भारत आणि पर्शिया (आजचा इराण) यांच्यातील संबंधांची पाळेमुळे प्रागैतिहासिक काळातील मानवी स्थलांतरापर्यंत पोहोचतात; म्हणजेच लिखित इतिहास सुरू होण्याच्या खूप आधीपासून हे दोन्ही प्रदेश एकमेकांशी जोडलेले होते. जनुकीय (Genetic) आणि पुरातत्त्वीय पुराव्यांवरून असे दिसून येते की, सुमारे १०,००० वर्षांपूर्वी प्राचीन इराणी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले लोकसमुदाय पूर्वेकडे भारतीय उपखंडात आले आणि त्यांनी येथील आधीपासून राहणाऱ्या शिकारी व अन्न गोळा करणाऱ्या (Forager) स्थानिक समुदायांबरोबर संवाद व देवाणघेवाण सुरू केली.

संस्कृतीची देवाणघेवाण

या सुरुवातीच्या टप्प्याने (मानवी स्थलांतराच्या) पुढील काळात हडप्पा संस्कृतीचा भाग ठरलेल्या प्रदेशांमधील शेती, मानवी वस्त्यांचे स्वरूप आणि धार्मिक/ सांस्कृतिक जीवनपद्धतीला एक निश्चित आकार दिला. पुढे कांस्ययुगात (सुमारे इ.स.पूर्व ३००० ते १५००) इराणी पठार आणि मेसोपोटेमियातील विविध प्रदेशांशी सिंधू संस्कृतीचे व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. यात अफगाणिस्तानमधील ‘शॉर्तुगाई’ सारख्या ठिकाणांनी मध्यस्थ (व्यापारी केंद्रे) म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली; तर लॅपिस लाझुली (एक मौल्यवान निळा खडा), कार्नेलियनचे मणी आणि कापड यांसारख्या वस्तूंची या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असे.

भाषेतील साम्य

भाषिक पुराव्यांवरूनही (अंदाजे इ.स.पूर्व २००० ते १५००; काही विद्वान हा जडणघडणीचा काळ थोडा आधी, म्हणजेच सुमारे इ.स.पूर्व २५०० पर्यंत मागे नेतात) भारत आणि इराण यांच्यातील सखोल ‘इंडो-इराणी’ संबंधांवर प्रकाश पडतो. इंडो- इराणी भाषांची पाळेमुळे एकच होती. हे संस्कृत आणि अवेस्तन (प्राचीन इराणी भाषा) या भाषांमधील साम्यावरून स्पष्टपणे दिसून येते. तसेच, मित्र (Mithra) आणि वरुण (अहुरा या संकल्पनेशी संबंधित) यांसारख्या देवतांच्या संकल्पनांमधून, दोन्ही संस्कृती वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमध्ये विभागल्या जाण्यापूर्वी त्यांचे विश्वरचनाशास्त्र (Cosmological ideas) एकच होते, हे सिद्ध होते.

भारतातील ‘वैदिक धर्म’ आणि इराणमधील ‘झोरास्ट्रियन’

या सामायिक ‘इंडो-इराणी’ मुळांमधूनच पुढे भारतातील ‘वैदिक धर्म’ आणि इराणमधील ‘झोरास्ट्रियन’ (पारशी) परंपरांचा उदय झाला. भारतातील ‘देव’ आणि ‘असुर’ यांच्यातील विरोध आणि याउलट इराणमधील ‘अहुरा’ आणि ‘दैव’ या संकल्पनांमधील संघर्ष, हा एका ‘धार्मिक-तात्विक उलटफेर’ (Theological Inversion) दर्शवतो; जो बहुधा या दोन्ही संस्कृती एकमेकांपासून वेगळ्या होत असतानाच्या सुरुवातीच्या काळात आकाराला आला असावा. (यात रंजक बाब अशी की, भारतात ‘देव’ पूजनीय आणि ‘असुर’ दुष्ट मानले गेले, तर तिथे इराणमध्ये ‘अहुरा/ अहूर’ हे सर्वोच्च पूजनीय देव ठरले आणि ‘दैव’ हे दुष्ट प्रवृत्तीचे मानले गेले.)

भारत आणि इराणमधील राजकीय संबंध

इ. स. पूर्व पहिल्या सहस्रकामध्ये (First Millennium BCE), भारत आणि इराणमधील राजकीय संबंध अधिक स्पष्टपणे समोर आले. इ.स.पूर्व ६ व्या शतकात वायव्य भारताचा काही भाग डॅरिअस प्रथम (Darius I) याच्या अखत्यारीत असलेल्या अकेमेनिड (Achaemenid) साम्राज्याचा भाग झाला. या काळात गांधार आणि सिंध सारखे प्रदेश इराणचे ‘सत्रपी’ (Satrapies) म्हणून जोडले गेले. ‘सत्रपी’ म्हणजे प्रांतीय गव्हर्नर किंवा राज्यपालांच्या (त्यांना पर्शियन भाषेत ‘सत्राप’ म्हटले जात असे) नियंत्रणाखाली असलेला प्राचीन प्रांतीय प्रदेश किंवा राज्य होय.

