भारत आणि जपान यांच्यातील सामरिक भागीदारी गेल्या काही वर्षांत वेगाने मजबूत झाली असली, तरी दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंधांत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. याचं ठळक उदाहरण म्हणजे, भारतात कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांची संख्या. भारतात सुमारे १,५०० जपानी कंपन्या कार्यरत आहेत, पण भारताच्या तुलनेत कमी आकाराची अर्थव्यवस्था असलेल्या थायलंडमध्ये हा आकडा ६,००० इतका आहे.

भारतामधील या १,५०० जपानी कंपन्यांपैकी अवघ्या १ टक्के कंपन्यांचा एकूण व्यवसायात निम्म्याहून अधिक वाटा आहे. विशेष म्हणजे, यामधील मोठा भाग वाहन उद्योगातून येतो. यामागे १९८०च्या दशकातील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनची भारताशी असलेली व्यावसायिक बांधिलकी हे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे वाहन उद्योगाचा विश्वास दृढ झाला.

दरम्यान, जपानमधील कॉर्पोरेट जगतात एक दशकाहून अधिक काळ राहून काम करणारे, त्याआधी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये समान काम केलेले कॉर्पोरेट व्यावसायिक, भारत आणि जपानमधील व्यापार, गुंतवणुकीच्या क्षमतेबाबत ठाम विश्वास व्यक्त करतात. ज्यांनी जपानी कंपनीच्या व्यवसायवृद्धीचे नेतृत्व केले आहे, ते देखील व्यावसायिक संबंधाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करतात.

जागतिक आव्हानांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असून वाढत्या अनिश्चिततेच्या काळातही भारत देश आपले स्थैर्य टिकवून आहे, त्यामुळे तो विश्वसनीय भागीदार आहे. हे जाणून पूर्वीपेक्षा अधिक जपानी कंपन्या आता भारतात व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अलीकडच्या काळात एक महत्त्वाचा बदल दिसून येत आहे. काही आघाडीच्या जपानी कंपन्या आता भारतातील व्यावसायिक संधींचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वाधिक सक्षम आणि अनुभवी जपानी कर्मचाऱ्यांना भारतात पाठवत आहेत. रिअल इस्टेट, तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि पोलाद उद्योगातील गुंतवणूकीकडे जपानी कंपन्या आकर्षित होत आहेत. याशिवाय, पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी भारत-जपानच्या स्वच्छ ऊर्जा भागीदारीसह विविध सहकार्य उपक्रमांना चालना दिली आहे. या सर्व प्रयत्नांचे फलित येत्या काही वर्षांत स्पष्टपणे दिसून येतील.

भारतात व्यवसाय करताना जपानी कंपन्यांची चिकाटी आणि त्यांचा दृढनिश्चय त्यांना स्पर्धेत टिकवून ठेवतो. परदेशी कंपन्यांना जपानमध्ये व्यवसाय करणे सोपे नाही, तितके जपानी कंपन्यांनाही भारतात व्यवसाय करणे सोपे नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत यश मिळवण्यासाठी ही जपानच्या ही दोन्ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. तसेच, भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि मजबूत भारत-जपान संबंध तयार करण्याचे कौशल्य जपानी कंपन्यांनी आत्मसात केले पाहिजे.

मारुती सुझुकी, रिलायन्स जिओ आणि इतर यशस्वी कंपन्यांचा आलेख पाहता एक गोष्ट स्पष्ट होते, भारतात यश मिळवायचे असेल, तर भारतीय परिस्थितीला अनुकूल अशा, ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादने आणि सेवा तयार करुन त्या प्रदान कराव्या लागतात. त्या दर्जेदार असण्यासोबतच किफायतशीर किमतीत त्या उपलब्ध व्हायला हव्यात.

मात्र, अनेक जपानी कंपन्या भारतातही जपानमधील व्यवसाय पद्धतीच लागू करण्याचा प्रयत्न करतात. उत्पादनांच्या डिझाइनबाबत असो किंवा ग्राहकांच्या मागण्यांना प्रतिसाद देण्याच्या गतीबाबत जपानी पद्धतीचाच अवलंब केला जातो. परिणामी, भारतीय कंपन्यांसह अधिक वेगाने निर्णय घेणाऱ्या आणि लवचिक प्रतिस्पर्धकांसमोर त्यांची पिछेहाट होते. त्यामुळे, ज्या देशात व्यवसाय करायचा आहे त्या देशाच्या बाजारपेठेतील बदलांशी जुळवून घेतले पाहिजे.

अनेक जपानी कंपन्यांना चीनमध्ये व्यवसाय करण्याची सवय झाली आहे. कारण चीनमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतांश सुविधा ‘रेडी-टू-यूज’ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातात. औद्योगिक भूखंड, बांधकाम कंत्राटदार, प्रशिक्षित मनुष्यबळ, विकसित पुरवठादारांचे जाळे आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र इथे भारतात परदेशी कंपन्यांना स्वतः पुढाकार घेऊन अनेक गोष्टी उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे सक्षम भारतीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या मदतीने व्यवसाय उभारणे हे स्पर्धात्मक ठरते पण तितकेच महत्वाचे असते.

भारतीय कंपन्या काय करू शकतात?

भारतात व्यवसाय करण्याबाबत जपानी कंपन्या जितक्या उत्सुक आहेत, भारतीय कंपन्या मात्र जपानमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी तितक्या उत्सुक नसतात. भारत सरकार, विविध राज्य सरकारे आणि उद्योग संघटना जपानी गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे पहिल्यांदाच भारतात गुंतवणूक करणाऱ्या जपानी कंपन्यांना अधिक ठोस मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्याची गरज भासत आहे. त्यासाठी केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता, उद्योग, तज्ज्ञ संस्था आणि इतर संबंधित घटकांचा सहभाग असलेली पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.

दुसरीकडे, भारतीय कंपन्यांनीही जपानकडे दीर्घकालीन भागीदार म्हणून पाहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांची टोकियोमध्ये कायमस्वरूपी कार्यालये नाहीत. इतकेच काय, तर स्थानिक सल्लागार नेमण्यातही टाळाटाळ होते. परिणामी, जपानी व्यावसायिक संस्कृती, तेथील कामकाजाची पद्धत आणि व्यवसायाच्या संधी याविषयी भारतीय कंपन्यांमध्ये पुरेशी समज विकसित होत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.