Ancient Indian maritime trade at Hormuz Strait: सध्या इराण-अमेरिका इस्राएल यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझमार्गे होणारा भारतीय व्यापार आणि त्यावर होणारा परिणाम हा चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु, होर्मुझ आणि भारतीय व्यापार यांच्यातील संबंध आजचा नाही. मध्ययुगीन कालखंडात हिंदी महासागरातून होणार्‍या व्यापारात गुजरातमधल्या व्यापार्‍यांचा महत्त्वाचा वाटा होता तसेच या व्यापार्‍यांची वस्ती इराणच्या किनारी बंदरांवर असल्याचे ठोस पुरातत्त्वीय आणि साहित्यिक पुरावे उपलब्ध आहेत. १३ व्या शतकातील गुजरातच्या कच्छमधील जैन व्यापारी स्वतःच्या जहाजांच्या ताफ्यासह पर्शिया (इराण), अरबस्तान आणि आफ्रिकेपर्यंत पश्चिमेकडे व्यापार करत होते. या व्यापारामार्फत केवळ आर्थिक देवाणघेवाण नाही तरी सांकृतिक देवाणघेवाणही झाली. त्याच प्रदीर्घ व्यापारी इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

व्यापाराच्या प्राचीनतेचे भक्कम पुरावे

इतिहासकार राधिका शेषन सांगतात की, ही सागरी व्यापाराची साखळी गुजरातपासून मकरान किनारपट्टीपर्यंत, पर्शियन आखाताच्या प्रवेशद्वाराभोवती आणि पुढे पश्चिमेला तांबड्या समुद्रापर्यंत (Red Sea) पसरलेली होती. या व्यापाराची नेमकी व्याप्ती आणि त्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख याबद्दल पूर्ण खात्री नसली, तरी या व्यापाराच्या प्राचीनतेचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील ‘तमिळ-ब्राह्मी’ लिपीतील कोरीव काम सोकोट्रा बेटावर (अॅबिसिनिया म्हणजेच आजच्या इथियोपियाच्या किनारपट्टीजवळ) सापडले आहे.”

होर्मुझ प्रमुख व्यापारी केंद्र

या विस्तीर्ण व्यापारी विश्वात होर्मुझ हे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले. १३ व्या शतकापासून त्याचे महत्त्व सातत्याने वाढत गेले आणि १६ व्या शतकात सफाविद साम्राज्याच्या काळात ते एक अत्यंत महत्त्वाचे सामरिक केंद्र ठरले. विशेष म्हणजे, या संपूर्ण कालखंडातील इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर भारतीय व्यापाऱ्यांचे अस्तित्व प्रकर्षाने दिसून येते.

१०० हून अधिक हिंदू व्यापारी

जेम्स ओनले यांच्या ‘द पर्शियन गल्फ इन मॉडर्न टाइम्स’ (२०१४) या पुस्तकात म्हटले आहे की, “पर्शियन आखाताचे भारताशी असलेले व्यापारी संबंध अत्यंत प्राचीन काळापासून आहेत. याचे पुरावे आजही आखाती देश, इराक आणि इराणमधील (इसवी सन पूर्व २३०० ते १०००-कांस्ययुग) उत्खननात आणि तिथल्या संग्रहालयांत सापडणाऱ्या असंख्य भारतीय वस्तूंवरून मिळतात.” ताम्रपाषाणयुगापासून भारतीय व्यापाऱ्यांचे अस्तित्त्व आखातात दिसत असले, तरी तेथील भारतीय समुदायाचा सर्वात जुना ऐतिहासिक उल्लेख इसवी सन ९१६ मधील एका पुस्तकात आढळतो. अरब इतिहासकार अबू झैद हसन यांनी इराणच्या ‘सिराफ’ या दक्षिण बंदरावर १०० हून अधिक हिंदू व्यापारी राहत असल्याचा संदर्भ दिला आहे.

