Piped Natural Gas Source and Supply in India : पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने देशातील इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या हालचालींवर नियंत्रण आणल्याने भारतात होणाऱ्या आयातीवर बंधन आली आहेत. परिणामी एलपीजी गॅससह अनेक इंधनांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने एलएनजी वापरावर अधिक भर द्यायला सुरुवात केली आहे. तसंच, ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एलपीजी कनेक्शन तोडून एलएनजी जोडणी घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे एलएनजी आपल्यापर्यंत पोहोचतं कसं हे पाहुयात.

भारत हा जगातील चौथा मोठा द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) आयातदार देश आहे आणि भारताची इंधनाची भूक वेगाने वाढत आहे. सध्याच्या अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’जवळजवळ ठप्प झाली आहे. जगातील २० टक्के LNG व्यापार याच अरुंद मार्गातून होतो, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.

भारत स्वतःचा वायू कुठे तयार करतो?

भारत पूर्णपणे आयातीवर अवलंबून नाही. २०२३ मध्ये भारताचे देशांतर्गत उत्पादन ३६.४ अब्ज घनमीटर (bcm) होते, परंतु, आता देशाच्या गरजेच्या जवळपास ५० टक्के उत्पादन भारतात केलं जातं.

कृष्णा-गोदावरी (KG) बेसिन: पूर्व किनारपट्टीवरील हे खोरे हे सर्वांत मोठे सोर्स आहे. यातील आर-क्लस्टर, सॅटेलाइट क्लस्टर आणि एमजे (MJ) या तीन क्षेत्रांचा भारताच्या एकूण उत्पादनात २५ टक्के वाटा आहे.

ईशान्य भारत: आसाम आणि त्रिपुरा बेसिनचा देशांतर्गत जमिनीवरील (onshore) उत्पादनात ४७ टक्के वाटा आहे.

प्रमुख कंपन्या: ओएनजीसी (ONGC) आणि ऑईल इंडिया या मुंबई ऑफशोअर, आसाम, त्रिपुरा आणि केंबे बेसिनमध्ये मुख्य ऑपरेटर आहेत.

मर्यादा: २०३० पर्यंत देशांतर्गत उत्पादनात केवळ ८ टक्के वाढ होऊन ते ३८ bcm पर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण जुनी क्षेत्रे आता कमी उत्पादन देत आहेत.

भारताला LNG आयातीची गरज का आहे?

देशांतर्गत उत्पादन अपुरे असल्याने भारत आयातीवर अवलंबून आहे. सरकारला २०३० पर्यंत ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा ६-७ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवायचा आहे.

LNG चा वापर : याचा वापर वीज प्रकल्प, खत कारखाने (युरिया), औद्योगिक बॉयलर आणि घरांमध्ये (PNG) व वाहनांमध्ये (CNG) केला जातो.

आयात आणि टर्मिनल्स

कतार हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्याशिवाय अमेरिका, युएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि नायजेरियातूनही आयात केली जाते. आयात केलेले LNG प्रामुख्याने गुजरातमधील दाहेज (सर्वात व्यस्त), हजीरा, दाभोळ, कोची, धामरा आणि एन्नोर येथील टर्मिनल्सवर उतरवले जाते. भारताची ६० टक्के LNG आणि ९० टक्के LPG आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते, जी सध्या युद्धाच्या छायेखाली आहे.

दरम्यान, जर हा संघर्ष एप्रिलनंतरही सुरू राहिला, तर पाईप गॅसच्या (PNG) किमती २०-३० टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे भारत आता ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांकडून पर्यायी पुरवठ्यासाठी प्रयत्न करत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून एलएनजी इंधन वाहतूक करणारे जहाज (फोटो – Reuters)

भारतातील एलपीजी (LPG) पुरवठ्याची स्थिती काय?

एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) हे एलएनजीपेक्षा (LNG) वेगळे इंधन आहे, एकाच मार्गावरून हे दोन्ही इंधन भारतात येताता. भारत कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवेत, सौदी अरेबिया, ओमान आणि अमेरिका या सहा प्रमुख पुरवठादारांकडून एलपीजी आयात करतो. भारत सध्या जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक आहे. गेल्या दशकात, एकूण एलपीजी वापरामध्ये आयातीचा वाटा २०१४ मधील ४७ टक्क्यांवरून वाढून आज सुमारे ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

कतार आणि सौदी अरेबियातून येणाऱ्या एलपीजी पुरवठ्यात सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. भारताची एलपीजी साठवण क्षमता साधारणपणे १२ ते १४ लाख टन इतकी आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने ‘जीवनावश्यक वस्तू कायदा’ लागू केला असून, १२,००० हून अधिक छापे टाकून १५,००० पेक्षा जास्त सिलिंडर जप्त केले आहेत. देशांतर्गत रिफायनरींमधील एलपीजी उत्पादनात ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारत आता अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या पर्यायी पुरवठादारांच्या शोधात आहे. तर, अमेरिकेहून भारतात जहाज येण्यासाठी सरासरी ४५ दिवस लागतात, तर आखाती देशांतून केवळ सात ते आठ दिवस लागतात.

भविष्यात भारताला आणखी गॅसची गरज भासणार का?

भारताची एलएनजी मागणी सातत्याने वाढण्याचा अंदाज असून, २०३० पर्यंत ती वार्षिक ६४ अब्ज घनमीटर (bcm) पर्यंत पोहोचू शकते. २०२३ ते २०३० या कालावधीत हा वार्षिक सरासरी विकास दर ११ टक्के असेल, जो मागील १० वर्षांच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी (ONGC) द्वारे संचालित केजी (KG) बेसिन प्रकल्पांमुळे, भारताचे तेल आणि वायू उत्पादन २०२७ च्या सुमारास उच्चांकी पातळीवर जाण्याची अपेक्षा आहे. परंतु, ही वाढदेखील मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी पुरेशी नसेल. जशी देशांतर्गत क्षेत्रे जुनी होत जातील आणि मागणी वाढेल, तसेच पश्चिम आशिया आता पूर्वीसारखा विश्वासार्ह पुरवठादार राहिलेला नसल्याने, भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी आयात केलेले एलएनजी अधिक महत्त्वाचे ठरेल.

महत्वाचे नवीन नियम (मार्च २०२६)

  1. LPG पुरवठा बंद: ज्या भागात PNG पाइपलाइन पोहोचली आहे, तिथे नागरिकांना ३ महिन्यांच्या आत PNG कनेक्शन घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास तुमचा LPG पुरवठा बंद केला जाईल.
  2. एकाच वेळी दोन्ही नको: ज्यांच्याकडे PNG आहे, त्यांना आता घरगुती LPG सिलेंडर घेता येणार नाही किंवा रिफिल मिळणार नाही.