भारताची अणुशक्तीवर चालणारी दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) ‘आयएनएस अरिघात’ नुकतीच नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. चीनलाही तिच्या आगमनाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. भारताने आण्विक शक्तीचा वापर जागतिक व प्रादेशिक शांतता, स्थिरता राखण्यासाठी करायला हवा. ताकदीचे प्रदर्शन अथवा धमकावण्यासाठी नव्हे, असे सल्ले चिनी लष्करी तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचे सभोवताली उमटणारे पडसाद यातून अधोरेखित होत आहेत.
सामरिक महत्त्व काय?
अरिहंत वर्गातील आयएनएस अरिघात ही दुसरी पाणबुडी. काही वर्षांपूर्वी आयएनएस अरिहंत नौदलात समाविष्ट झाली होती. जमीन, हवेतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता देशाने आधीच प्राप्त केली आहे. या पाणबुड्यांनी पाण्याखालून अण्वस्त्र हल्ल्याचे सामर्थ्य दिले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आयएनएस अरिघात आयएनएस अरिहंतपेक्षा अधिक प्रगत आहे. स्वदेशी के – १५ क्षेपणास्त्राने सुसज्ज ही पाणबुडी ७५० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यावर मारा करू शकते. अधिक काळ पाण्याखाली राहू शकते. या माध्यमातून प्रतिहल्ला चढविण्यासाठी दुसरा प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणारे जगात बोटावर मोजण्याइतपत देश असून त्यात भारताचाही समावेश आहे. ही पाणबुडी देशाची आण्विक त्रिसूत्री अधिक बळकट करेल. आण्विक प्रतिबंधन क्षमता वाढवून देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका निभावेल, याकडे खुद्द संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा >>>Women’s Wrestling History: या करू शकतात, तर तुम्ही का नाही? महिला कुस्तीपटूंची संघर्षगाथा नेमकं काय सांगते?
चीनमधून उमटलेले सूर काय?
‘आयएनएस अरिघात’ नौदलात समाविष्ट होण्याच्या सुमारास चीनच्या सरकारी ‘ग्लोबल टाइम्स’मधून भारताला वाढत्या आण्विक शक्तीला जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन करण्यात आले. भारत आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होत असताना हा लेख प्रसिद्ध झाला. या शक्तीचा विवेकपूर्ण वापर करणे अत्यावश्यक आहे. अण्वस्त्रांच्या मूलभूत उद्देशाचे दाखले देत चिनी तज्ज्ञ भारताने सामर्थ्याचे प्रदर्शन वा धमकावण्यासाठी तिचा वापर व्हायला नको, याकडे लक्ष वेधत आहेत.
शक्तीचे संतुलन कसे?
३५० नौकांचा ताफा राखणारे चिनी नौदल हे जगातील सर्वात मोठे नौदल मानले जाते. त्याच्याकडे अणुशक्तीवर चालणाऱ्या आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणाऱ्या सहा पाणबुड्या आहेत. डिझेलवर आधारित ४६ पाणबुड्या तो संचलित करतो. चीनचे ६५ ते ७० पाणबुड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या सुमारे १३३ युद्धनौका असून चीनच्या तुलनेत पाणबुड्यांची संख्या बरीच कमी आहे. यामध्ये डिझेल व विजेवर चालणाऱ्या १६ पारंपरिक पाणबुड्यांचा समावेश आहे. स्वदेशी अरिहंत आणि नुकतीच दाखल झालेल्या अरिघात या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागणाऱ्या पाणबुड्यांमुळे नौदलास पाण्यातून अण्वस्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली. यातून खात्रीशीर आण्विक प्ररोधनाचा टप्पा गाठला गेला. आगामी दोन वर्षात भारतीय नौदलास २०० जहाजांच्या ताफ्याने सुसज्ज करण्याचे नियोजन आहे. स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांच्या बांधणीला मान्यता दिली गेली आहे. रशियाकडून भाडेतत्त्वावर अकुला श्रेणीची पाणबुडी ताफ्यात सामील होणार आहे.
हेही वाचा >>>कुनो येथील चित्त्याचा मृत्यू, बुडून नव्हे तर विषबाधेमुळे; काय आहे नेमकं हे प्रकरण?
चिनी आक्रमकता रोखण्याचे प्रयत्न कसे?
हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढत आहेत. आयएनएस अरिघात कार्यान्वित झाल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मिक युद्ध विभागात (थिएटर कमांड) महत्त्वाची भर पडली. हिंद-प्रशांत प्रदेशात आपले हितसंबंध सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्या या टापूत असतील. चीन आपली उपस्थिती विस्तारत असताना त्याच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारत मजबूत स्थितीत आल्याचे माजी नौदल अधिकारी सांगतात. सागरी क्षमता वाढविली जात आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात एकाच वेळी ११ पाणबुड्या तैनात करून चीनला एक प्रकारे स्पष्ट संदेश दिला होता. इतकी मोठी तैनात तीन दशकांत पहिल्यांदा करण्यात आली. चिनी आव्हानांना शह देण्यासाठी नौदलाने सामर्थ्याचे दर्शन घडवले.