India Lockdown Rumors PM Modi Speech 2026 : २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर एकापाठोपाठ एक हल्ले सुरू केले. चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षाची धग अद्यापही कायम आहे. जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला असून, जागतिक बाजारात खनिज तेलासह नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याची आवई समाजमाध्यमांवर उठली आहे. त्याविषयीचा हा आढावा…
जगभरातील अनेक देशांवर ऊर्जा संकट
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जगभरातील अनेक देशांना खनिज तेलासह नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या पुढे गेले आहेत. भारतासह पाकिस्तान, चीन, जपान व दक्षिण कोरिया यांसारखे देश प्रामुख्याने खाडी असलेल्या देशांतील खनिज तेलावर अवलंबून असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण येत आहे. अनेक देशांनी इंधनाच्या बचतीसाठी तातडीचे उपाय राबवण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर भारतात पुन्हा टाळेबंदी केली जाणार असल्याची आवई समाजमाध्यमांवर उठली आहे.
पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत जागतिक संकटावर भाष्य करताना करोना महामारीतील संकटाचा दाखला दिला. पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतात. त्यामुळे देशवासीयांनी प्रत्येक आव्हानासाठी तयार राहिले पाहिजे. भारताने करोना काळात जशी एकजूट दाखवून मोठ्या संकटाचा सामना केला, तशीच एकजूट आताही दाखविणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात कुठेही टाळेबंदी किंवा लॉकडाऊनचे संकेत दिले नाहीत. पंतप्रधानांनी भाषणादरम्यान टाळेबंदीबाबत एक शब्दही काढला नाही. त्यांच्या भाषणानंतर मात्र समाजमाध्यमांवर भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याची आवई उठली. त्या संदर्भातील अनेक पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्याने सर्वसामान्यांची धाकधूक वाढली.
आणखी वाचा : भारताने ‘ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा’ मोहीम का सुरू केली? होर्मुझ सामुद्रधुनीत भारताची किती जहाजे अडकली?
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनसदृश परिस्थिती
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे खनिज तेलाचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक देशांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनंड मार्कोस यांनी त्यांच्या देशात ‘राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी’ घोषित केली आहे. इंधनाचा साठा केवळ ४५ दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने त्यांनी सरकारी कार्यालयांसाठी चार दिवसांच्या कामाचा आठवडा लागू केला. त्याशिवाय अनावश्यक प्रवास आणि वातानुकूलित यंत्रणेच्या वापरावर कडक निर्बंध घातले. पाकिस्तानातही चार दिवसांचा कामाचा आठवडा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी शाळांना दोन आठवड्यांची सुट्टी जाहीर करण्यात आली. इंधनाची बचत करण्यासाठी सरकारी बैठका आणि प्रवास रद्द करण्यात आले. पाकिस्तान प्रीमियर लीगचे सामने फक्त दोनच मैदानांवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेश-श्रीलंकेतही कठोर नियम लागू
भारताच्या सीमेला लागून असलेल्या श्रीलंकेतील सरकारनेही वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यावर काही लिटरची मर्यादा घातली. बांगलादेशने वीजटंचाई टाळण्यासाठी देशभरात विजेची कपात सुरू केली. त्याशिवाय सरकारी इमारतींवरील सजावटीचे दिवे लावण्यास बंदी घातली. व्हिएतनामने सरकारी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची मुभा दिली, तर थायलंड सरकारने इमारतींमधील लिफ्ट बंद करून नागरिकांना पायऱ्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होत नाही, तोपर्यंत जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यातच राहील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतात इंधनाची नेमकी काय स्थिती?
पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, नवीन जोडणी देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत असून, काही ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. सरकारने निर्यातीपेक्षा देशांतर्गत मागणीला प्राधान्य दिले आहे. तसेच इंधन बचतीसाठी उद्योगांचा गॅस पुरवठा कमी करून घरगुती वापरासाठी वळवला आहे.
भारतात खरंच ‘लॉकडाऊन’ लागणार का?
परिस्थिती गंभीर असली तरीही सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता नाही. सध्या लागू करण्यात येणारे उपाय हे केवळ ऊर्जा बचतीवर केंद्रित असल्याचे केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारच्या ‘लॉकडान’ ची घोषणा केलेली नाही. त्यांनी केवळ या गंभीर परिस्थितीतील आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकार खंबीर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
