जगातील प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना चकवा देण्यासाठी भारताने नवीन ‘स्टेल्थ’ अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) विकसित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. हे क्षेपणास्त्र सध्याच्या अग्नी-५ पेक्षा अधिक घातक असेल. त्याचा पल्लाही १० हजार किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे. यामुळे ते खऱ्या अर्थाने जगभरात मारा करू शकणारे भारताचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) ठरणार असल्याचे सांगितले जाते.
प्रकल्प काय?
भारताने पुढच्या पिढीतील आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतल्याचे वृत्त आहे. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नेतृत्वाखालील हा प्रकल्प अत्यंत गुप्त ठेवण्यात आला आहे. प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना चकवा देऊ शकेल, हे सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट असे क्षेपणास्त्र विकसित करणे आहे, जे केवळ शक्तिशाली नव्हे, तर अण्वस्त्रवाहक, मध्यम पल्ल्याच्या अग्नी – ५ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षा वजनाने हलके असेल. या नव्या क्षेपणास्त्राचा पल्ला १० हजार किलोमीटरपेक्षा जास्त असेल, जो सध्या पाच ते साडेपाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या अग्नी – ५ च्या तुलनेत जवळजवळ दुप्पट असणार आहे. हे क्षेपणास्त्र १० ते १२ अण्वस्त्रे वाहून नेऊ शकेल.
प्रगत हवाई संरक्षण प्रणाली…
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जागतिक लष्करी वातावरणात हवाई धोके त्याच क्षणी ओळखून त्यांना नष्ट करू शकणाऱ्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींद्वारे आता हवाई वर्चस्व मिळवले जात आहे. लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ही नित्याची बाब होत असल्याने अनेक देश त्यांच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक संरक्षण प्रणालींमध्ये मोठी गुंतवणूक करीत आहेत.
इस्रायलच्या ‘आयर्न डोम’पासून ते रशियाच्या शक्तिशाली ‘एस – ५०० प्रोमिथियस’ पर्यंत, जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींमध्ये जलद-प्रतिसाद क्षमता, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अचूक अभियांत्रिकीचा मेळ असतो. विविध धोक्यांचा सामना करण्यासाठी रशियाने ‘एस – ५०० प्रोमिथियस’ ही सर्वात अत्याधुनिक हवाई प्रणालींपैकी एक तयार केली आहे. एकाच वेळी १० हायपरसोनिक लक्ष्यांना सामोरे जाण्याची तिची क्षमता उल्लेखनीय आहे.
अमेरिकेने विकसित केलेली ‘टर्मिनल हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स’ (थाड) ही एक शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली, जी वातावरणाबाहेर, खूप उंचीवर क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी बनवली आहे. तर चीनची ‘एचक्यू-९’ ही लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी प्रणाली आहे.
सुमारे २७ किलोमीटर उंचीवर आणि २०० किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यावर बॅलिस्टिक धोके, विमाने आणि क्रुझ क्षेपणास्त्रांशी लढण्यासाठी ती तयार केलेली आहे. यांसारख्या काही प्रणाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञानाच्या शिखर मानल्या जातात. अशा प्रणालींवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून भारताने नवीन आयआरबीएम क्षेपणास्त्राची मुहूर्तमेढ रोवली आहे.
वैशिष्ट्ये काय?
या नवीन क्षेपणास्त्रात ‘मॅन्युव्हरेबल रि-एन्ट्री व्हेइकल्स’ (एमएआरव्हीएस) समाविष्ट केले जातील. ‘मॅन्युव्हरेबल रि-एन्ट्री व्हेइकल्स’ हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या पेलोडचा एक प्रकार आहे. पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यानंतर आपला उड्डाण मार्ग बदलण्यासाठी तो तयार केलेला असतो. पारंपरिक ‘रि-एन्ट्री व्हेइकल’ निर्धारित बॅलिस्टिक मार्गाने मार्गक्रमण करतात. परंतु, ‘एमएआरव्हीएस’ वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यानंतर त्यांचा उड्डाण मार्ग बदलून हालचाली करू शकतात. ही क्षमता इंटरसेप्टरला चकवा देण्यासाठी महत्त्वाची ठरते.
वॉरहेड्सच्या बनावट प्रतिकृती रडारला गोंधळात टाकतील. यातून बनावट लक्ष्य तयार होऊन शत्रूला त्याची महागडी इंटरसेप्टर्स वापरणे भाग पडेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी विखुरणारी किंवा शोषून घेणारी सामग्री सहसा कार्बन कंपोझिट असते. रडार शोषक आवरण या क्षेपणास्त्राला अधिक गुप्त अर्थात ‘स्टेल्थ’ बनवतील, जेणेकरून मध्यवर्ती टप्प्यात त्यांची ओळख पटवणे कठीण होईल.
हलके, वेगवान कसे?
नवीन क्षेपणास्त्राच्या रचनेचे काम २०२५ मध्ये पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. समुद्राखालून प्रक्षेपित होणाऱ्या के – ५ आणि के – ६ पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक (एसएलबीएमएस) तंत्रज्ञानावर आधारित त्याचे तंत्रज्ञान असल्याचाही दावा केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर नवीन क्षेपणास्त्राला अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने काम करण्यास सहाय्यभूत ठरेल. त्याची तीन टनापर्यंत वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असण्याचा अंदाज आहे. धातूच्या भागांऐवजी प्रगत संमिश्र सामग्री वापरल्याने क्षेपणास्त्राचे वजन २० टक्क्यांहून अधिकने कमी होईल. इंजिनच्या आवरणात व इतर भागात या घटकांचा इंधन कार्यक्षमता व पल्ला वाढणार आहे.
प्रतिहल्ल्याची क्षमता
भारताने अण्वस्त्राबाबत ‘प्रथम वापर नाही’ हे धोरण निश्चित केलेले आहे. यामुळे विश्वासार्ह प्रतिहल्ल्याची क्षमता असणे आवश्यक ठरते. सामरिक निकड या विकासाला पुढे नेत आहे. सीमेवर चीन आणि पाकिस्तानने प्रगत संरक्षण साहित्याच्या उभारणीकडे लक्ष केंद्रित केलेले असताना प्रतिहल्ल्याची क्षमता महत्त्वाची ठरते.
भारताच्या नवीन क्षेपणास्त्राची तांत्रिक क्षमता गुलदस्यात आहे. या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा पल्ला चीन व त्यापलीकडील संभाव्य धोक्यांसह शत्रूच्या प्रदेशात खोलवर मारा करण्यास सक्षम असल्याचे अनुमान काढले जाते. १० हजारहून अधिक किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र भारताला युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये अधिक खोलवर पोहोचण्यास मदत करेल, असे मानले जाते.