सिंधू संस्कृतीपासून व्यापारी संबंध

इतिहासकार छाया गोस्वामी सांगतात की, “भारत आणि पर्शियन/ अरब आखाती प्रदेशातील सागरी संबंध सिंधू संस्कृतीच्या (इसवी सन पूर्व २५००-१५००) काळापासून आहेत. खंबातच्या आखाताच्या मुखाशी असलेले लोथल हे बंदर त्या काळातील सागरी हालचालींचे एक महत्त्वाचे केंद्र होते. सम्राट दरायस प्रथम याच्या ‘नक्श-ए-रोस्तम’ येथील शिलालेखानुसार गुजरात हा त्याच्या साम्राज्याचा थेट भाग नसला, तरी अकिमेनिड कालखंडात पर्शियन आखात आणि गुजरातच्या बंदरांमध्ये सागरी व्यापार भरभराटीला आला होता, याचे प्रबळ पुरावे आहेत.”

जगडूचरित: जगडूशा आणि पर्शियन व्यापार

१३ व्या शतकातील ‘जगडूचरित’ या काव्यग्रंथातून व्यापारी जगडूशा यांच्या पर्शियन जलक्षेत्रातील व्यापारावर प्रकाश पडतो. या ग्रंथात पर्शियन आखातातील ‘होर्मुझ’ बंदराचा स्पष्ट उल्लेख आहे. कच्छमधील भद्रेश्वर येथील व्यापारी ‘जगडूशा दातार’ यांचा होर्मुझशी मोठा व्यापार चालत असे आणि तिथला कारभार पाहण्यासाठी त्यांनी ‘जयंतसिंह’ नावाचा एक भारतीय प्रतिनिधी (Agent) तिथे तैनात केला होता याची माहिती मिळते. तसेच, एका शिलालेखात होर्मुझ येथील एका ‘नाखुदा’चा (जहाज मालक) उल्लेख आढळतो, हा व्यापारी व्यापारासाठी सोमनाथ येथे आला होता. हे दोन्ही प्रदेशांतील सक्रिय सागरी आणि सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे.

व्यापारापलीकडचे ऋणानुबंध आणि होर्मुझचा सुवर्णकाळ

इतिहासकार छाया गोस्वामी पुढे सांगतात की, “होर्मुझमधील जगडूशांचे व्यापारी भागीदार नियमितपणे भद्रेश्वरला (कच्छ) येत असत आणि जगडूशांनी त्यांच्या धार्मिक विधींसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली होती. हे त्यांच्यातील परस्परपूरक संबंध दर्शवते; व्यापारी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जगडूशांवर अवलंबून होते, तर जगडूशा त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करत असत.”

१४ व्या आणि १५ व्या शतकाच्या सुरुवातीला, होर्मुझ हे हिंदी महासागर आणि पर्शियन आखात क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी सागरी केंद्र म्हणून नावारूपास आले. महंमद बागेर वोसुघी यांच्या ‘द पर्शियन गल्फ इन हिस्ट्री’ (२००९) या पुस्तकात म्हटले आहे की, “होर्मुझ हे पूर्वेकडील असे एकमेव शहर होते जिथे आर्थिक घडामोडींना राजकीय स्वातंत्र्याची जोड मिळाली होती. येथील राजा, व्यापारी आणि प्रशासकीय व्यवस्था यांनी परस्पर सहकार्याने व्यापाराला मोठी चालना दिली.”

मार्को पोलोचे वर्णन: भारताकडून येणारी जहाजे

१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात मार्को पोलोने होर्मुझचे वर्णन एक गजबजलेले बंदर म्हणून केले आहे. त्याच्या प्रवासवर्णनानुसार, भारताकडून कापड, मसाले आणि चैनीच्या वस्तूंनी भरलेली जहाजे येथे येत असत. तो लिहितो, “भारतातून व्यापारी येथे मसाले, मौल्यवान रत्ने, मोती, रेशमी आणि सोन्याची जर असलेली वस्त्रे, हस्तिदंत आणि इतर अनेक माल घेऊन येतात. ते हा माल होर्मुझच्या व्यापाऱ्यांना विकतात आणि तेथून हा माल पुन्हा जगभर विक्रीसाठी पाठवला जातो.”