पर्शियन सम्राट आर्य तर भारताचा उल्लेख ‘हिंद’

करप्रणालीसह पर्शियन (इराणी) प्रशासकीय पद्धती आणि ‘अरमाइक’ (Aramaic) लिपीच्या वापरामुळे तत्कालीन स्थानिक राज्यकारभारावर मोठा प्रभाव पडला. पर्शियन साम्राज्याच्या प्रसिद्ध ‘बेहिस्तून’ (Behistun) शिलालेखात भारतीय भूप्रदेशांचा समावेश थेट त्यांच्या साम्राज्य विस्ताराचा भाग म्हणून करण्यात आला होता. विशेष म्हणजे, याच ऐतिहासिक शिलालेखात पर्शियन सम्राटाने स्वतःचा उल्लेख ‘आर्य’ (Arya) असा केला होता आणि भारताचा उल्लेख ‘हिंद’ (Hind) असा केला होता.

भारत ते भूमध्य समुद्र व्हाया मध्य आशिया

या टप्प्याने भारताला भूमध्य समुद्रापासून (Mediterranean) ते थेट मध्य आशियापर्यंत पसरलेल्या एका विस्तीर्ण साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडले. अकेमेनिड (Achaemenid) साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर, पुढील काळातील संबंध हे थेट राजकीय राजवटीपेक्षा व्यापारी देवाणघेवाण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून अविरतपणे सुरू राहिले. (विशेषतः इ.स.पूर्व ५०० नंतर) इराण हा भारताला घोडे पुरवणारा एक प्रमुख देश झाला; हे घोडे खुश्कीच्या (भूमी) तसेच सागरी मार्गाने भारतात आणले जात असत.

मुघल साम्राज्याने हे संबंध कसे अधिक दृढ केले?

इस्लामच्या प्रसाराबरोबर ‘पूर्व-मध्ययुगीन’ (Early Medieval) काळात पर्शियन संस्कृतीचा प्रभाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढला. ८ व्या शतकापासून पुढे, अरब आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांना नियमितपणे भेटी देण्यास सुरुवात केली. हळूहळू, भारतातील अनेक इस्लामिक राजदरबारांमध्ये ‘पर्शियन’ (फारसी) ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर उच्च संस्कृती आणि साहित्याची मुख्य भाषा ठरली.

सुफी संतांचे योगदान

दिल्ली सल्तनतने पर्शियन प्रशासकीय पद्धत (Bureaucratic models), साहित्यिक शैली आणि दरबारी शिष्टाचार (Court etiquette) यांचा स्वीकार केला. त्याच काळात, सुफी संतांनी (ज्यांचे मूळ पर्शिया म्हणजेच इराणशी जोडलेले होते) आध्यात्मिक विचारसरणीचा प्रसार केला, परिणामी इराणपासून भारतापर्यंतचे वेगवेगळे प्रदेश एकमेकांशी जोडले गेले.

मुघल साम्राज्याने हे संबंध आणखी दृढ केले. या साम्राज्याचा संस्थापक बाबर, त्याचे मूळ तैमुर (Timurid) आणि मध्य आशियाई परंपरेत होते, त्याचे पर्शियन संस्कृतीशी अतिशय जवळचे नाते होते. त्याच्या याच प्रभावामुळे मुघल राजदरबाराने ‘पर्शियन’ (फारसी) भाषेला आपली मुख्य भाषा म्हणून स्वीकारले. पुढे अकबरासारख्या सम्राटांच्या काळात पर्शियन साहित्य, मिनिएचर पेंटिंग (लघुचित्रकला) आणि वास्तुकला खऱ्या अर्थाने बहरली.

कलेवरील प्रभाव

मुघल सौंदर्यशास्त्राने (Aesthetic) पर्शियन घटकांची भारतीय प्रतीकांशी (Motifs) सुरेख सांगड घातली; त्यातून ‘चारबाग’ (चार भागांची बाग) आणि घुमट असलेले भव्य मकबरे यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला शैलींचा उदय झाला. येथील स्थानिक गरजांनुसार काही बदल केले गेले असले, तरी मुघल प्रशासकीय पद्धतींवरही पर्शियन परंपरांचा मोठा प्रभाव दिसून येतो.

आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण…

आर्थिकदृष्ट्या भारत आणि इराण (पर्शिया) यांच्यातील हे संबंध अरबी समुद्रातील सागरी व्यापाराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू राहिले. इराण आणि मध्य आशियातून आणलेल्या घोड्यांना भारतात मोठी मागणी होती, विशेषतः लष्करातील घोडदळासाठी (Cavalry) त्यांचा प्रामुख्याने वापर केला जाई. या बदल्यात, भारत कापड, मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने इराणला निर्यात करत असे.

