावानीज परंपरा आणि भारतीय महाकाव्यांचा संगम या मंदिरात दिसतो. त्यामुळेच भारताने या मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचा घेतलेला निर्णय केवळ पुरातत्त्वीय उपक्रम नसून सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचा महत्त्वाचा अध्याय मानला जात आहे.
प्रम्बनन मंदिराच्या संवर्धनाचा करार
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान संरक्षण, सागरी सहकार्य, महत्त्वपूर्ण खनिजे, तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत दोन देशांदरम्यान करार झाले. या व्यापक करारांमध्ये प्रम्बनन मंदिराच्या संवर्धनाचा करार विशेष ठरतो. कारण या निर्णयातून भारत आणि इंडोनेशिया यांचे नाते केवळ आधुनिक अर्थकारण किंवा सामरिक हितसंबंधांपुरते मर्यादित नसून ते इतिहास, संस्कृती आणि स्मृती यांच्या खोल पायावर उभे आहे, हे स्पष्ट होते.
हिंदू आणि बौद्ध परंपरा
प्रम्बनन मंदिराचे वैशिष्ट्य त्याच्या प्राचीनतेत, भव्यतेत आणि स्थापत्यरचनेत आहे. नवव्या शतकात उभारलेले हे मंदिर इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल मानले जाते. जवळच असलेल्या बोरोबुदूर या प्रसिद्ध बौद्ध मंदिरामुळे या प्रदेशाचे आणखी एक वैशिष्ट्य स्पष्ट होते ते म्हणजे जावामध्ये एकेकाळी हिंदू आणि बौद्ध परंपरा एकमेकांच्या सहवासात गुण्यागोविंदाने नांदत होत्या. हे सहअस्तित्व त्या काळातील धार्मिक-सांस्कृतिक उदारतेचे प्रतीक मानले जाते.

मंदिरांचा विस्तीर्ण समूह
प्रम्बनन हे एक स्वतंत्र मंदिर नसून मंदिरांचा विस्तीर्ण समूह आहे. या संकुलात शिव, विष्णू आणि ब्रह्मा या त्रिमूर्तींना समर्पित मंदिरे आहेत. उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार, या परिसरात एकूण २४० मंदिरे होती. यांपैकी मध्यभागी असलेले शिव मंदिर सर्वात उंच आणि प्रभावी आहे. सुमारे ४७ मीटर उंचीचे हे मंदिर संपूर्ण संकुलाचा आत्मा आहे. त्याच्या उत्तरेला ब्रह्माचे मंदिर आणि दक्षिणेला विष्णू मंदिर आहे. या रचनेतून हिंदू तत्त्वज्ञानातील सृष्टी, पालन आणि संहार या त्रिमितींची कलात्मक अभिव्यक्ती दिसते.
रोरो जोंगग्रांग या राजकन्येची कथा
शिव मंदिराच्या आतील भागात चार खोल्या आहेत. मुख्य खोलीत शिवाची मूर्ती आहे, तर इतर खोल्यांमध्ये दुर्गा, अगस्त्य आणि गणेश यांच्या मूर्ती आहेत. या देवतांची मांडणी हिंदू धर्मातील कुटुंब, गुरु-परंपरा आणि आध्यात्मिक शक्ती यांच्या संकल्पना स्पष्ट करते. दुर्गेची मूर्ती स्थानिक जावानीज आख्यायिकेशीही जोडली जाते. रोरो जोंगग्रांग या राजकन्येची कथा प्रम्बननशी संबंधित आहे. आख्यायिकेनुसार, बांडुंग बोंडोवोसोने तिचे प्रेम मिळवण्यासाठी एका रात्रीत हजार मूर्ती घडवण्याचे आव्हान स्वीकारले. परंतु रोरो जोंगग्रांगने युक्तीने पहाट झाल्याचा भास निर्माण केला. ९९९ मूर्ती पूर्ण झाल्यानंतर फसवणूक लक्षात येताच बोंडोवोसोने तिला शाप दिला आणि ती हजारवी मूर्ती झाली. अशा प्रकारे इतिहास, पुराण आणि लोककथा यांचा संगम या मंदिराच्या स्मृतीत जिवंत आहे.
प्रम्बननच्या भिंतींवरील भारतीय महाकाव्य
प्रम्बननच्या भिंतींवरील कोरीव कामे विशेष उल्लेखनीय आहेत. त्यात रामायणातील प्रसंगांचे सुंदर चित्रण आढळते. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांच्या कथांमधून भारतीय महाकाव्य जावाच्या भूमीत कसे रुजले, याचे दर्शन घडते. आजही मे ते ऑक्टोबरदरम्यान पौर्णिमेच्या रात्री मंदिराजवळील खुल्या रंगमंचावर रामायण बॅले सादर केला जातो. हा नृत्य-नाट्यप्रकार केवळ पर्यटनाचे आकर्षण नाही; तर तो भारतीय कथासंपदेचे इंडोनेशियन कलारूपात झालेले रूपांतर आहे.
जागतिक वारसा स्थळ
इतिहासाच्या ओघात मात्र परमेश्वर मंदिराला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. दहाव्या शतकानंतर हे मंदिर ओसाड पडले. काळ, दुर्लक्ष आणि भूकंप यांच्या परिणामामुळे संकुलातील अनेक रचना भग्नावस्थेत गेल्या. तरीसुद्धा या मंदिराचे सांस्कृतिक आणि स्थापत्य महत्त्व कमी झाले नाही. १९९१ साली युनेस्कोने प्रम्बनन मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. या मान्यतेमुळे मंदिराचे जागतिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