आखाती व्यापारातील भारतीय वर्चस्व

आखातात तेलसाठे सापडण्यापूर्वीच्या काळात तेथील अनेक भारतीय हे व्यापारी किंवा व्यापारी कुटुंबातील सदस्य होते. जेम्स ओनले यांनी व्यापर्‍यांच्या सात प्रमुख गटांविषयी माहिती दिली आहे. यात बनिया (हिंदू आणि जैन); खोजा, लवातिया, बोहरा आणि मेमण (मुस्लिम); आणि कॅथोलिक व अँग्लिकन (ख्रिश्चन) यांचा समावेश होत होता. यातील बहुतांश व्यापारी राजस्थान, नैऋत्य पंजाब, सिंध, कच्छ आणि गुजरात या आखाताच्या जवळ असलेल्या पाच प्रदेशांतील होते. १० व्या ते १६ व्या शतकाच्या दरम्यान, आखातातील भारतीयांमध्ये जामनगर, पोरबंदर, दीव आणि खंबात येथील गुजराती जैन व्यापाऱ्यांचे (श्रावक) वर्चस्व होते. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आखातातील भारतीयांमध्ये यांची संख्या सर्वाधिक होती. ओनले लिहितात की, “होर्मुझ बेटावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांची सुमारे २००० गुजराती कुटुंबे राहत होती, त्यामुळे या शहराला एखाद्या भारतीय शहराचे स्वरूप प्राप्त झाले होते.”

व्यापारी वस्तूंची देवाणघेवाण

होर्मुझमार्गे इराण आणि भारतादरम्यान अन्नपदार्थ, सुगंधी द्रव्ये, औषधी वनस्पती, खनिजे, विविध धातू, कापड आणि दागिन्यांची वाहतूक होत असे. भारत प्रामुख्याने तांदूळ, डाळी, गहू आणि तेल यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांची निर्यात करत असे. या वस्तूंना तिथे मोठी मागणी होती. तसेच, पश्चिम भारतातील प्रसिद्ध कच्चा कापूस देखील पश्चिम आशियाई बाजारपेठांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता.

व्यापाराचे संतुलन: घोडे, मोती आणि चलन

हा व्यापार केवळ एकतर्फी नव्हता. भारतासाठी मौल्यवान धातू (सोने-चांदी), लोकरीचे कापड आणि घोडे हे मुख्य आकर्षणाचे विषय होते. इतिहासकार छाया गोस्वामी यांच्या ‘ट्रान्सरिजनल ट्रेड अँड ट्रेडर्स’ (२०१९) या पुस्तकात म्हटले आहे की, “पश्चिम आशियातून येणाऱ्या मालामध्ये मद्य, रेशीम, गालीचे, गुलाबपाणी आणि औषधी डिंक यांसारख्या दुर्मिळ वस्तूंमुळे हा व्यापार अधिक फायदेशीर ठरत असे. मात्र, या संपूर्ण व्यापाराचा मुख्य आधार ‘बुलियन’ (मौल्यवान धातू/ चलन) हाच होता.” १५४० च्या दशकात, होर्मुझला मिळणाऱ्या एकूण सीमाशुल्क महसुलापैकी (Customs Revenue) तब्बल ४६ टक्के वाटा भारतातून येणाऱ्या आयातीचा होता, असे ओनले नमूद करतात. विशेष म्हणजे, होर्मुझमध्ये ‘बंसार’ (bangsar) नावाचे एक सीमाशुल्क कार्यालय होते. हा शब्द हिंदी भाषेतील ‘भंडार’ (कोठार) या शब्दापासून तयार झाला आहे, असे वोसुघी सांगतात. पोर्तुगीज इतिहासकारांनीही खंबात, कालिकत, बंगाल आणि मलाक्का येथील इराणच्या व्यापाऱ्यांच्या सक्रिय सहभागाचा उल्लेख केला आहे.

मोती, घोडे आणि गुलाम

पर्शियन आखातातून होणारी सर्वात महत्त्वाची निर्यात म्हणजे मोती, घोडे आणि खजूर ही होती. भारतीय व्यापारी हे सर्व साहित्य खरेदी करून भारतात आणत आणि तिथून ते जागतिक बाजारपेठेत विकले जाई. या व्यापारामुळे आणि आखातातील कर्ज बाजारपेठेवर (Credit Market) भारतीयांचे वर्चस्व असल्यामुळे, भारतीय बंदरे ही आखातासाठी ‘बँकिंग केंद्रे’ ठरली होती.

