Sanskrit Avestan Language Similarity : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंत्यविधी पुढील महिन्यात होणार आहे. या अंत्यविधीला उपस्थिती राहण्याचे निमंत्रण इराण सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. इराणचा शत्रू इस्रायलबरोबर भारताचे चांगले संबंध असूनही इराणने भारताला अशा नाजूक क्षणी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर भारत व इराण यांच्यातील संबंध कसे आहेत? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही देशांमध्ये असलेल्या प्राचीन संबंधांवर नजर टाकणे आवश्यक आहे.
ऋग्वेद व अवेस्ता मधील साम्य काय?
भारत व इराण यांच्यात प्राचीन काळापासून संबंध आहेत. या संबंधांचा परिणाम दोन्ही देशांतील समाज व संस्कृतीवर झाल्याचे दिसून येते. प्राचीन इराणमधील झोरोस्ट्रियन धर्माचा अवेस्ता हा धर्मग्रंथ आणि प्राचीन भारतातला ऋग्वेद यांमधील काही शब्दांमध्ये साम्य आढळते. तसेच इराणमधील फारशी भाषेचा भारतीय भाषांवर प्रभाव पडल्याचे दिसून येते. मध्ययुगीन भारतात प्रशासन, साहित्य आणि संस्कृतीत फारशी भाषेचा मोठा प्रभाव होता.
संस्कृत व अवेस्तान भाषा मिळतीजुळती?
प्राचीन भारतातील संस्कृत व प्राचीन इराणमधील अवेस्तान या भाषांमध्येही मोठ्या प्रमाणात साम्य आहे. शेती, भूगोल, विधी आणि धर्म यांच्याशी संबंधित शब्दांमध्ये या दोन्ही भाषांमध्ये साम्य आढळून येते. वैदिक शब्द असुर हा इराणमधील अहुरा या शब्दाशी मिळताजुळता आहे. अवेस्तान भाषेत वैदिक संस्कृतीतील सोमाला होमा, यज्ञाला यसना म्हणून ओळखले जाते. तसेच यम, वरूण आणि मित्रा यांच्याशी मिळतेजुळते देवता किंवा राजांचा उल्लेख प्राचीन इराणमधील साहित्यांत आढळतो. भारत व इराण यांच्यात देवाणघेवाण तसेच सांस्कृतिक संबंध फार पूर्वीपासून होते याचे काही पुरातत्वीय पुरावे इराण, बलुचिस्तान व भारताच्या वायव्य भागात मिळाले आहेत.
इराणमधील स्थापत्यशास्त्र
इसवी सन पूर्व ५५० ते ३३० (२३५५ ते २५७५ वर्षांपूर्वी) या कालखंडात इराणमध्ये अकेमेनिड कालखंड (अकेमेनिड साम्राज्य) होता. या कालखंडापासूनच भारत व इराण यांच्यात संबंध असल्याचे आढळून येते. त्यावेळी गांधार व सिंद हा भाग दारीयस साम्राज्याचा भाग होता. याच दारियस साम्राज्यात राजाच्या सैन्यात भारतीय सैनिक होते, असा उल्लेख काही शिलालेखांमध्ये मिळतो. तसेच भारत व इराणमध्ये व्यापारी संबंध होते, असाही उल्लेख दिसून येतो. मौर्य साम्राज्यातील कला व स्थापत्यशास्त्रावर प्राचीन इराणमधील अकेमेनिड पंरपरेचा प्रभाव दिसून येतो, असे इतिहासकारांकडून सांगितले जाते. पॉलिश केलेले दगडी खांब व स्मारके यांवर अकेमेनिड परंपरेतील स्थापत्यशास्त्राचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजकीय, व्यापारी व कलात्मक देवाणघेवाण ऐतिहासिक कालखंडापासून होत होती.
मुघल कालखंडात इराणशी संबंध कसे दृढ झाले?
मध्ययुगीन काळात भारत व इराण यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले होते. मुघल कालखंडात भारताचा इराणशी अत्यंत जवळून संबंध आला. मुघलांच्या काळात इराणच्या फारशी भाषेचा वापर भारतीय उपखंडात वाढला होता. भारतातल्या वास्तुकला व नागरी संस्कृतीतही इराणी प्रभाव दिसून येतो. वास्तुकलेतील कमान, घुमट, ऐवान, पिशताक आणि चारबाग उद्यान पद्धत इराण व मध्य आशियातून भारतात आली. दिल्लीतील हुमायूनची कबर, फत्तेपूर सिक्री, काश्मीरमधील उद्याने आग्रा येथील वास्तू व ताजमहाल या सर्वांमधून इराणी व भारतीय वास्तुकलेचा संगम दिसून येतो. इराणी विद्वान, प्रशासक, वैद्य, सुलेखनकार (कॅलिग्राफर्स), चित्रकार, धातूकाम करणारे कारागीर आणि धार्मिक गुरू यांनी भारतात येऊन मुघलांच्या दरबारात मानाचे स्थान मिळवले होते. पर्शियातून भारतात झालेल्या या स्थलांतरामुळे फारसी संस्कृतीचा प्रभाव भारतातील विविध क्षेत्रांवर पडला. इराणमधील कोम, इस्फहान आणि ताबरिझ येथून उत्तम रेशीम व लोकरपासून तयार झालेल्या सतरंज्या भारतात आयात केल्या जात असे.
फारशी भाषा व दोन्ही देशांमधील व्यापार
भारत व इराण दरम्यान मोठ्या प्रमाणात वस्तूंची देवाणघेवाण तसेच व्यापार होत असे. पर्शियन विद्वान, सुलेखनकार, चित्रकार, सचिव, धर्मशास्त्रज्ञ, वैद्य आणि साहित्यिक यांनी भारतात प्रवेश केला आणि त्यांना शाही सेवेत राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे भारतात पर्शियन भाषेतील कविता, नीतिशास्त्र, इतिहास, सुफी साहित्य आणि राजकीय व्यवस्थेवरील पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. त्याचा प्रभाव भारतीय भाषांवर पडला. भारतातून कापड, मसाले, साखर, नीळ (निळा रंग तयार करण्यासाठी वापरली जाणारी एक वनस्पती) आणि मौल्यवान रत्ने यांची इराणमध्ये निर्यात केली जात असे. त्याबदल्यात इराणमधून भारतात घोडे, धातु, सुका मेवा, रेशीम, महागडी वस्त्रे, काचेचे भांडे, शस्त्रे व सुशोभीकरणाच्या वस्तू आयात केल्या जात. फारसी भाषेतील पुस्तके, कविता, तत्वे, इतिहास, तत्वज्ञान आणि सुफीझमशी संबंधित साहित्य भारतात मोठ्या प्रमाणात आयात केले जात.