‘ॲनास्टायलोसिस’ तंत्राचा वापर
भारताच्या मदतीने होणारा जीर्णोद्धार या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI ही अशा प्रकारच्या संवर्धन कामात अनुभवी संस्था आहे. प्रम्बनन परिसरातील पुनर्बांधणीसाठी ‘ॲनास्टायलोसिस’ तंत्राचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीत मूळ स्थळावर सापडलेले दगड, शिल्पखंड आणि स्थापत्य घटक काळजीपूर्वक ओळखून त्यांच्याच साहाय्याने वास्तू पुन्हा उभी केली जाते. ही प्रक्रिया दिसायला साधी वाटली तरी अत्यंत जटिल असते. प्रत्येक दगड कोणत्या रचनेचा भाग होता, त्याची मूळ जागा कोणती, त्याचा आकार, अलंकरण आणि जोडणी कशी होती, याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्यामुळे हा प्रकल्प केवळ बांधकामाचा नसून इतिहासाचे तुकडे पुन्हा अर्थपूर्ण पद्धतीने जोडण्याचा आहे.
सांस्कृतिक मुत्सद्देगिरी
प्रम्बननचा जीर्णोद्धार भारताच्या व्यापक सांस्कृतिक मुत्सद्देगिरीशीही जोडलेला आहे. भारताने यापूर्वी व्हिएतनाममधील माय सोन अभयारण्य, म्यानमारमधील बागन पुरातत्त्व क्षेत्र, कंबोडियातील अंकोर वाट आणि लाओसमधील वट फौ मंदिर अशा वारसा स्थळांच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही सर्व स्थळे भारतीय धार्मिक, सांस्कृतिक किंवा कलात्मक प्रभावाशी संबंधित आहेत. हे प्रकल्प दक्षिण आणि आग्नेय आशियातील प्राचीन सांस्कृतिक संबंधांना भारतासाठी आधुनिक राजनैतिक कोंदण देतात.
सामायिक वारशाचा सहसंरक्षक
आजच्या जागतिक राजकारणात सॉफ्ट पॉवरला मोठे महत्त्व आहे. लष्करी शक्ती, व्यापार किंवा तंत्रज्ञान यांसोबतच संस्कृती, वारसा, भाषा, कला आणि स्मृती यांचाही राष्ट्रांच्या प्रतिमेवर प्रभाव पडतो. प्रम्बनन मंदिराच्या संवर्धनात भारताची भूमिका ही अशाच सॉफ्ट पॉवरचे उदाहरण आहे. यामुळे भारत इंडोनेशियाशी केवळ करार करणारा भागीदार म्हणून नव्हे, तर सामायिक वारशाचा सहसंरक्षक म्हणून उभा आहे.

पर्यटकांसाठी विस्मयाचा विषय
प्रम्बनन मंदिर आजही इंडोनेशियातील हिंदूंसाठी पूजास्थळ आहे आणि जगभरातील पर्यटकांसाठी विस्मयाचा विषय आहे. त्याच्या शिखरांकडे पाहताना भारतीय पुराणकथा, जावानीज सौंदर्यदृष्टी आणि मानवी कल्पकतेचा संगम जाणवतो. दगडांमध्ये कोरलेले रामायण, मंदिरांच्या रचनेत दिसणारी त्रिमूर्तीची संकल्पना आणि लोककथांमध्ये जिवंत असलेली रोरो जोंगग्रांगची स्मृती या सर्व गोष्टी प्रम्बननला अद्वितीय ठरवतात.
भारत आणि इंडोनेशिया यांच्या सांस्कृतिक मैत्रीचे पुनःस्मरण
जीर्णोद्धारातील भारताचा सहभाग म्हणजे भूतकाळाकडे केवळ गौरवाने पाहणे नाही, तर त्या भूतकाळाला भविष्यासाठी जतन करणे आहे. प्रम्बनन मंदिराच्या दगडांत हजार वर्षांचा इतिहास आहे; पण त्या इतिहासाचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे, तो म्हणजे संस्कृती सीमा ओलांडते, कथा प्रवास करतात आणि वारसा अनेक देशांना एका अदृश्य नात्याने जोडतो. त्यामुळे प्रम्बननचे संवर्धन हे केवळ एका मंदिराचे पुनरुज्जीवन नाही; तर ते भारत आणि इंडोनेशिया यांच्या सांस्कृतिक मैत्रीचे पुनःस्मरण आहे.