वोसुघी यांच्या मते, “आफ्रिकन आणि भारतीय गुलामांची होर्मुझमध्ये होणारी आयात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतात होणारी घोड्यांची निर्यात यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.” दक्षिण भारताचे हवामान घोडे पैदास करण्यासाठी पोषक नसल्यामुळे, उत्तर दख्खनमधील बहमनी राजे आणि विजयनगरचे हिंदू राजे हे होर्मुझच्या घोड्यांचे नियमित गिऱ्हाईक होते. एका घोड्याची किंमत ३०० अशरफींपर्यंत (सुमारे ३२० रीस) असायची. “१५०६ मध्ये सुमारे ३,००० घोड्यांची भारतात निर्यात झाली, तर ही संख्या १५६७ मध्ये वाढून १०००० पर्यंत पोहोचली.” गुजरात हे आपल्या भौगोलिक स्थानामुळे होर्मुझसाठी घोड्यांच्या व्यापारातील सर्वात मोठा भागीदार बनले होते.

व्यापाराची रणनीती: घोड्यांचा व्यापार आणि मानवी संसाधने

मार्को पोलोने एका अत्यंत रंजक आणि धूर्त रणनीतिचा उल्लेख केला आहे. आखाती व्यापाऱ्यांनी घोड्यांच्या डॉक्टरांना (अश्ववैद्य) भारताकडे प्रवास करण्याची परवानगी नाकारली होती. यामुळे दरवर्षी भारतात मोठ्या संख्येने घोडे दगावत असत आणि पर्यायाने घोड्यांची मागणी सातत्याने टिकून राहत असे. जेम्स ओनले लिहितात की, “या घोड्यांच्या व्यापाराने रशियन प्रवासी अफनासिओ निकितिन यांसारख्या छोट्या व्यापाऱ्यांनाही आकर्षित केले होते, ज्याने आपले घोडे घेऊन एका छोट्या ‘तवा’ (tava) बोटीतून होर्मुझहून भारताकडे प्रयाण केले होते.”

या दोन प्रदेशांतील व्यापारात गुलामांचाही समावेश होता. त्यांना प्रामुख्याने सैन्य दलात किंवा सेवक म्हणून नियुक्त केले जाई. उत्तम रोजगाराच्या संधी आणि आर्थिक परिस्थितीच्या शोधात अनेक इराणी तरुण विविध प्रांतांतून भारताकडे येत असत. वोसुघी यांच्या नोंदीनुसार, एकट्या दख्खनमध्ये सुमारे १०,००० ते १२,००० इराणी योद्धे तैनात होते. मानवी संसाधनांशिवाय, भारताच्या लष्करी व्यवहारांत लागणारी युद्धसामग्री आणि उपकरणे देखील होर्मुझमधून आयात केली जात असत.

मोत्यांचा व्यापार आणि भारतीय वर्चस्व

आखातातील भारतीयांचा आणखी एक महत्त्वाचा गट म्हणजे मोत्यांचे व्यापारी. मे ते ऑक्टोबर या उन्हाळ्यातील मोत्यांच्या हंगामात भारतीय व्यापारी आखातातील प्रमुख केंद्रांना भेटी देत असत. यामध्ये प्रामुख्याने बहरीन आणि पोर्तुगीज कालखंडात इराणमधील होर्मुझ व बंदर कोंग, तसेच जुल्फार (आजचे रास अल-खैमाह) यांचा समावेश होता. येथे ते अरबी आणि पर्शियन व्यापाऱ्यांकडून मोत्यांची खरेदी करत असत.

