Nighht temperature rise during India summer: देशात दिवसा असलेल्या उष्णतेची चर्चा सर्वाधिक होते. परंतु, मागील काही दिवसांपासून रात्रीचे वातावरण देखील उष्ण राहत आहे. मानवी आरोग्यासाठी रात्रीची उष्णता दिवसा येणाऱ्या उष्णतेच्या लाटेपेक्षा घातक ठरू शकते. कमी तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या घरांमध्ये रात्रीच्या उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो. देशात दिवसा तसेच रात्रीच्या सरासरी तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, रात्री वातावरण उष्ण असल्यास मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवसा असणाऱ्या उष्णतेच्या लाटेपेक्षा रात्रीचे उष्ण वातावरण अधिक घातक ठरू शकते.

उष्णतेमुळे मृत्युंचे प्रमाण वाढते ?

मानवी आरोग्यावर दिवसा असलेल्या उष्णतेचा परिणाम होतो. त्यामुळे रात्रीच्या शीतल वातावरणात शरीरातील उष्णता कमी होते. शरीराला दिलासा मिळतो. पण, रात्रीही वातावरणात उष्णता असेल तर शरीराला दिलासा मिळणार नाही. वातावरणाशी जुळवून घेता येणार नाही. ज्या घरांमध्ये हवा खेळती नसेल अथवा एसीची सुविधा नसेल त्या घरांमध्ये राहणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. क्लायमेट ट्रेंड्स या दिल्लीतील संस्थेने चेन्नईतील ५० घरांचा अभ्यास केला. मध्य तसेच कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या घरांचा अभ्यास करण्यात आला. रात्रीच्या वेळी तापमान ३२ अंशापेक्षा अधिक असल्याचे त्यांना आढळून आले. कधीकधी हे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. दिवसा तसेच रात्रीचे तापमान शहरात अनेकदा एकसारखेच असते. रात्रीच्या वेळी असलेल्या उष्ण वातावरणाचा घरातील लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा अनेक हवामानाशी संबंधित संस्था अभ्यास करत आहेत. रात्रीच्या वेळी वातावरणात उष्णता असल्याने उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढते, असे काही अहवालांमधून समोर आले.

रात्रीचे तापमान ५.५ अंशांनी वाढणार?

१९०१ ते २०१८ दरम्यान भारतातील तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे २०२० मध्ये झालेल्या हवामान बदल अभ्यासातून समोर आले. दिवसा तसेच रात्रीच्या तापमानात या कालावधीत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. १९८६ ते २०१५ या ३० वर्षांच्या कालावधीत दिवसा असलेल्या तापमानात ०.६३ अंश सेल्सिअस, तर रात्रीच्या तापमानात ०.४ अंश सेल्सिअस वाढ नोंदवली गेली आहे. रात्रीच्या तुलनेत दिवसा असलेल्या तापमानात वाढ अधिक होत आहे. या शतकाच्या अखेर दिवसा असलेल्या तापमानात ४.७ अंश सेल्सिअसने, तर रात्रीच्या तापमानात ५.५ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. रात्रीच्या तापमान येत्या काळात झपाट्याने वाढेल असे सुचवण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रात्रीच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

रात्री उष्णतेत वाढ होण्याचे कारण काय?

जगातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. काँक्रिट, रस्ते, विटा आणि धातू यांचा वापर वाढला आहे. हे घटक दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री सूर्य नसताना ती उत्सर्जित करतात. उंच इमारती, जंगलतोड, निसर्गाचा ऱ्हास, कोरडे पडलेले जलस्रोत यांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. एसीचा वापर केल्याने बाहेरील वातावरणात उष्ण हवा मिसळते. हे देखील एक महत्वाचे कारण ठरत आहे. शहरांतील दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये रात्रीच्या तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ नोंदवली गेली आहे. आपण जितकी निसर्गाला हानी पोहचवू तितकी तापमानात वाढ होणार हे निश्चित आहे.

मानवी आरोग्यावर कोणता परिणाम?

भारतात शहरांमधील घरांची रचना हवा मोकळी राहील अशी नसते. त्यामुळे या घरांमध्ये जर एसी नसेल तर त्यात राहणाऱ्या लोकांच्या शरीराला खूपच थोडा दिलासा मिळेल. व्यवस्थित झोप न होणे, अस्वस्थ वाटणे, थकवा येणे आणि शरीरातील ऊर्जा कमी होणे अशा समस्या त्यांना जाणवतात. यामुळे त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परंतु, यापेक्षाही गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उष्णता वाढली की मृत्युंचे प्रमाणही वाढते, अहमदाबादमधील आकडेवारी काय सांगते?

उष्णतेचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास केलेल्या भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेचे माजी संचालक दिलीप मावळणकर आणि आणखी एका अभ्यासकांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. अहमदाबाद महानगरपालिका दररोज होणाऱ्या मृत्युंचे कारण नोंद करते. “अहमदाबादमध्ये दररोज जवळपास १०० लोकांच्या मृत्यूची नोंद होते. जेव्हा दिवसा तापमान ४० अंशांपेक्षा अधिक व रात्रीचे तापमान २८ अंशांपेक्षा कमी असते तेव्हा मृत्यूंचे प्रमाण फार बदललेले नसते. परंतु, जेव्हा रात्रीचे तापमान २८ ते ३० अंशादरम्यान असते तेव्हा मृत्यूंचे प्रमाण १६५ असते. जेव्हा रात्रीचे तापमान ३० अंशांपेक्षा अधिक असते तेव्हा मृत्युंचा आकडा २६५ पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. सखोल विश्लेषण न करता या आकड्यांवरून इथे काहीतरी महत्वाचा बदल होत असल्याचे दिसून येते. रात्रीचे तापमान आणि मृत्यू यांचा काहीतरी संबंध आहे, याचे तीव्र संकेत मिळतात”, असे मावळणकर म्हणाले.

दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता का?

देशातील २३ राज्यांमधील २०० हून अधिक शहरांमध्ये उष्णतेचा सामना करण्यासाठी नियोजन केले जाते. प्रत्येक उन्हाळ्यात हे नियोजन होते. उष्णतेच्या लाटेचा सामना कसा करायचा याबाबत सुचना जारी केल्या जातात. परंतु, उन्हाळ्यात तीव्र उष्णता राहण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे. रात्रीच्या तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेचा प्रकोप रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरांतील पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे, कमी किंमतीतील घरांची रचना हवा मोकळी राहील अशी करणे, नैसर्गिक ठिकाणे निर्माण करणे यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

क्लायमेट ट्रेंड्सने केलेल्या अभ्यासातून चेन्नईतील घरांबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत छोट्या घरांमध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात, असे आढळून आले. घरांच्या छतांना किंवा भिंतींना पांढरा रंग दिल्यास या घरांतील लोकांना दिलासा मिळू शकतो. घरांमध्ये नैसर्गिक हवा येण्यासाठी घरांच्या रचनेत बदल करणे आवश्यक आहे, असे सुचवण्यात आले आहे.