सुरतेसारखी बंदरे मुघल भारत आणि सफाविद (Safavid) कालीन इराण, तसेच त्यापुढील जगाला जोडणारी प्रमुख व्यापारी केंद्रे (Hubs) ठरली. आर्मेनियन आणि पर्शियन लोकांसह विविध व्यापारी समुदायांनी हा व्यापार आणि देवाणघेवाण सुलभ करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

उर्दूचा विकास

सांस्कृतिक पातळीवर विचार केल्यास, पर्शियन संस्कृतीचा प्रभाव येथील साहित्य, संगीत आणि भाषेमध्ये खोलवर रुजला. याच सांस्कृतिक देवाणघेवाणीतून ‘उर्दू’ ही एक संपर्क भाषा (Contact language) म्हणून उदयास आली, ज्यात स्थानिक प्राकृत भाषा आणि पर्शियन भाषेचे शब्द व लिपी यांचा सुंदर संगम झाला होता. राजदरबारातील नोंदी ठेवणारे ग्रंथ (Court chronicles), काव्य आणि सुफी ग्रंथांनी दोन्ही देशांमध्ये एक सामायिक वैचारिक व बौद्धिक विश्व निर्माण केले.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची अनेक मुळे पर्शियन (इराणी) संगीत परंपरेत आढळतात. परंतु, ही देवाणघेवाण केवळ एकतर्फी नव्हती. भारताचे विचार आणि संकल्पनाही पश्चिमेकडे प्रवास करत गेल्या, त्यांनी तिथल्या सुफी/ गूढवादी (Mystical) परंपरा आणि व्यापार पद्धतींवर आपला प्रभाव पाडला.

एक नाट्यमय कलाटणी (A turning point)

१८ व्या शतकात, म्हणजेच इ.स. १७३९ मध्ये झालेल्या नादिरशाहच्या आक्रमणामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना एक नाट्यमय कलाटणी मिळाली. नादिरशाहने दिल्लीची मोठ्या प्रमाणावर लूट केली, मुघल सैन्याचा पराभव केला आणि ‘मयूर सिंहासन’ (Peacock Throne) व ‘कोहिनूर’ हिऱ्यासह अफाट संपत्ती तो आपल्याबरोबर घेऊन गेला.

या घटनेने भारत आणि इराणमधील दीर्घकालीन संबंध आणि त्याच वेळी बदलत चाललेले सत्तेचे संतुलन (Shifting balance of power) या दोन्ही गोष्टी अधोरेखित केल्या. आता पर्शिया हा भारतासाठी केवळ एक सांस्कृतिक प्रभाव उरला नव्हता, तर कमकुवत होत चाललेल्या मुघल सत्तेचा फायदा घेणारी एक आक्रमक लष्करी ताकद ठरला होता.

दोन्ही प्रदेशांमध्ये मोठे बदल झाले

प्रागैतिहासिक काळातील मानवी स्थलांतरापासून सुरू झालेला भारत-पर्शिया संबंधांचा हा प्रवास साम्राज्यांच्या संघर्षांपर्यंत निरंतर सुरू राहिला आणि काळाच्या ओघात विकसित होत गेला. सामायिक पूर्वज आणि व्यापारापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे राजकीय एकात्मता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सरतेशेवटी संघर्षाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला. हजारो वर्षांच्या या प्रवासात हे दोन्ही प्रदेश भूगोल, भाषा, व्यापार आणि एकमेकांच्या नवनवीन कल्पनांमुळे एकमेकांशी जोडलेले राहिले. त्यांनी एकमेकांवर असा प्रभाव पाडला की, काळानुरूप दोन्ही प्रदेशांमध्ये मोठे बदल झाले आणि कोणतेही क्षेत्र पूर्वीसारखे राहिले नाही.

विषयाशी संबंधित प्रश्न (Post-read questions)

१. कांस्ययुगापासून ते १८ व्या शतकापर्यंतच्या भारत-पर्शिया संबंधांच्या ऐतिहासिक उत्क्रांतीचा आढावा घ्या.

(Examine the historical evolution of India–Persia relations from the Bronze Age to the 18th century.)

२. भारत आणि पर्शिया यांनी व्यापार, संस्कृती, धर्म आणि साम्राज्यांच्या माध्यमातून एकमेकांना आकार दिला. चर्चा करा.

(India and Persia shaped each other through trade, culture, religion, and empire. Discuss.)

३. वैदिक आणि अवेस्तन परंपरांमधील भाषिक आणि धार्मिक साम्य हे सामायिक इंडो-इराणी वारसा कशा प्रकारे दर्शवते?

(How do linguistic and religious similarities between Vedic and Avestan traditions reflect a shared Indo-Iranian heritage?)

४. भूगोल आणि व्यापारी मार्गांनी भारत आणि पर्शिया यांच्यातील संवादाचा प्रदीर्घ इतिहास कशा प्रकारे घडवला, याची चर्चा करा.

(Discuss how geography and trade routes shaped the long history of interaction between India and Persia.)