पोर्तुगीज युगातील होर्मुझ: संपत्ती आणि सामर्थ्य

  • १५ व्या शतकात, पोर्तुगीजांच्या आगमनाच्या काही काळ आधी, होर्मुझचे स्थान इतके उंचावले होते की, त्याच्या श्रीमंतीच्या ख्यातीने युरोपियनांना भुरळ घातली होती. वोसुघी लिहितात की, “इराणी, अरबी, भारतीय किंवा आफ्रिकन अशा विविध क्षेत्रांतील व्यापारी एका शांततापूर्ण वातावरणात येथे व्यवहार करत असत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १५ व्या शतकातील होर्मुझची अर्थव्यवस्था आणि समाज हा ‘बहुराष्ट्रीय’ स्वरूपाचा होता.”
  • इतिहासकार राधिका शेषन सांगतात, होर्मुझकडे स्वतःची नैसर्गिक संसाधने नव्हती. म्हणूनच पोर्तुगीजांनी त्याचे वर्णन ‘ओसाड खडक’ (barren rock) असे केले होते. तरीही, त्यांच्या नियंत्रणाखाली या बेटाचे धोरणात्मक आणि सामरिक महत्त्व अफाट वाढले.
  • १६ व्या शतकाच्या सुरुवातीला होर्मुझला भेट देणाऱ्या सुरुवातीच्या पोर्तुगीजांपैकी टोमे पिरेस (Tomé Pires) लिहितो, “या शहराला सुंदर तटबंदी आणि गच्ची असलेली घरे आहेत; येथे सुंदर मनोरे आणि एक किल्ला आहे. हे आशियातील चार मोठ्या शहरांपैकी एक आहे…”


Portuguese household in Hormuz
Portuguese household in Hormuz

बनिया समुदाय, पोर्तुगीज वर्चस्व आणि बदलती सत्ताकेंद्रे

१६ व्या आणि १७ व्या शतकातील पर्शियन आखाताचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील बहुतांश भारतीय हे गुजरातमधील होते. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुजराती शब्द ‘वणियो/वाणियो’ वरून अरबांनी ‘बनिया’ हा शब्द स्वीकारला. पुढे १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी आणि १७ व्या शतकात इंग्रज, डच व फ्रेंचांनीही हाच शब्द वापरण्यास सुरुवात केली. यातील काही अतिश्रीमंत बनिया व्यापारी ‘सराफी’चा (sarrafin) व्यवसाय करत असत, म्हणजेच ते अरबी आणि पर्शियन मुस्लिमांना कर्ज आणि पतपुरवठा करत असत.

पोर्तुगीज नियंत्रण आणि गुजराती व्यापाऱ्यांची रणनीति

पोर्तुगीजांच्या उपस्थितीने व्यापारी वर्गासमोर नवीन आव्हाने उभी केली. दिवंगत प्राध्यापक आशिन दास गुप्ता यांच्या मते, “गुजराती व्यापारी आपली व्यावसायिक प्रगती करत होते, परंतु त्यांनी पोर्तुगीजांशी नेहमीच संघर्ष केला असे नाही.” जेव्हा अपरिहार्य असे तेव्हा ते पोर्तुगीज नियंत्रण स्वीकारत आणि जिथे शक्य असेल तिथे पोर्तुगीज नियमांचे उल्लंघन करत. या रणनीतीचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कार्ताझ’ (Cartaz) ही नौदल व्यापार अनुज्ञप्ती (licence). “एखादे गुजराती जहाज सामान्यतः पोर्तुगीज कार्ताझ जवळ बाळगत असे, परंतु एकदा का जहाज खुल्या समुद्रात गेले की, ते कार्ताझमधील अटींचे पालन करेलच याची खात्री नसे. १६ व्या शतकातील पोर्तुगीजांविरुद्धची हीच गुजराती व्यापाऱ्यांची मुख्य कार्यपद्धती होती.”

होर्मुझचा पाडाव आणि बंदर अब्बासचा उदय

इतिहासकार राधिका शेषन यांच्या मते, १६२२ मध्ये इंग्रज आणि सफाविद (इराण) यांच्या संयुक्त फौजांनी होर्मुझवर हल्ला करून ते बंदर जिंकून घेतले. यानंतर होर्मुझ पूर्णपणे सफाविंदांच्या नियंत्रणाखाली आले. जरी होर्मुझचे महत्त्व टिकून राहिले, तरी पोर्तुगीजांच्या काळातील त्याचे भू-राजकीय महत्त्व काहीसे कमी झाले. या बदलावामुळे होर्मुझमधील भारतीय समुदाय जवळच असलेल्या बंदर अब्बास आणि मस्कतकडे वळला. १६७० पर्यंत बंदर अब्बासची लोकसंख्या वाढून तिथे सुमारे १४०० ते १५०० घरे झाली होती. त्यापैकी एक तृतीयांश घरे भारतीयांची, विशेषतः बनिया व्यापाऱ्यांची होती.

