India first ever DVI Guidelines : गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघातात मृतदेहांची ओळख पटवणे यंत्रणांसाठी अवघड झाले होते. मृतदेहांची ओळख पटवण्यात यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा अपघातांत किंवा आपत्तीत मृतांची ओळख पटवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. भारताने पहिल्यांदाच अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वांची यादी तयार केली आहे. भीषण अपघातांनंतर मृतदेहांची दुरावस्था होते. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान असते. मागील महिन्यात ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. मृतदेहांची ओळख पटवून, त्याची नोंदणी करून सन्मानपूर्वक कुटुंबियांना सोपवण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
एखाद्या भीषण अपघातानंतर मृतांची ओळख पटवणे अवघड होऊन बसते, त्यामुळे याबाबत मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहाय्यक सल्लागार नवल प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “फोरेन्सिकच्या (न्यायवैद्यक) अनेक शाखा आहेत. आपत्तीतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी या शाखांनी एकत्रीत येऊन काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.”
मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी चार महत्वाचे टप्पे कोणते?
एखादा अपघात किंवा आपत्ती होऊन गेल्यानंतर पोलीस, आरोग्य अधिकारी, आपात्कालीन सेवा पुरवणाऱ्या तसेच मदत कार्य राबवणाऱ्या यंत्रणा महत्वाची भूमिका बजावतात. अशा कठीण प्रसंगी या सगळ्या यंत्रणांमध्ये ताळमेळ असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे या सगळ्यांना एकत्रीत घेऊन येणारी एक स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आणणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी चार महत्वपूर्ण टप्पे खालीलप्रमाणे –
१) अपघात स्थळावरून मृतदेह किंवा मृतदेहांचे अवशेष जमा करणे. मृतदेहाशी संबंधित माहिती जतन करणे, त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करणे. तसेच ते मृतदेह योग्य जागी ठेवणे.
२) मृतदेह किंवा उरलेल्या अवशेषांचा शवविच्छेदन अहवाल जमा करणे. त्याबाबतची फोरेन्सिक माहिती तसेच मेडिको-लिगल तपासणी अहवाल जमा करणे.
३) मृतांच्या घरून त्यांच्याशी संबंधित (अँटी मोर्टम डेटा) वैयक्तीक माहिती गोळा करणे. तसेच मृतांचे आरोग्य, दात तपासणीचे जुने रेकॉर्ड जमा करणे. कुटुंबियांचे डीएनए नमूने गोळा करणे. या माहितीचा वापर मृतदेहाच्या माहितीशी जुळवाजुळवी करण्यात महत्वपूर्ण ठरतो.
४) या माहितीचा वापर करून ही माहिती फोरेन्सिक अहवालाशी जुळते का याचा अभ्यास करणे. मृताची ओळख पटल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबियांकडे सन्मानपूर्वक सोपवणे. तसेच याबाबतची कागदपत्रे जतन करून ठेवणे.
मृतदेहांची ओळख पटवण्यात मोबाईल फोन महत्वाची भूमिका बजावतात. मोबाईलमुळे फोरेन्सिक अधिकाऱ्यांना मृतांचे डिजिटल बायोमेट्रिक मिळते. फोन मिळाल्यानंतर त्यात असलेल्या फोटोवरून मृतांची ओळख पटते, असे अहमदाबादमधील राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. जी. राजेश बाबू यांनी सांगितले.
मृतदेहांची ओळख पटवण्यात कमतरता आणि आव्हाने कोणती ?
भारतात भीषण प्रकारच्या अपघातातील मृतांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी आहेत –
१) अपघातानंतर मदत व बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांमध्ये ताळमेळ नसतो. त्यामुळे काही गोष्टींची पूर्तता होत नाही. सगळ्या यंत्रणांमध्ये ताळमेळ साधण्यासाठी ‘ऑपरेशनल डीव्हीआय इन्सिडेंट कमांडर’ नियुक्त करणे आवश्यक असल्याचे सूचवण्यात आले आहे. मृतांशी संबंधित माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून गोळा करण्यासाठी एक ठराविक पद्धत नसल्याने अनेक अडचणी येतात.
२) फोरेन्सिक तज्ज्ञांची कमतरता. फोरेन्सिक तज्ज्ञ अनेकदा कायदेशीर प्रकरणांमध्ये तपास करण्यात व्यस्त असतात. तसेच त्यांच्यावर कामाचा खूपच भार असल्याचे समोर आले आहे.
३) मृतदेहांना गोळा करताना त्यांच्याशी संबंधित माहिती ठेवली जात नाही. त्यामुळे चुकीचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले जाण्याची शक्यता वाढते.
४) अशा अपघातानंतर काम करणारे मनुष्यबळ अनेकदा कमी असते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात खूप उशीर होतो.
नॅशनल डेंटल डेटा रजिस्ट्रीची आवश्यकता
इंटरपोलने मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत तीन प्राथमिक निकष सांगितले आहेत. फिंगरप्रिंट, ओडोंटोलोजी (दातांची तपासणी) आणि डीएनए या तीन गोष्टींचा वापर ओळख पटवण्यासाठी केला जातो. तर टॅटू, स्कीनवरील जुन्या जखमा, दागिने या गोष्टीदेखील ओळख पटवण्यात मदत करत असल्या तरी या गोष्टींमुळे मृतदेहाची योग्य ओळख पटेलच असे नसते.
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर इंटरपोलने (आंतरराष्ट्रीय यंत्रणा) दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करण्यात आला होता. या अपघातात २६० मृतदेहांची खूपच दूरवस्था झाली होती. त्यामुळे फिंगरप्रिंट, व्हिझ्युअल कन्फर्मेशन आणि प्रोपर्टी रिकव्हरी या प्रक्रियांचा मृतांची ओळख पटवण्यात काहीच उपयोग झाला नव्हता. त्यामुळे भारताला याबाबत काही ठोस मार्गदर्शक तत्वांची आखणी करणे आवश्यक होते. या तत्वांनुसार भारतात ‘नॅशनल डेंटल डेटा रजिस्ट्री’ची स्थापना करणे आवश्यक असल्याचे सूचवण्यात आले आहे. अँटी मोर्टम डेटाची पोस्ट मोर्टम डेटाशी जुळवाजुळवी करून मृतदेहांची ओळख पटवणे शक्य होईल, असे सांगण्यात आले आहे.
मार्गदर्शक तत्वांच्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य आणि इंडियन असोसिएशन ऑफ फोरेन्सिक ओडोंटोलॉजीचे सचिव डॉ. जयशंकर पिल्लाई म्हणाले, प्रत्येकाकडे त्याचा समोरील दात दिसेल असा एक फोटो असतो. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये दात दिसणाऱ्या फोटोंची मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होते. “जर दातांची तपासणी केल्याचे जुने रिपोर्ट असतील तर ते तुम्ही कृपया जतन करून ठेवा. मृतदेहांची ओळख पटवण्यात ते रेकॉर्ड खूप महत्वाची भूमिका बजावतात.”, असे डॉ. पिल्लाई म्हणाले. पोस्ट मोर्टेम, फिंगरप्रिंट, डीएनए एनालिसिस, दातांशी संबंधित अहवाल, व्हर्च्युअल ऑटोस्पी आणि फोरेन्सिक अर्कालॉजी या प्रक्रियांचा वापर करून मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत मार्गदर्शक सूचना भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्या आहेत.

