India Missile Defence Project Kusha: हवाई सुरक्षेवर भारत भर देत आहे. त्यात अधिकाधिक अत्याधुनिक आणि आत्मनिर्भर होत आहे. ‘प्रोजेक्ट कुश’ हा हवाई सुरक्षेच्या दृष्टीने असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, हा प्रकल्प भारत वेगाने पूर्ण करीत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास रशियानिर्मित एस-४०० या प्रणालीच्या खरेदीची गरज भारताला लागणार नाही आणि हवाई सुरक्षेत आपण बहुतांश आत्मनिर्भर होऊ.
प्रकल्पाची पार्श्वभूमी काय?
बहुस्तरावरील हवाई सुरक्षा ही सध्या अत्यावश्यक बाब होऊन बसली आहे. भारतामध्ये स्वदेशीनिर्मित आणि आयात केलेल्या शस्त्रांच्याही सहाय्याने हवाई सुरक्षेचे आव्हान सध्या पेलले जात आहे. भविष्यात हवाई सुरक्षेमध्ये पूर्ण आत्मनिर्भर होण्याचा देशाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून ‘प्रोजेक्ट कुश’ पूर्णत्वाला नेला जात आहे. अर्थात, तंत्रज्ञानाच्या पातळीवर ‘बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स’मधील आत्मनिर्भरतेचे आव्हान अद्याप आपल्यासमोर आहे आणि दीर्घ काळापासून आपण त्यावर काम करीत आहोत.
‘प्रोजेक्ट कुश’ काय आहे?
दीर्घ पल्ल्याच्या हवाई लक्ष्यांना भेदणारी यंत्रणा ‘विऑन न्यूज’ने (WION) विख्यात शास्त्रज्ञ अंकती राजू यांचा दाखला देऊन या प्रकल्पाचे वृत्त दिले आहे. ‘प्रोजेक्ट कुश’द्वारे दीर्घ पल्ल्याच्या हवाई लक्ष्यांना भेदण्यामध्ये आपण आत्मनिर्भर होऊ. या प्रकल्पामध्ये लघु, मध्यम आणि लांब अशा तीन प्रकारची क्षेपणास्त्रे असून, शत्रूच्या हवाई हल्ल्यांना भेदण्याचे काम ती करतील. ५० किलोमीटरपासून ४०० किलोमीटरपर्यंतच्या हवाई लक्ष्यांना ही क्षेपणास्त्रे भेदतील.
संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या (बीईएल) सहाय्याने या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर ‘बीईएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘‘डीआरडीओ’बरोबर आम्ही संयुक्तपणे काम करतो.
‘कुश’ प्रकल्पाच्या अनेक उपयंत्रणा, विशेष करून विविध प्रकारचे रडार आणि नियंत्रण यंत्रणा आम्ही संयुक्तपणे तयार करीत आहोत.’ या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ‘बीईएल’च्या ‘मिसाईल इंटिग्रेशन’ सुविधेचे उद्घाटन केले. त्या वेळी त्यांना ‘प्रोजेक्ट कुश’सह ‘बीईएल’मध्ये सुरू असलेल्या विविध महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांची माहिती देण्यात आली.
वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान
‘प्रोजेक्ट कुश’ हा हवाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, तो वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सध्या ‘डीआरडीओ’समोर आहे. हा प्रकल्प पुढील काही वर्षांत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. तोपर्यंत रशियाच्या ‘एस-४००’ प्रणालीचा वापर आपल्याला करावा लागेल. भारताने २०१८ मध्ये रशियामधून पाच ‘एस-४००’ प्रणाली खरेदी करण्याची मागणी केली.
सध्या तीन प्रणाली भारतामध्ये असून, आणखी पाच प्रणाली खरेदी करण्यास या वर्षी मार्च महिन्यात आपण मंजुरी दिली. अब्जावधी रुपयांच्या खरेदीला दिलेली ही मंजुरी पाहता स्वदेशीनिर्मित प्रणाली प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यास अद्याप अवधी असल्याचे लक्षात येते. खरेदीच्या पातळीवरही एखादी प्रणाली वेळेत सेवेत दाखल झाल्याचे चित्र अभावानेच आढळते. रशियाकडे पहिल्या टप्प्यात नोंदवलेल्या पाच एस-४०० प्रणालीच अद्याप पूर्णपणे भारतात दाखल झालेल्या नाहीत. सध्या केवळ तीन प्रणाली भारताकडे आहेत. या प्रणालींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चांगली कामगिरी बजावली होती.
हवाई सुरक्षेच्या इतर प्रणाली
हवाई दलासाठी एकत्रित मानवरहित हवाई यंत्रणाविरोधी यंत्रणेची (आयएसीसीएस) निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ने केली आहे, तर भूदलासाठी ‘आकाशतीर’ ही हवाई संरक्षण नियंत्रण आणि माहिती देणारी यंत्रणा आहे. हवाई संरक्षणासाठी कार्यरत सर्व यंत्रणांची एकत्रित माहिती ‘आयएसीसीएस’ घेते, तर आकाशतीर यंत्रणा लष्कराच्या हवाई संरक्षण केंद्रांना जोडलेली आहे. ‘प्रोजेक्ट कुश’ पूर्णत्वास गेल्यानंतर या हवाई सुरक्षा प्रणालींना तो जोडला जाईल. हे लवकरात लवकर होईल, तितके आपण हवाई सुरक्षेमध्ये अधिकाधिक मजबूत होऊ.
हवाई सुरक्षेसाठी क्षेपणास्त्रे
दीर्घ पल्ल्याच्या हवाई सुरक्षेसाठी आपण रशियाच्या ‘एस-४००’ प्रणालीवर सध्या अवलंबून आहोत. याखेरीज ‘आकाश’, ‘बराक-८’ ही मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लघु पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, ‘एल-७० विमानविरोधी तोफ’, ड्रोनविरोधी यंत्रणा यांचाही वापर एकूण हवाई सुरक्षेसाठी होतो.
‘बीएमडी’चे आव्हान कायम
स्वदेशीनिर्मित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याचे आव्हान कायम आहे. दीर्घ काळापासून हा प्रकल्प चाचणीच्या स्तरावर आहे. ‘पृथ्वी एअर डिफेन्स’ आणि ‘अॅडव्हान्स एअर डिफेन्स’ (पीएडी आणि एएडी) या क्षेपणास्त्रांचा वापर ‘बीएमडी’मध्ये होईल. ‘बीएमडी’सह ‘प्रोजेक्ट कुश’ लवकरात लवकर पूर्णत्वाला जाणे गरजेचे आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