व्यापाराच्या बदलत्या दिशा

  • प्राध्यापक दास गुप्ता लिहितात की, “१६२० च्या दशकात पोर्तुगीज होर्मुझचा पाडाव आणि बंदर अब्बासची स्थापना झाल्यामुळे पर्शियन आखात कोरोमंडल किनारपट्टीवरील (भारताचा पूर्व किनारा) व्यापाऱ्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक खुले झाले.” तसेच १६३०-३२ दरम्यान गुजरातमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे व्यापाऱ्यांनी इतर क्षेत्रांत आपली व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली.
  • छाया गोस्वामी यांच्या मते, कालांतराने बसरा (आजचा इराक), बुशहर आणि बंदर अब्बास (आजचा इराण) ही पर्शियन आखातातील तीन मुख्य बंदरे म्हणून उदयास आली. ही बंदरे या संपूर्ण प्रदेशातील सागरी व्यापाराच्या मुख्य ‘धमन्या’ ठरली.

बंदर अब्बासचा अस्त आणि मस्कतचा उदय

छाया गोस्वामी यांच्या संशोधनानुसार, गोमरून/ बंदर अब्बास या बंदराचा इतिहास अत्यंत वेधक आहे. एकेकाळी हे अत्यंत वैभवशाली बंदर होते, परंतु १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याचे महत्त्व कमालीचे घटले. युरोपीय सत्तांनी तिथून माघार घेतली होती आणि १७४७ मध्ये नादिर शाहच्या मृत्यूनंतर पसरलेल्या गोंधळामुळे आखातातील सत्तेचे आणि व्यापाराचे संतुलन पूर्णपणे बदलले. पुढे १७७९ मध्ये इराणच्या झंद घराण्यातील करीम खान झंदच्या मृत्यूनंतर पर्शियन नियंत्रण अधिकच कमकुवत झाले आणि देश यादवी युद्धात ओढला गेला. याचा परिणाम म्हणून बंदर अब्बास, बुशहर आणि बसरा या तिन्ही प्रमुख बंदरांच्या वैभवाला उतरती कळा लागली.

१८ व्या शतकाच्या अखेरीस, आखातातील बंदरे, बेटे आणि किनारपट्टीच्या भागांवरून पर्शियन शाहची पकड सुटली होती. गोस्वामी म्हणतात, “राजकीय नोंदींनुसार सत्ता कमकुवत झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशा अशांत काळात मस्कत ही नवी सत्ता उदयास येत होती.” आखाती प्रदेश हा संघर्षाचा आखाडा बनला होता, जिथे अरबी सत्तांनी सामुद्रधुनी आणि सागरी व्यापारावर नियंत्रण मिळवण्यात आघाडी घेतली होती.

धोरणात्मक ‘चोकपॉइंट्स’ (Chokepoints) आणि व्यापाराचे महत्त्व

राधिका शेषन म्हणतात, “समुद्रातील अरुंद मार्ग (Narrow channels) नेहमीच धोरणात्मकदृष्ट्या जोखमीचे असतात. हे मार्ग व्यापारासाठी मुख्य दुवे (Pivotal chokepoints) ठरतात, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते.” तरीही, त्यांनी आठवण करून दिली की, जमिनीवरील वाहतुकीपेक्षा सागरी वाहतूक आजही खूप स्वस्त आहे; जमिनीवरून केली जाणारी वाहतूक महागडी तर असतेच, पण त्यात माल पोहोचण्यास उशीर होतो किंवा वाहतूक कार्यक्षमतेने होत नाही. त्या पुढे म्हणतात, “जागतिक व्यापार आणि जागतिक वेग टिकवून ठेवण्यासाठी सागरी मार्ग खुले असणे अत्यावश्यक आहे. इतिहास आपल्याला वारंवार शिकवतो, तरीही आपण ते विसरतो. कदाचित सत्तेत बसलेले लोक हा धडा विसरत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की, या ‘चोकपॉइंट्स’वर ताबा मिळवून ते संपूर्ण व्यापारावर आपली मक्तेदारी निर्माण करू शकतात.”